तिळा तिळा, दार उघड

हॅरी पॉटरचे सगळे चित्रपट पाहिलेली, त्यातले संवाद तोंडपाठ असलेली अनेक मुले आपल्याला माहीत असतात; पण हॅरी पॉटरच्या कादंब-या वाचलेल्या मुलांची संख्याही लक्षणीय आहे, हे आपल्याला कदाचित माहीत नसते. जे. के. रोलिंग नामक ब्रिटिश लेखिकेने हॅरी पॉटरच्या सात कादंब-या लिहिल्या आहेत आणि त्यातल्या काही तर 600 वा त्याहून अधिक पानांची आहेत. सर्व पुस्तकांवर चित्रपट आलेले आहेत आणि ते टीव्हीवर कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर सतत दाखवले जात असतात. तरीही हॅरी पॉटरच्या पुस्तकांना वाचनालयांमधून आणि पुस्तकांच्या दुकानांमधून सतत मागणी असते. म्हणजेच मुलांना चांगले, उत्कंठावर्धक, थरारक, रहस्यमय असे काही दिले तर ती पुस्तकेही वाचतात, हे यातून स्पष्ट होते.

अर्थातच अनेक मुले अशीही आहेत की ज्यांना शाळेत शिकतात म्हणून साक्षर म्हणायचे, नाहीतर शालेय पाठ्यपुस्तके वगळता इतर कोणत्याही छापील अक्षरांशी त्यांचा संबंध येत नसतो. सर्वच्या सर्व मुलांनी सतत वाचतच राहिले पाहिजे, अशी कोणाचीच अपेक्षा नाही; परंतु अशा न वाचणा-या मुलांपैकीही अनेकांना वाचनाकडे वळवणे शक्य आहे, त्यांना आवडतील आणि गुंतवून ठेवतील अशी पुस्तकेही आहेत. ब-याचदा त्यांना कोणती पुस्तके वाचायला द्यावीत, किंबहुना कोणती पुस्तके त्यांना सहज हाती लागतील, जेणेकरून मुले ती चाळायला घेतील आणि त्यांच्यात गुंततील, हे आपल्याला ठाऊक नसते. म्हणूनच काही पुस्तकमित्रांनी सुचवलेली ही काही पुस्तके. यात अर्थातच वयानुसार, आवडीनुसार ही पुस्तकं बदलू शकतात; पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

सुरुवात करूया मराठी पुस्तकांपासून. मुलांना आपण दोन-अडीच वर्षांपासून मराठी किंवा देवनागरी वाचायला शिकवू शकतो. (लिहिण्याची घाई मात्र करू नका.) त्या वयात नवीन शिकण्यात अडसर नसतात आणि देवनागरी जशी लिहिली जाते तशीच वाचली जाते. आई लिहिले असेल तर मूल आईच वाचते आणि त्याला आई असा अर्थ लगेच कळतो. हेच इंग्रजी किंवा रोमन वाचताना एम ओ टी एच ई आर मदर म्हणजे आई असा हा काहीसा कठीण प्रवास असतो. त्यामुळे लवकर वाचायला शिकल्यास मुले त्या वयाच्या गुणधर्मांनुसार दिसेल ते वाचत सुटतात. दुकानांची नावे, रस्त्यांची नावे, जाहिराती सगळे त्यांना वाचावेसे वाटते कारण त्यांना ते वाचता येत असते, कळत असते.

त्यामुळे साधारण अक्षरओळख झाल्यानंतर इसापनीती, पंचतंत्र, जातककथा, सुलभ रामायण आणि महाभारत ही पुस्तके त्यांना गोष्टींच्या, कल्पनेच्या जगात घेऊन जायला मदत करतात. शिवाजीच्या गोष्टी मुलांना ऐकायला, पाहायला जशा आवडतात तशाच वाचायलाही. पुस्तके वाचू लागली की त्यांना लक्षात येते की प्रत्यक्ष पडद्यावर दिसते त्यापेक्षा पुस्तकात कितीतरी अधिक धमाल आहे. तसेच पुस्तक कधीही, केव्हाही, कुठेही बसून/लोळून वाचता येते.

श्यामची आई आता जुने झाले; परंतु अनेक मुलांसाठी त्यातही अजून मजा असू शकते. त्यातली भाषा सुलभ आणि शैली सोपी आहे. गोट्या आणि फास्टर फेणे आताच्या पिढीतील मुलांना कदाचित मागासलेले वाटतील (एक पिढी तर फाफेच्या त्या सुप्रसिद्ध ट्टॉकवर कसली फिदा होती!); पण त्यांना बोक्या सातबंडे नक्की आवडेल. त्याचाही चित्रपट त्यांनी पाहिला असेल तर त्यांनी पुस्तक वाचायला आणखी चालना मिळेल. चिंटू या लोकप्रिय चित्रकथेची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत आणि ती मुलांना मूड फार लवकर सुधारू शकतात. अकबर बिरबलची मजा इतक्या शतकांनंतर कायम आहे. चांदोबा, चंपक, ठकठक, अमर चित्र कथा, किशोर, आनंद ही नियतकालिके विकत नाही घेतलीत तरी वाचनालयातून आणून नक्की वाचायला देऊ शकता.

