भाषा समृद्ध करणारा संपादक

मराठी साहित्यविश्वातील मोजक्या साक्षेपी, चोखंदळ संपादकांपैकी एक असलेले राम पटवर्धन यांच्यासोबत एक युग संपल्याची प्रतिक्रिया संपूर्ण मराठी सारस्वतातून व्यक्त होते आहे. मौज किंवा सत्यकथा यांसारख्या 25-30 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मासिकाच्या संपादकाचे निधन झाल्याची मोठी बातमी का व्हावी, एखाद्या मासिकाचे संपादन करणे म्हणजे नेमके काय, असे प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडले असण्याची दाट शक्यता आहे. जिथे मुळात मासिके, पाक्षिके, एवढेच काय वर्तमानपत्रांतल्या रविवारच्या पुरवण्याही वाचण्याचे कष्ट घेतले जात नाहीत, तिथे या संपादकांचे महत्त्व कळणेही कठीण. लेखकांची नावेही ठाऊक नसण्याच्या जमान्यात संपादकाचा उदोउदो नवलाचा वाटणे साहजिक. म्हणूनच, एकच कथा सहा-सात वेळा नव्याने लिहून काढायला सांगणारे, कथा आवडली तर ‘वा!’ एवढ्या एकाच शब्दात कौतुक करणारे, चौफेर वाचता वाचता त्यातले लक्षवेधी लेखक निवडून त्यांना लिहिते करणारे, सत्यकथेमधून जितक्या विविध विचारांची अभिव्यक्ती होऊ शकेल त्या विषयांचा शोध घेणारे संपादक म्हणून पटवर्धन लक्षात राहतील. चाळीसएक वर्षे त्यांनी मौजमध्ये व्यतीत केली. अत्यंत साध्या कार्यालयात श्री. पु. भागवतांसोबत पटवर्धन बसत. संध्याकाळी त्यांच्याकडे अनेक उदयोन्मुख, उत्साही तसेच मान्यवर लेखकांच्या गप्पा रंगत.

या गप्पांमध्ये पटवर्धन फार बोलत नसत, मात्र नीट ऐकत नक्की असत. ऐकता ऐकता हातातल्या पेन्सिलीने समोरच्या कागदांवर खुणा करणे सुरू असे. कोणतेही साहित्य त्यांच्याकडे आल्यावर त्याच्याविषयी लेखकाकडे पत्र पाठवून मत कळवण्याची त्यांची पद्धत होती. अनेक लेखकांकडे पटवर्धनांची अशी अनेक पत्रे सापडतील. मात्र, हे मत जरी नकारात्मक असले तरी लेखकाला नाउमेद करणारे नसे, हे निश्चित. त्यालाही त्यांचे मत बहुतेक वेळा पटलेलेच असे आणि म्हणूनच तो कथा वा कविता पुन्हा-पुन्हा लिहिण्यास तयार होई. या प्रक्रियेतून तावून सुलाखून बाहेर पडलेली कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली की त्या कष्टांचे चीज होई. यात लेखकाचा विकास होतच होता; परंतु वाचकाला उत्तम असे साहित्य वर्षानुवर्षे वाचायला मिळत असे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रामुख्याने सत्यकथा मासिक वा मौजचे दिवाळी अंक वाचून आपली अभिरुची विकसित झाल्याचे नाकारणारा वाचक महाराष्‍ट्रा त विरळाच म्हणावा असा. पटवर्धनांच्या तालमीत लिहू लागलेल्या ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी पटवर्धनांचे असणे फार वेचक शब्दांत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, ‘हा ताठ मानेचा, ताठ कण्याचा, प्रसन्न पण साहित्यासंबंधी कठोर मर्मदृष्टी असणारा, सुंदर, तिरक्या वळणाचे अक्षर असलेला, मस्त गप्पा मारणारा, प्रभावी वक्तृत्वाची देणगी असलेला वेगळाच संपादक होता... ते गेले, बेशुद्ध अवस्थेतच गेले. पण त्या सीमारेषेवरही त्यांना पुन्हा तो जुना काळ, ज्या काळाने आम्हाला श्रीमंत केले, तो काळच आठवत असेल. आणि ती बेशुद्धीतली शुद्धी त्यांच्या नसानसांतून वाहत असेल.’

