ज्योडी बॅक्स्टर आणि त्याचा बाप पेनी, आठ फॉरेस्टर भाऊ, ऑलिव्हर आणि हुतोआजी, बावखोल, फ्लॅग, थोटय़ा अस्वल ही पाडसमधली पात्रं पार दूर दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा परिसरातली आहेत असं आम्हा भावंडांना कधी वाटलंच नव्हतं. आमच्या आप्पामामाने लिहिलेल्या एका पुस्तकातली, अगदी आमच्या आसपासची ती खरीखुरी माणसं/जनावरं आहेत असाच अनेक वर्षांपर्यंत आमचा समज होता. मोठं झाल्यावर, पाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्ज या लेखिकेच्या द यिअरलिंग या पुस्तकाचा राम पटवर्धन यांनी केलेला अनुवाद आहे, हे कळालं, तेव्हा मामाबद्दलचा आदर काही पटींनी वाढला फक्त. वाढत्या वयातल्या मुलाची, ज्याला आजकाल कमिंग ऑफ एज असं म्हटलं जातं, अशी ही गोष्ट. आनंद, दुख, थरार, संताप, मस्ती, शोक, अशा वेगवेगळय़ा भावनांचं अत्यंत सशक्त मराठीत दर्शन घडवणारं हे पुस्तक. पटवर्धनांनी आणखी अनुवाद का नाही केले, असा राहूनराहून प्रश्न पाडणारं.
मामा गेली काही वर्षं आजारीच होता, रुग्णालयात येऊनजाऊन असायचा. तरीही बऱयापैकी शेवटपर्यंत त्याचा मेंदू तल्लख होता. त्याला वाचता येत नसे, पण मामी, श्रीरंग, रेणुका कोणीतरी त्याला वाचून दाखवत असत.
पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत मामा चुनाभट्टीला राहायचा. समर्थ नगर ही मुंबईतली खूप जुनी चाळवजा वसाहत होती. त्यात दोन खोल्यांचं घर, पुढे खूप मोठी सामायिक गॅलरी. मागची स्वयंपाकघरालगतची गॅलरी चिंचोळी होती. इमारतीला मोठी मस्त गच्ची होती. बाहेरच्या खोलीत पलंग आणि कपाटं. या पलंगावर कायम पुस्तकं, कागद पसरलेले आणि त्यातच बसून मामा हातात पेन्सिल घेऊन काहीतरी लिहित बसलाय, हे दृश्य खूप ओळखीचं. बऱयाचदा कोणी लेखक पुस्तकाविषयी चर्चेला आले की जागा अपुरी वाटली तर चक्क गच्चीत जाऊन बसत. मीना प्रभू, ज्यांच्या माझं लंडनपासून त्या मामाच्या साहित्यिक आणि वैयक्तिक कुटुंबात सामील झाल्या, त्यांची ही गच्ची आवडती होती. गच्चीत जाऊन छडीचा मार खाल्ल्याशिवाय लेखक होता येत नाही, हे त्यांचं आवडतं मत होतं.
पंचवीस तीस वर्षांपूर्वी लेखक कवी वगैरे सेलिब्रिटींमध्ये मोडायचे. मामाचं चुनाभट्टीचं घर किंवा गिरगावातलं गोरेगावकर लेनमधलं मौजचं जुनाट कार्यालय या ठिकाणी हे सेलिब्रिटी हमखास भेटायचे. आम्ही भावंडं कॉलेजला जायला लागल्यावर मौजच्या कार्यालयात आवर्जून जायचो, तिथल्या पुस्तकांचा सहवास आम्हाला फार हवाहवासा वाटे. मौजच्या कार्यालयाला मंगळवारी सुट्टी असे. मग एखाद्या मंगळवारी मामा बोरिवलीला येई किंवा अनायासे सुटी असली तर आमची स्वारी तिथे जाई. माझ्या बाबांचं आणि त्याचं प्रचंड सख्य होतं, दोघं खूप वेळ बोलत बसत.
मामाच्या वीसपंचवीस भाचरांपैकी असं एखादंच असेल ज्याला वाचनाची आवड नाही. बाकीचे आम्ही सगळे जेवतानासुद्धा हातात पुस्तक घेऊन बसणारे. मी लिहायला लागल्यावर मामाची पावती एका शब्दाची असली तरी तिचं अप्रूप होतं. अगदी हल्ली, अंतर्नादमध्ये मी महाराष्ट्र टाइम्सचे दिवस लिहिल्यानंतर मामीने ते त्याला वाचून दाखवलं. छान झाल्याचं तो म्हणाला, हे कळल्यावर भरून पावले. मलाच नव्हे तर प्रतिष्ठित व प्रस्थापित लेखकांनाही पटवर्धनांनी कथा/कविता चांगली म्हणणं किती महत्त्वाचं वाटे, याची उदाहरणं कैक लेखांमधनं आपण सर्वांनीच वाचली आहेत.
