कुणीतरी येणार येणार ग!

नऊ महिन्यांची, ओह माफ करा, नऊ टप्प्यांची प्रतीक्षा आज आत्ता काही वेळात संपणार. मुलगा की मुलगी ते कळायला कदाचित थोडा वेळ जाईल एवढंच. पण आज डिलिव्हरी होणार म्हणजे होणारच.

इतकं निश्चित कसं माहीत, असं विचारताय? अहो, डिलिव्हरीची जबाबदारी ज्या डॉक्टरांच्या टीमवर टाकली होती त्यांची तशी ख्यातीच आहे मुळी. गर्भारपणाचा काळ किती असेल, किती टप्प्यात चाचण्या कराव्या लागतील आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी कधी होईल याचं वेळापत्रक त्यांच्याकडे तंतोतंत तयार असतं. एवढंच काय, खर्च किती करावा लागेल त्याचीसुद्धा मर्यादा या डॉक्टरांनी घालून दिलेली असते. अर्थात कधीकधी, खरंतर बऱयाचदा, ही मर्यादा ओलांडली जाते. पण मर्यादा आहे म्हणून ओलांडण्याचं महत्त्व ना.

तर पाच मार्च 2014 रोजी डिलिव्हरीची तारीख जाहीर करण्यात आली - 16 मे 2014. प्रमुख डॉक्टर व्ही.एस. संपत, त्यांचे निकटचे सहकारी एच.एस. ब्रह्मा व एस.एन.ए. झैदी यांच्या जोडीला खपत होते आपल्या अवाढव्य देशाच्या कानाकोपऱयात असलेले लाखो कर्मचारी. आणि 81.4 कोटी नागरिकांच्या आशीर्वादाची आकांक्षा बाळगणारे हजारो जीव.

543 डिलिव्हरीज तर आज होतील. पण या नवजातांचा राजा किंवा राणी कोण होणार ते कळायला थोडा वेळ जाऊ शकतो. पंधरा दिवसांचा अवधी या डॉक्टरांच्याच टीमने दिला आहे राजा/राणीला निवडायला. कोणाची निवड होणार याची पुष्कळ भाकितं केली आहेत अनेकांनी, अगदी तज्ञ, पंडित, एक्स्पर्ट वगैरे म्हणवून घेणाऱयांनी. आणि आपल्या भारतीय वैशिष्टय़ानुसार आपण प्रत्येकानेच मनातल्या मनात तरी काहीतरी ठरवून ठेवलंच आहे. म्हणजे कोण व्हायला हवं हा एक विचार, आदर्शवादी. नि कोण होईल हा दुसरा विचार, वास्तववादी. अनेकांनी फेसबुक, ट्विटर, ब्लॉग आदि माध्यमांतून ही भाकितं मांडून ठेवलीच आहेत, ती किती खरी ठरतायत ते आज कळेल.

कोणीही राजा/राणी होवो, देश योग्य मार्गाने गेला म्हणजे मिळवलं.

राजा/राणीचं अभिनंदन तर होतच राहील. पण या डॉक्टरांच्या टीमचं नि त्यांच्या अनाम सहकाऱयांचं अभिनंदन आपण खास केलंच पाहिजे. आणि धन्यवादही दिले पाहिजेत डिलिव्हरी सुखरूप पार पाडल्याबद्दल.

Comments