हा आपल्या सर्वांना श्रीमंत करणारा काळ हळूहळू लोप पावतो आहे, त्या काळाला झळाळी प्राप्त करून देणारे दिग्गज लेखक/कलावंत काळाच्या पडद्याआड चालले आहेत. नवीन निर्माण होतेच आहे, परंतु त्याला संपादकाची अशी विशिष्ट दृष्टी लाभण्याची संधी फारशी मिळत नाही. एखादी कलाकृती चांगली वा वाईट ठरवणे व्यक्तिसापेक्ष असतेच, परंतु त्यापलीकडे जाऊनही अभिजाततेचे काही निकष असतात, जे कालातीत असतात. ते जाणून घेऊन, एखाद्या कलाकृतीत या अभिजाततेची बीजे लपलेली आहेत हे कळून ती कशी अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतील, हे पाहणे संपादकाचे काम असते. पटवर्धनांनी मौज वा सत्यकथा या नियतकालिकांचेच नव्हे तर मौज प्रकाशन गृहातर्फे प्रसिद्ध होणा-या अनेक महत्त्वाच्या पुस्तकांवर हे संस्कार केले. मौजची पुस्तके जशी विशिष्ट छपाई व त्याच्या मुखपृष्ठामुळे ओळखली जात, त्यात मुद्रणदोष वा शुद्धलेखनाची चूक औषधालाही नसे, तसेच एखादाही शब्द वावगा वा अस्थानी वा टाळण्याजोगा नसे. याला श्रीपुंइतकेच पटवर्धनही कारणीभूत होते. पटवर्धन अत्यंत साधे जीवन जगले, त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात अनेक नामवंत लेखक मंडळी येऊन पुस्तकांवर चर्चा करत. त्यातून त्यांचे लेखन नवे वळण घेईच, परंतु आयुष्यही समृद्ध होऊन जाई. सुमारे 15/16 वर्षांपूर्वी ते त्यांच्या मुलांजवळ ठाण्याला राहायला गेले. पटवर्धनांनी संपत्ती जमवली नाही, मराठी साहित्यविश्वाचा कारभार पाहता ते शक्यही नव्हते. परंतु त्यांनी मराठी शिकवले ते शेकडो विद्यार्थी, त्यांनी ज्यांच्यावर संपादकीय संस्कार केले असे अनेक लेखक आणि अर्थातच जगाच्या कानाकोप-यात विखुरलेले मराठी वाचक यांना त्यांनी अतिशय समृद्ध केले, यावर दुमत नसावे.

Comments

  1. मृण्मयी, पटवर्धनांनी लेखकांना पाठवलेली पत्र हा कायमच खूपच चर्चेचा विषय राहीलेला आहे, अगदी मी क़ॉलेजात असताना, पटवर्धन सत्यकथाचे संपादक असताना ते आजतागायत. मला वाटते ही विखुरलेली पत्रे हि एक भाषेच्या दृष्टीने आणि संपादनाच्या दृष्टीने महत्वाचा ठेवा आहे. त्यातवा बराचसा नष्टही झाला असेल अनेक लेखकांबरोबर. पण जो अजूनही काही शिल्लक असेल तो का जपू नये. मला वाटते मृण्मयी तू हे काम हातात घे. खूपच कठीण व वेळखाऊ आहे. कंटाळा येईल. पण तरीही जमेल तेव्हढे कर. तुझ्या मामांना तुझ्याकडून हीच खरी श्रध्दांजली ठरेल. मिलिंद कोकजे

    ReplyDelete

Post a Comment