मामा हसायचा फार कमी. म्हणजे त्याला विनोदाचा सेन्स फार उत्तम होता परंतु हास्याचे फवारे वगैरे त्याच्या सौम्य प्रकृतीला मानवणारे नव्हते. तो नुसता हं करे, त्यावरून आपण समजून घ्यायचं.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी सत्यकथा मौजेचे नियमित लेखक. मामा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ मौजचं संपादकपद भूषवलं. त्यांना काल सकाळी मामा गेल्याचा एसएमएस केला तर त्यांनी उलटा फोन केला. किती बोलू असं त्यांना झालं होतं. मग संध्याकाळी निवांत त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले, ‘पटवर्धनांकडे एकदा एका नवशिक्या कवीने एक कविता दिली. त्यावर ते फक्त वा! म्हणाले. म्हणजे या ‘वा!’चा अर्थ कळणं किती महत्त्वाचं होतं बघा. डोह लिहिताना पटवर्धनांनी खूप उत्साह दिला. त्यांनी औदुंबरला यावं, काही वेळ घालवावा, अशी माझी खूप इच्छा होती, पण ते काही जमलं नाही, याची त्यांना फार खंत वाटते. मौजच्या दिवाळी अंकात दरवर्षी एक याप्रमाणे लेख कुलकर्णी यांनी लिहिले, त्याचीच पुस्तके झाली. ‘डोह’मधला ‘वारा वाहे रुणझुणा’ हा लेख जड वाटतोय, त्याचा पुनर्विचार कराल का अशी सूचना पटवर्धनांनी केली. परंतु, कुलकर्णी यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी पटवर्धनांनी लेख आवडल्याचे पत्र लिहिले व तो प्रसिद्धही झाला. एखाद्या संपादकाचे मत कसे बदलू शकते, याचे हे उदाहरण. मौजेतून निवृत्त झाल्यानंतर एका मुलाखतीत पटवर्धनांनी म्हटले होते, की श्रीनिवास विनायक कुलकर्णी व शरच्चंद्र चिरमुले हे त्यांचे आवडते लेखक आहेत.
मामा नऊ भावंडांमधला सर्वात मोठा. त्यामुळे त्याला कुटुंबात मोठा मान होता. त्यात मौजचा संपादक असल्याचेही भान हेते. त्याचे 60, 70, 75, 81 असे वाढदिवस आम्ही खूप छान साजरे केले. परंतु, त्याचा आम्हा भाचरांना दरारा वाटत नसे. उलट चुनाभट्टीच्या घरी जाऊन आवडती पुस्तकं वाचणे व घरी घेऊन येणे हा आनंदाचा भाग होता. मौजेच्या कार्यालयातही मी कधीमधी जात असे.
मामा ठाण्याला राहायला गेला नि बऱयापैकी साहित्यिक वर्तुळाच्या बाहेर फेकला गेला. चुनाभट्टी खूप मध्यवर्ती होते, त्यामुळे त्याच्याकडे सतत लेखकु मंडळींची येजा असे. त्याचे पुस्तक संपादनाचे कामही तिथे जोरदार सुरू होते. ठाण्याला गेल्यावर कालांतराने व वयोपरत्वे त्याची प्रकृती साथ देईनाशी झाली. ऍलोपथीची औषधे तो घेत नसे, त्यामुळे होताहोईतो होमिओपथी व संजीवनीच्या औषधांवर वेळ निभावली जाई. हॉस्पिटल, सलाइन, इंजेक्शने वगैरेंचा त्याला मनापासून तिटकारा होता. मात्र त्याला गेल्या दोन वर्षांत अनेक दिवस रुग्णालयात काढावेच लागले. गेला त्याच्या आधी दोनतीन दिवस तर तो बेशुद्धच होता. आयसीयूत होता. प्रयत्नांची शर्थ केली, परंतु वय नि क्षीण झालेल्या शरीरापुढे त्यांचे काही चालेना.
मुलुंडमधीत एका कार्यक्रमात मीना प्रभू यांची मुलाखत वीणा पाटील यांनी घेतली त्यात त्यांनी पटवर्धनांनी आपले लिखाण कसे सुधारले ते सांगीतले. पटवर्धन त्या कार्यक्रमाला हजर होते. मीमा प्रभू म्हणाल्या त्यांच्या एका पुस्तकानंतर पुढच्या पुस्तकाकरता त्यांना मार्गदर्शनाकरता फोन केला तेव्हा ते त्यांना म्हणाले की माझी तुम्हाला आता आवश्यकता नाही, तुम्ही योग्य त्या उंचीवर पोचल्या आहेत
ReplyDelete.
फारच छान लिहिले आहेत. आणखी लिहायला हवे होते.
ReplyDeleteफ़ार सुंदर, वैयक्तिक जिव्हाळ्यामुळे एक वेगळीच किनार मिळाली आहे राम पटवर्धनसरांच्या एरवीच्या ओळखीला.
ReplyDeleteIts too short to register, Mrnmy. This isnt fair.
ReplyDelete@ पटवर्धनांनी आणखी अनुवाद का नाही केले, असा राहूनराहून प्रश्न पाडणारं.
ReplyDeleteमृण्मयी , अप्पांनी काही रशियन कथांचा अनुवाद केला होता नि त्या सत्यकथेतून अनुक्रमे प्रसिद्धही झाल्या होत्या .
त्या शोधून काढून त्याचं संकलन आणायचा मानस ही होता !!