नऊ ते पाच म्हणजे नऊ ते पाच

शाळेतल्या ग्रुपमधल्या एकाकडे ते पाच-सहा जण जमले होते. मुंबईसारख्या काँक्रीटच्या इमारतींच्या जंगलातलं त्याचं बंगलावजा घर. आवारात भरपूर झाडं नि अर्थात झोपाळा. तो पाहिल्यावर मनात आलं, हा आहे एका जर्मन कंपनीत खूप मोठ्या पदावर, या झोपाळ्याचा त्याला काय उपयोग, कामाच्या धबडग्यात कधी बसायला मिळत असेल त्यावर? त्याला विचारलं तर त्याची बायको पटकन म्हणाली, ‘असं नाही हं, रोज संध्याकाळचा चहा आम्ही इकडेच बसून घेतो.’ सगळे अवाक्! त्यावर तो म्हणाला, ‘नोकरीला लागल्यापासून एक नियम केला की, नऊ ते पाच या वेळाच्या बाहेर आॅफिसात थांबायचं नाही. अगदीच आणीबाणी असेल तेव्हाची गोष्ट वेगळी, तेही सठीसामाशी एखाद्या दिवशी. एरवी पाचला बाहेर पडायचंच.’ त्यामुळे तीसएक किलोमीटरवर असलेल्या घरीदेखील तो सहा वाजेस्तो पोहोचलेला असतो. मग चहा अर्थातच झोपाळ्यावर बसून पिता येतो, शिळोप्याच्या गप्पा मारता मारता. सकाळी नऊला तो आॅफिसात पोहोचलेला असतो, हे सांगणे न लगे. त्याच्या जर्मन साहेबालाही ही गोष्ट माहीत आहे, त्यामुळे जर्मनी साडेतीन-चार तास आपल्या मागे असूनही संध्याकाळी पाचनंतर फोन किंवा ई-मेल करतानाही तो प्रथम उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. आता बोला!

बोला काय बोला? असं करू नका, काम वेळेवर संपवू नका, असं कोणी आपल्याला सांगितलेलं असतं का? नाही ना? मग, का संध्याकाळ घालवताय आॅफिसात वाया? वेळेवर पोहोचा, पूर्ण लक्ष देऊन काम करा नि वेळेत निघा. घरी बायको, आईवडील नि मुलांशी गप्पा मारा, खेळा, वाचा.

निघताय ना वेळेत मग?

Comments

Post a Comment