...परि लिहावे नेटके!

कोणतीही भाषा शिकण्याची एक परिभाषा असते. ती आत्मसात केली की मूळ भाषा आपलीशी होते. ब-याचदा मूळ भाषा तितकीशी शुद्ध बोलणे आपण सोडून देतो. शुद्धलेखनाचे नियम धाब्यावर बसतात आणि समोरच्यापर्यंत भावना पोहोचताहेत ना, मग कसेही बोलले तरी चालते, अशी धारणा पक्की होते. ही अशुद्ध बोलण्याची सवय ज्या मोठ्यांना मोडायचीय किंवा लहानांना लागूच द्यायची नाही, त्यांच्यासाठी माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेले ‘लिहावे नेटके’ हे दोन खंडांमधले पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनाने गेल्या वर्षी बाजारात आणले. सहाशेहून अधिक पृष्ठसंख्या, रंगीत छपाई आणि अत्यंत सोपी रचना आदी वैशिष्ट्ये असलेल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही नुकतीच वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. रतन टाटा ट्रस्टने मदत दिल्याने केवळ ४०० रुपयांमध्ये हे दोन खंड उपलब्ध करून देता आले. दुस-या आवृत्तीसाठीही ट्रस्टने मदत दिल्याने ‘लिहावे नेटके’ पुन्हा ४०० रुपयांना उपलब्ध आहे.

पुस्तकाच्या पहिल्या खंडाची सुरुवात मोठ्या अक्षरातल्या बाराखडीने नव्हे, चौदाखडीने होते. यात ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ हे इंग्रजीमुळे आपल्याकडे आलेले पाहुणे स्वर आहेत. मग मुळाक्षरे किंवा वर्णमाला आणि त्यांचा क्रम येतो. ‘क च ट त प य’ एकदा लक्षात राहिले की, शब्दकोश, संदर्भग्रंथांतील सूची, नावांची यादी पाहताना सोपे जाते आणि इथे सुरू होतात छोटे छोटे स्वाध्याय. सोपे वाटणारे पण कोड्यात टाकणारे प्रश्न, त्याला अनुसरून छोटी छोटी चित्रे आणि उत्तरे लिहायला छान मोकळी जागा. यामुळे मुलेच काय, मोठी माणसेही स्वाध्याय सोडवण्यात रंगून जातात. लेखिकेनेच काढलेली, रंगवलेली रंगीत चित्रे आणि संदेश भंडारे या प्रतिभावान छायाचित्रकाराने काढलेली अनेक छायाचित्रे यांनी हे पुस्तक सजले आहे. आकार लहान मुलांना हाताळायला किंचित अवघड असला तरी आई किंवा बाबा त्यांच्या कामात आहेत आणि शेजारी जमिनीवर मस्त मांडी ठोकून बसून मुलगा किंवा मुलगी हे पुस्तक सोडवतो/ते आहे, अडले तर विचारते आहे, आईबाबालाही ब-याचदा विचार करावा लागतो आहे, असे दृश्य ‘लिहावे नेटके’च्या बाबतीत सहज शक्य आहे.

मुख्य पृष्ठाच्या मागचे पान (जे एरवी कोरेच असते) तेही मनोरंजक आहे. कारण त्यावर आहेत ‘भाषा’ या शब्दाचे विविध अर्थ. भाषेसाठी आपण वापरू शकतो, अशी पन्नासहून अधिक विशेषणं. आज आपण अनेक छटा असलेले अनेक शब्द वापरणेच विसरून गेलोय. उदा. आपल्याला फक्त आश्चर्य वाटतं - अचंबा वाटत नाही, आपण चकित होत नाही किंवा आपल्याला विस्मय वाटत नाही! ‘सुंदर’ हा एकच शब्द आपण एखादं फूल, पेहराव, मुलगी, आवाज, चित्रपट, भाजी असा कशालाही जोडतो; परंतु मुळात ‘सुंदर’ हे दृश्य विशेषण आहे हेच आपण विसरलोय. म्हणूनच हे पुस्तक मराठी/इंग्रजी दोन्ही माध्यमांत शिकणाºया मुलांना शालेय यशाच्या दृष्टीने आवश्यक वेगवेगळ्या शब्दांचा आनंद घ्यायला शिकवणारेही आहे. मराठी व्याकरणातील सर्व घटक या दोन खंडांमध्ये येतात. मुलांचा शब्दकोडी सोडवत हसतखेळत अभ्यास होतो आणि आपली उजळणी होते.

Comments