सुटीतले बेत


हुश्श! संपल्या बाई परीक्षा. रोजचा डबा, दप्तर, गृहपाठ, क्लास, वगैरे वगैरे संपलं. संपलंय ना नक्की, की उन्हाळ्याच्या सुटीतले वर्ग सुरू झालेत? झालेत म्हणण्यापेक्षा लावलेत? लावले असतील तरी हरकत नाही, जेवढा वेळ मुलं (मुलगा किंवा मुलगी दोघांना हे लागू होतं बरं) घरी असतील त्यातला थोडा वेळ तरी त्यांना स्वयंपाकघरात घेऊन जा. उन्हाळा आहे, मस्त कै-या आल्यात बाजारात. कैरीचे अनेक पदार्थ असे आहेत जे एकदम सोपे आहेत, त्याला गॅसजवळही जावे लागत नाही आणि चविष्ट आहेत. त्यातला एक तरी रोज करायला लावा. शेवटची पोळी, भाताचा कुकर, कोशिंबीर, भाजी चिरणं, दाणे भाजणं नि सोलून ठेवणं (सोलताना भले मूठभर तोंडात जातील, चालेल.) अशी छोटी-छोटी कामं

त्यांच्याकडून करून घ्या. सँडविच आणि डोसे हेदेखील मुलांना सहज जमतील असे पदार्थ. यातूनच ती त्यातले वेगळे प्रकार करायला शिकतील, त्यांच्या कल्पनाशक्तीलाही वाव मिळेल. हे करता करता स्वच्छतेचं, कमीत कमी गॅस वापरण्याचं, नंतरच्या आवरण्याचं महत्त्वही त्यांना कळेल. वेळ चांगला जाईल नि आपणच केलेला पदार्थ खाण्यातला थरार त्यांना अनुभवता येईल. आई इतक्या उकाड्यातही कशी काय तासन्तास गॅससमोर उभी राहून छान-छान पदार्थ करून खाऊ घालते, याचा अंदाज येईल.

उन्हाळ्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पापड/कुरडया/सांडगे इ. त्याही कामात त्यांचा सहभाग असूद्या. पापडाचं पीठ तेलात बुडवून खाणं, अर्ध्याकच्च्या कुरडया/पापड्या तोंडात टाकणं यातली मजा त्यांना कळूद्या. स्वयंपाकघरासोबतच त्यांना घरातल्याही इतर कामांमध्ये सहभागी करून घ्या. कपडे वाळत घालणं, झाडांना पाणी घालणं, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं, कपाट आवरणं यातही वेळ छान जातो, हे त्यांना कळू द्या.

सुटी हा एक बे्रक असतो, पुढच्या वर्षाच्या अभ्यासाला लागण्यापूर्वीचा. तो ब्रेक अभ्यास करण्यात किंवा वेळापत्रकानुसारच गेला तर काय उपयोग ना? ख-या बे्रकसाठी लागतात मित्रमैत्रिणी, गप्पा, वेगवेगळे पदार्थ, सहली, पत्ते, कॅरम, सिनेमे, नाटकं, मामा-मावशी-काका-आत्या यांच्याकडे राहायला जाणं, वगैरे. हो ना?

Comments

  1. जबाबदार पालकत्व!
    Congrats!!

    ReplyDelete

Post a Comment