काळाची गरज


'पाळणाघर हे केवळ नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या दृष्टीनेच गरजेचं आहे असं नाही. समवयस्क दोस्तांची सोबत आणि व्यक्तिश: लक्ष देणारं, वेळ देणारं माणूस उपलब्ध असणं ही मुलांच्या दृष्टीने पाळणाघराची जमेची बाजू. एकप्रकारे या मुलांचं ते दुसरं घरच असतं म्हणा ना...
मुंबईच्या एका उपनगरातली मध्यमवर्गीय बहुतांश मराठी वस्ती. काळ 1970चं दशक. दोन मुलं आणि आईवडील नोकरी करणारे, असं बहुतेक घरांमधलं चित्र. काही घरांमध्ये आजी-आजोबा होते, काही घरांमध्ये ते नव्हते. जिथे ते नव्हते तिथल्या मुलांना सांभाळण्यासाठी या वस्तीमध्ये एक-दोन पाळणाघरं होती. जेमतेम दोन खोल्यांचं घर, घरातला पुरुष गिरणीत कामगार, तीन-चार मुलं. या संसाराला हातभार लावण्यासाठी स्त्री ऊर्फ ‘ताई’ सकाळी लवकर काही घरी स्वयंपाक करे व दिवसभर मुलं सांभाळे. पाच-सहा मुलं एका वेळी या पाळणाघरात राहायला असत. तार्इंच्या घरासमोर मैदान होतं, जवळच एक देऊळ होतं. तार्इंचं घर लहान असलं तरी मुलं बराच काळ, विशेषकरून सुटीत, या मैदानात नाहीतर देवळात खेळत असत. मुलं बारा-तेरा वर्षांची होईपर्यंत तार्इंकडे राहत. नंतर ती एकटी आपापल्या घरी राहू शकत, तेवढी जबाबदारी त्यांना कळू लागे.

आज तार्इंकडे राहणार्‍या मुलांची मुलं पाळणाघरात असतात, काही त्यापेक्षा मोठी झाली आहेत. तार्इंकडे राहावं लागलं म्हणून कोणत्याच मुलाला आईविषयी राग नाही की मुलांना दूर ठेवावं लागलं म्हणून आईच्या मनात अपराधाची भावना. आईने नोकरी करणं किती आवश्यक होतं, किंबहुना ती थोडीफार शिकलेली होती म्हणून तिला नोकरी मिळू तरी शकली, याची जाणीव मुलांना होती. घराची आर्थिक बाजू सांभाळायला पत्नीने काहीतरी काम करायची आवश्यकता आहे, अशी अनेक घरं होती. काही वर्षांनी अशाच एकदोघींनी पाळणाघर सुरू केले. त्यातली एक मावशी. आठ ते दहाच मुलं तिने दहा ते पंधरा वर्षांच्या काळात सांभाळली असतील. पण ती सगळी आजही मावशीच्या प्रेमात आहेत. मावशीच्या हातची अमृततुल्य आमटी चाखायला आजही आतुर आहेत. आपल्या मुलांना ती मावशीकडे घेऊन येतात आणि तिच्याशी गप्पा मारता मारता भूतकाळात सैर करून येतात.

आज, सुमारे 40 वर्षांनंतर, अर्थात पाळणाघरांची आवश्यकता वाढली आहे. कारण नोकरी करणार्‍या महिलांची संख्या खूप वाढली आहे. मुंबई-पुण्यातच नव्हे तर छोट्या छोट्या शहरांमधून नोकरी करणार्‍या किंवा शेतावर/कारखान्यांमध्ये काम करणार्‍या महिलांची संख्या प्रचंड आहे. या सर्वांनाच खरं तर सोयीस्कर आणि चांगली सुविधा पुरवणार्‍या पाळणाघरांची अत्यंत आवश्यकता आहे.

