वाचक सोबत्यांचे ऋण

बघता बघता, लिहिता लिहिता, वाचता वाचता तीन वर्षं सरली आणि मधुरिमाने चौथ्या वर्षात पदार्पण केलंसुद्धा. या प्रवासात तुम्हा वाचक मित्रमैत्रिणींचा सहभाग खूप मोलाचा होता आणि पुढच्या वाटचालीतही राहणार आहे. ‘एकला चालो रे,’ किंवा ‘आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याविना,’ हा आव काही विशिष्ट परिस्थितीत योग्य असतो, परंतु आपल्या लेखक वाचक प्रवासात तुमच्या सोबतीशिवाय मजा नाही राव. ‘अंक छान झालाय पण अमुक लेख काही पटला नाही,’ किंवा ‘अशी कशी मतं मांडता तुम्ही,’ किंवा ‘आजचा लेख वाचताना अगदी माझ्या मनातल्या भावना वाचतेय/वाचतोय असं वाटलं,’ अशा प्रतिक्रियांमुळेच दर वेळचा अंक तयार करताना हुरूप येतो, दिशा मिळत जाते, उत्साह वाढतो. एखाद्या अंकाला फार प्रतिसाद मिळाला नाही, की मनात शंका येते, काय बरं चुकलं असावं. काय वेगळं करता येईल म्हणजे वाचकांना आवडेल, ते इतरांना वाचायचा आग्रह करतील, भरभरून प्रतिसाद पाठवतील, हे मनात येत राहतं. म्हणूनच तर प्रतिसाद आमच्यापर्यंत पोचवण्याचे एसएमएस, दूरध्वनी, पत्र, ई-मेल, फॅक्स असे शक्य ते सर्व मार्ग आम्ही खुले ठेवले आहेत.

ही आपली मूल्यवान सोबत कायम असते, म्हणून आजच्या अंकाच्या अतिथी संपादक सोनाली कुलकर्णी यांनी भागीदारी/जोडीदारी, पार्टनरशिप वा टीम स्पिरिट, ही संकल्पना विशेषांकासाठी सुचवली, तेव्हा ती प्रत्यक्षात आणायला खूप भारी वाटलं. त्यांनीच त्यांच्या काही सुहृदांना या विषयावर लिहिण्याचे सुचवले व त्या सर्वांनीही वेळेवर आपले मनोगत पाठवून खूप मोलाची साथ दिली. विज्ञानविषयक लिखाण करणारे सुबोध जावडेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सूनबाई डॉ. मुग्धा, हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आमटे यांच्या सूनबाई समीक्षा, संगीत नाटकांना नवी संजीवनी देणारे राहुल देशपांडे व त्यांची टीम... प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रातील भागीदारीबद्दल, टीमबद्दल भरभरून लिहिलंय तर चिन्मयी सुमीतने तिच्यावर प्रभाव पाडणार्‍या दीदीविषयी. अभिनेता अतुल कुलकर्णी व त्यांचे जिम इन्स्ट्रक्टर शैलेश परुळेकर यांचे मनोगतही वेगळेच सख्य वर्णन करणारे. सोनाली व या लेखकांचे खूप मनापासून आभार. या प्रत्येकाचा भागीदार - पार्टनर वा टीम वेगवेगळे आहेत, त्यांचं काम वेगळं आहे, पण ‘आपण’ आहोत म्हणून हे शक्य आहे, याची अत्यंत नम्र जाणीव त्यात आहे. ही जाणीव आपल्या सर्वांच्याच मनात, आत खोल असते, ती इथे शब्दांत मांडलेली आहे एवढंच. अंक कसा वाटला, ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. तुमच्या जीवनातील अशा भागीदारीबद्दल, जोडीदारीबद्दल वाचायचीही खूप उत्सुकता आहे.

वर्धापन दिवसापर्यंतचा प्रवास सर्वांच्या साथीमुळे, सहकार्यामुळेच फलदायी झालेला असतो. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो.

कळावे, लोभ आहेच, तो वाढत राहावा, ही विनंती.

Comments