मुलांना कवितेची ओळख करून द्यायची असेल तर अनंत भावे, विंदा करंदीकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर यांचे काव्यसंग्रह उत्तम. विंदांचा अजबखाना सर्व वयाच्या मुलांना आवडतो.

इंग्रजीत त्या मानाने मुलांसाठी प्रचंड साहित्य लिहिले जाते. किंबहुना अनेक मोठे, गंभीर समजले जाणारे लेखकही आवर्जून मुलांसाठी उत्तम लिहितात.

यात अभिजात म्हणावी अशी एनिड ब्लायटनलिखित फेमस फाइव्ह, सिके्रट सेव्हन या पुस्तकांच्या मालिका, अरेबियन नाइट्स आहेत. तोत्तोचान या जपानी मुलीची अनेक भाषांमध्ये पोहोचलेली गोष्ट मुले आणि पालक दोघांनाही मजेची वाटते. टॉम सॉयर आणि त्याचे गंगाधर गाडगीळांनी केलेले धाडसी चंदू मुलगे अतिशय प्रेमाने वाचतात.

दहाबारा वर्षांच्या मुलांना टू किल अ मॉकिंगबर्ड ही कादंबरी जरूर वाचायला द्यावी, वाटल्यास तो चित्रपटही दाखवावा. रोआल्ड डालच्या भयकथा मुले उत्कंठेने वाचतात. बंगाली गुप्तहेर ब्योमकेश बक्षी आणि फेलूदा यांच्याही पुस्तकमालिका मराठीत आहेत, त्या मुलांना नक्कीच आवडतील.

तसेच सलमान रश्दीचे हारून अँड दि सी ऑफ स्टोरीज हेही एक धमाल पुस्तक आहे. हार्डी बॉइज, द डायरी ऑफ अ विम्पी किड, ट्रेझर आयलंड ही पुस्तके आणि मॅजिक ट्री हाउस, अ‍ॅस्टेरिक्स, डॉ. सूसच्या गोष्टी या पुस्तकमालिका मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. चिकन सूप फॉर द सोल हीदेखील टीनएजर मुलांसाठी एक उत्तम निवड आहे. यातही बरीच वेगवेगळी पुस्तके आहेत आणि त्यातून नकळत त्यांच्यावर चांगले संस्कार होत राहतात.

सर्व वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्याही उत्तम असतात, त्यातून कळत नकळत मुलांना चालू घडामोडींबाबतही कळत राहते. एखाद्या वृत्तपत्राची पुरवणी विशेष चांगली वाटल्यास त्या दिवशी ते वृत्तपत्र घेण्याची तयारी दाखवा, मुलांना वाचायला प्रोत्साहन द्या. आपल्या परिसरात, परिसराविषयी लिहिली गेलेली पुस्तके मुलांना आवर्जून द्या, त्यातील जागा, व्यक्तिरेखा, भाषा त्यांनी आपलीशी वाटेल.

पुस्तके महाग असतात हा अत्यंत चुकीचा समज आहे. आणि ती विकतच घ्यावी लागतात, असेही नाही. वाचनालये हा उत्तम पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. किंवा काही मुलांना एकत्र करून छोटे वाचनालय घरच्या घरी करता येऊ शकते. नॅशनल बुक ट्रस्ट, तुलिका बुक्स, ज्योत्स्ना प्रकाशन आदींची पुस्तके उत्तम चित्रे असलेली व कमी किमतीत उपलब्ध असतात. पुस्तक प्रदर्शनांच्या वेळी मोठ्या सवलती असतात, अशा वेळी आवर्जून पुस्तके घ्यावीत.

असा हा पुस्तकांचा खजिना. यात आपण आपल्याला लहान असताना आवडलेली पुस्तकेही घालू शकतो. तो मुलांसमोर खुला करण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे. घोड्याला जसे आपण पाण्याशी नेऊ शकतो; पण प्रत्यक्ष पाणी त्यालाच प्यावे लागते, तसे वाचावे लागेल मुलांनाच. पण त्यांना पुस्तकांपाशी न्यावे तर लागेलच.

Comments

  1. माझी ऍलिस नाही होय तुझ्या यादीत?
    :(

    ReplyDelete

Post a Comment