'त्या'चीही तारेवरची कसरत

तो मूळचा मुंबईचा, पण आता बंगळुरूमध्ये काम करणारा मित्र तिला बर्‍याच दिवसांनी भेटला होता. तो दोन वर्षांपासून त्या शहरात होता, बायको नि मुलं मात्र मुंबईत होती. कसं वाटतं एकटं राहायला, तेही एकदम परक्या शहरात असं तिने विचारल्यावर तो म्हणाला, ‘खरं सांगू का, रागावशील तू कदाचित. पण शांत निवांत वाटतं. डोक्याला ऑफिसमधल्या कामाशिवाय इतर भुंगे कमी असतात. कधी जाणार, कधी येणार, हे आण, ते आण, आज पाहुणे येणार आहेत, इकडे जायचंय, हे बिघडलंय, ते तुटलंय वगैरे वगैरे मागे नसतं. म्हणजे त्या सगळ्याचा त्रास होतो असं नाही, पण बर्‍याचदा अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करताना ते नसेल तर बरं वाटतं, कामावर नीट लक्ष देता येतं.’ ती हे ऐकून विचारात पडली.
म्हणजे बायांसाठी लग्न की करिअर हा प्रश्न जसा कळीचा बनलाय, सांसारिक जबाबदार्‍या सांभाळता सांभाळता नोकरी करायची, ही तारेवरची कसरत होऊन बसलीय, तसंच पुरुषांनाही ते वाटू लागलंय की काय? नोकरी करणारी बायको असलेल्या पुरुषाला घरातही अनेक कामांमध्ये वाटा उचलावा लागतो, लहानपणापासून आईने लावलेल्या (चुकीच्या?) अनेक सवयी मागे टाकून द्याव्या लागतात. उदा. गरम पोळी तव्यावरून ताटात पडणे, चहा प्याल्यानंतर कप तिथेच ठेवणे, अंघोळीला जाताना टॉवेल विसरणे, कपडे बदलल्यानंतर पँट/पायजमा तिथेच टाकून ठेवणे, उशिरा उठणे आदी गोष्टींची मुभा असणे, इत्यादी इत्यादी. मुलं झाल्यावर तर या जबाबदार्‍यांमध्ये भरच पडते.
अनेक बाबा मुलांना अंघोळी घालून तयार करून बसस्टॉपपर्यंत किंवा थेट शाळेत सोडायचं काम इमानेइतबारे करतात. शिवाय अनेक बाया जी कारणं सांगून लवकर घरी जातात किंवा दौरे टाळतात, ती कारणं देणं शक्य नसल्याने दिवसाचे दहाबारा तास ऑफिसात किंवा साइटवर किंवा फॅक्टरीत काढतात. या सगळ्यात घरनं दिवसभरात येणारे लहानमोठ्या समस्यांचे फोन असतातच. म्हणजे तो मित्र जे म्हणत होता, त्यात बरंच तथ्य आहे, असं तिला वाटायला लागलं.
तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलत होता तो, की तद्दन स्वार्थी विचार आहेत त्याचे?

Comments