काळाची गरज आहे असं आपण अनेकदा म्हणत असतो, ती काळाची गरज ही कसोटी पाळणाघर या संकल्पनेला अनेक बाजूंनी लागू होते. नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत वाढ, स्त्रियांच्या पारंपरिक जबाबदार्‍यांमध्ये फारसा बदल नाही, मुलांना आई वा आईसदृश काळजी घेणार्‍या व्यक्तीच्या सोबतीची गरज, सर्वच घरांमध्ये आजीआजोबा नातवंडांची अनेक कारणांमुळे जबाबदारी घेण्यास असमर्थ, या एकत्रित परिस्थितीवर पाळणाघर हे एक उत्तर आहे. या उत्तराचा अर्धा भाग आहेत अकुशल/अशिक्षित आणि गरजू महिला, ज्यांच्याकडे एखादे काम सुरू करायला लागणारे कोणतेही भांडवल नाही.

परंतु याच महिला थोड्याशा प्रशिक्षणाने व बर्‍याचशा निरीक्षणाने पाळणाघर चालवण्यास सक्षम होऊ शकतात.

मध्यंतरी एका उद्योजिकेची मुलाखत वाचताना त्यातला एक मुद्दा लक्षात राहिला. तिने म्हटलं होतं, ‘मुलगा चार-पाच महिन्यांचा झाल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याला व्यक्तिगत माझी अशी फार गरज नाहीये. त्याला भूक लागली की दूध आणि शू/शी केली तर स्वच्छता या दोनच गोष्टींची गरज आहे, जी माझ्याशिवाय इतरही काही व्यक्ती पूर्ण करू शकतात.’ मग त्यांनी त्या दृष्टीने बाई शोधली, जबाबदारीने वागणारी आणि स्वत:चं व्यावसायिक काम पुन्हा सुरू केलं.

कामाच्या वेळी काम, मुलाला एकटं सोडल्याबद्दल अपराधी वाटू न देता, केलं आणि घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ त्याला दिला. यात त्या आईने मुलाला पाळणाघरात नसलं ठेवलं तरी स्वत:चं मूल वाढवायला दुसर्‍या व्यक्तीची मदत घेतलीच. कारण तिला तिचं शिक्षण, अनुभव, कौशल्य याचा उपयोग करून घ्यायचा होता.

त्यामुळेच पाळणाघर चालवणं हे खूप मोठं समाजकार्य आहे, याबाबत पाळणाघरात राहिलेल्यांना कोणतीच शंका नसेल. एक-दुसर्‍याची गरज योग्य तर्‍हेने भागवणं, एका सामंजस्याच्या पातळीवर आणि जबाबदारी घेऊन वागणं यात सर्वांचंच भलं आहे. जसं वयोवृद्ध सासूच्या जबाबदारीवर मुला/मुलीला टाकून जाणं, सासू-सासर्‍यांवर नातवंडांना सांभाळण्याचं बंधन पडणं चुकीचं आहे, असंच सून पाळणाघरात मुला/मुलीला ठेवून कामावर जाते म्हणून तिला नावं ठेवणंही चुकीचं आहे.

बाळाचं कसं चाललं असेल, तो मजेत असेल ना, भुकेला तर नसेल या विचारांचा भुंगा डोक्याला नसेल तर आईचं लक्ष कामात नीट लागतं, ती चांगल्या प्रकारे काम पूर्ण करू शकते, याबद्दलही कोणाचं दुमत नसावं. पाळणाघरात राहणारी मुलं एकुलत्या एक लाडावलेल्या मुलांपेक्षा अधिक समंजस असतात, त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांसोबत खेळायला/राहायला/बोलायला मिळतं, त्यांना जबाबदारी अधिक कळते, ती लवकर स्वतंत्र होतात, असे अनुभव बर्‍याच आईवडिलांना आलेले असतात. त्यामुळेच जास्तीत जास्त, चांगली, व्यावसायिक कौशल्याने चालवली जाणारी पाळणाघरं ही आज खरोखरीच काळाची गरज आहे.

Comments