आरोग्यम् धनसंपदा

जगभर 28 मे हा दिवस स्त्रियांच्या आरोग्यासाठी कार्यवाही दिन म्हणून साजरा केला जातो. यात मुख्यत्वे मातांच्या आरोग्यावर भर असला तरी सर्व वयाच्या स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न या दिवसामुळे ऐरणीवर येतात, म्हणून अशा दिवसांचे महत्त्व. आपल्याकडे स्त्रियांचे आरोग्य या विषयावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण त्याहीपेक्षा निरीक्षण करण्याजोगे जास्त आहे. म्हणजे आपल्या घरातल्या सर्व वयाच्या स्त्रियांचे - आई, मुलगी, बायको, बहीण, आजी, वहिनी - निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे आपण स्वत:च हे निश्चित करू शकतो, की त्यांना आरोग्य या विषयात किती गुण मिळतील. यात काही प्रश्न सुचतात ते असे -

त्या दररोज तीन वा चार वेळा व्यवस्थित, पोषक, वेळेवर, पुरेसे जेवतात का?

त्या किमान सहा ते सात तास शांत झोपतात का?

त्या प्रकृती किती बिघडल्यावर डॉक्टरकडे जातात किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी प्रकृती किती बिघडण्याची वाट पाहतात?

डॉक्टरला न विचारता आपल्या मनाने त्या औषधे घेतात का?

त्यांचे योग्य लसीकरण झाले आहे का?

त्या दंतवैद्याकडे नियमित जातात का?

त्यांचे वजन, रक्त, इतर चाचण्या नियमितपणे होतात का?

मासिक पाळीच्या दिवसात त्यांना स्वच्छ राहण्याची, आवश्यक असल्यास आराम करण्याची संधी आहे का?

सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याची मुभा त्यांना आहे का?

कापड वापरत असल्यास ते उन्हात/मोकळ्या जागी वाळत घालण्याएवढा मोकळेपणा घरात आहे का?

त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे का?

त्यांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार आहे का?

त्यांना गर्भनिरोधके सहज उपलब्ध आहेत का?

त्यांना गर्भनिरोधके वापरण्याचे स्वातंत्र्य आहे का?

विशेषत: तरुण मुलींना लैंगिकतेविषयी बोलण्याचे, माहिती करून घेण्याचे, स्वातंत्र्य आहे का? त्या प्रकारचे मार्गदर्शन करू शकणारी व्यक्ती सहज उपलब्ध आहे का?

देणार ना ही परीक्षा सगळे मित्रमैत्रिणी?

यापेक्षा वेगळे काही प्रश्न सुचतात का तुम्हाला?

ऑल द बेस्ट.

Comments