आनंदाच्या शोधात

तिच्या मैत्रिणीच्या मुलीला दिवस गेले. नात्यातलाच स्त्रीरोगतज्ज्ञ होता, त्याच्याकडे नियमित तपासणीसाठी ती जाऊ लागली. त्याने काही चाचण्या करायला सांगितल्या, म्हणजे रक्त, लघवी, वगैरे. लोहाच्या गोळ्या, पौष्टिक अन्न, व्यायाम, अन्य काळजी कशी घ्यायची तेही सांगितलं. त्यानंतर त्याने आणखी काही चाचण्या करायला सांगितल्या. त्यातल्या एकात काही तरी गडबड वाटली त्यांना. मग आणखी चाचण्या. त्यामुळे घरात तणाव. आईला काळजी, आपलं बाळ नीट निरोगी, सुदृढ होईल ना. घरातल्या बाकीच्यांनाही तीच काळजी. कायकाय विचार डोक्यात आले असतील प्रत्येकाच्या, सांगता येणं कठीण. झोप उडाली सर्वांची. अगदी नवव्या महिन्यापर्यंत तपासण्या, अहवाल, तणाव, निदान हे चक्र सुरू होतं. अखेर बाळ जन्माला आलं, नाळ गुंडाळलेली होती गळ्याभोवती त्याच्या म्हणून शस्त्रक्रिया करावी लागली. पण... बाळ अगदी निरोगी, व्यवस्थित वजनाचं होतं. एक तसूभरही खूण नव्हती काही कमी-जास्त असल्याची. त्याला पाहिल्यावर आई आणि आजी दोघींना रडूच फुटलं. आज तो नऊ महिन्यांचा आहे, चांगला दांडगोबा झालाय, बोलायचा प्रयत्न करतोय. अगदी व्यवस्थित वाढतोय तो.

बाळ नीट निरोगी आहे की नाही, आईच्या प्रकृतीला काही धोका नाही ना, तिला कोणत्या विशेष औषधांची, पुरवणी घटकांची आवश्यकता आहे का, हे पाहणं अत्यावश्यक आहेच. विशेषकरून काही गंभीर व्याधी वा व्यंग असेल तर योग्य कालावधीत त्यानुसार कृती करता येते, म्हणून या चाचण्यांचं, तपासण्यांचं महत्त्व. परंतु, या सगळ्यात बाळंतपणाचा, नवनिर्मितीचा, आनंदच दूर गेलाय असं वाटायला लागलंय. एक तर आता कुटुंब नियोजनामुळे, दिवस गेल्याचं आश्चर्य वगैरे आईबापालाच वाटत नाही. नियोजनाची साधनं थांबवलीत, त्यामुळे आता केव्हाही हे कळणारच, इतकं ते वेळापत्रकासारखं होऊन गेलेलं असतं. लगेच घरी ‘पे्रग्नन्सी किट’ आणून खरोखरच गर्भ आहे की नाही की नुसताच ‘फॉल्स अलार्म’, याची स्वत:च खात्री करायची. मग स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नाव नोंदवायचं. डॉक्टर निवडतानाही सगळी चौकशी करूनच ठरवायचं. मग नऊ महिने संपेपर्यंत सतत बाळाचे ठोके, वाढ किती नि कशी होतेय याची तपासणी करत राहायची. बाळाचा जन्म ही एक गोड बातमी व्हायच्या ऐवजी निवडणुकीच्या एक्झिट पोलने आधीच वर्तवलेल्या निकालासारखी अपेक्षित आणि नीरस होऊन गेलीय, असं वाटायला लागलंय.

रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी हे आवश्यक आहेच, त्याने अनेकदा आधी उपचार/उपाय करून पुढचे दुष्परिणाम टाळता येतात, हे खरंच. आणि ते न टाळण्याजोगंही आहेच. (अर्थात अनेक वेळा, अगदी परदेशात अत्याधुनिक उपकरणांच्या आधारे तपासण्या करूनही रोगट वा विकलांग मूलही येतंच जन्माला. निसर्गापुढे हात टेकायचे आणि आल्या परिस्थितीला सामोरं जायचं, हा एकमेव मार्ग असतो या परिस्थितीत जन्मदात्या आईबापासमोर.) अनेकदा ओळखीचा डॉक्टर असला तर मुलगा वा मुलगी हेही आधीच माहीत असतं. त्यामुळे बाळाच्या जन्मातला वाट बघण्याचा, आश्चर्याचा घटक मागे पडलाय, एवढंच.

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात असे कित्येक आनंद मागे पडतायत. स्मरणरंजनात रमणे हा वेळ घालवायचा चांगला मार्ग आहे म्हणतात. त्याची मजा अशी असते, की चांगलं तेच आपल्याला आठवत राहतं, वाईट आपण मेंदूच्या मागच्या कप्प्यात सारलेलं असतं. बाळाच्या जन्माच्या वेळचे, गर्भारपणातले छान क्षण सर्वांनाच लक्षात राहतात. पण कधी कधी याच बाळाने तोंडचं पाणी पळवलेलं असतं, डॉक्टर उपलब्ध नसल्याने वा निव्वळ माहिती नसल्याने बाळाच्या जिवावर बेतलेलं असतं, नियोजनामुळे फायदा झाला असता, असं नंतर वाटत राहिलेलं असतं. त्यामुळे, चाचण्या, अहवाल याच्या पलीकडे जाऊन आनंद शोधत राहिलं पाहिजे. काय, पटतंय ना?

Comments