उमजून घेणारा नवरा

ती सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातली जेमतेम विशीची एक मुलगी. तिचं लग्न ठरलं मुंबईतल्या एका देखण्या, उमद्या तरुणाशी. लग्नाच्या आधी फार तर दोनतीनदा भेटले असतील दोघे. त्याला लक्षात आलं, ती खूप साधी आहे. आणि घरनं फार बंधनं आहेत तिच्यावर. तिच्याजवळ तिचा मोबाइलसुद्धा नव्हता. त्यामुळे तिच्याशी बोलायचं तर तिच्या भावाच्या मोबाइलवर फोन करावा लागे. चांगली गोष्ट म्हणजे ती शिकत होती, संगणकविषयक डिप्लोमा करत होती. हाही त्याच क्षेत्रातला. पण मुंबईत राहिल्याने तसा आधुनिक, मित्रमैत्रिणींचा गोतावळा असणारा. घरी दोघे भाऊच होते, तरी मुलींशी कसं वागायचं/बोलायचं ते माहीत होतं त्याला. 
त्यांच्या लग्नाचा सोहळा गावच्या पद्धतीने दोनतीन दिवस सुरू होता. पूजा, गोंधळ पार पडला. आणि दोघे जवळच महाबळेश्वरला फिरायला गेले. तिथे तिच्यासोबत वेळ काढल्यावर त्याला ती अधिकच कळत गेली. ती आतापर्यंत कधीच ब्यूटी पार्लरमध्येही गेली नव्हती. तिच्या कपड्यांचे रंगही भडक होते, मग हा तिला चांगल्या दुकानात घेऊन गेला. तिला आणि त्याला, दोघांनाही आवडतील असे दोन ड्रेस घेऊन दिले. महाबळेश्वर म्हटलं की रंगीबेरंगी आणि भरपूर चपला आल्याच. तिला दोन चपला आवडल्या. तिने त्याला विचारलं, ‘कोणती घेऊ.’ 
तो म्हणाला, ‘तुला कोणती जास्त आवडलीय?’ ती म्हणाली, ‘दोन्ही.’ ‘मग दोन्ही घे.’ ‘नको नको, एक पुरे.’ शंभरसव्वाशे रुपयांची खरेदी त्याच्यासाठी क्षुल्लक बाब होती, पण तिला त्याचं किती कौतुक होतं.
लग्नानंतर तो लवकर परतला, सुटी फार नव्हती. पण तिला इतक्यात माहेरी जाता येणार नाही, म्हणून दोन दिवस तिला आईकडे पाठवलं. मग ती मुंबईत आली. सर्वात आधी तिला मोबाइल घेतला, पॅन कार्ड करायला टाकलं, मग बँकेत खातं उघडलं. तिच्या हातात हजारेक रुपये देऊन ठेवले. आता तिच्या डिप्लोमाच्या निकालाची वाट पाहतायत. तिला शिकायचं असेल तर शिकू दे, छोटीमोठी नोकरी करायची असेल तरी हरकत नाही, असं त्याला वाटतंय. इतका ‘सुलझा हुआ’ नवरा मिळणं ही किती आनंदाची गोष्ट नै का?

Comments