काम करत राहा...

रात्री दहाच्या सुमारास काम अर्धवट टाकून, अतिशय आनंदात ती घरी आली. आत पाय टाकणार तितक्यात आईने सांगितलं, ‘पटकन कोपर्‍यावरनं दूध घेऊन ये, संपलंय.’ ‘नवर्‍याला का नाही सांगितलंस?’ ‘तो दमलाय.’ ‘नोकर?’ ‘मी विसरले.’ अशी उत्तरं ऐकून चिडचिडत तिने जाऊन दूध आणलं, आईसमोर टाकलं नि म्हणाली, ‘मला एक आनंदाची बातमी सांगायचीय, मला कंपनीचं अध्यक्ष नेमण्यात आलंय.’ तिचं अभिनंदन करण्याऐवजी आई म्हणाली, ‘ते सगळं बाहेर. घरात आलीस की तू आई, पत्नी, मुलगी आहेस, हे विसरू नकोस. डोक्यावरचा मुकुट बाहेर उतरवून घरात पाऊल टाकायचा, मी तर तो पाहिलाही नाहीये.’

हे संभाषण कोणत्याही चित्रपटातलं नाही. ते आहे पेप्सीकोच्या अध्यक्ष इंद्रा नूयी आणि त्यांच्या आईमधलं. इंद्राजींनी नुकतीच एका मुलाखतीत ही आठवण सांगितली. खेरीज त्या म्हणाल्यात, ‘व्यवसाय वा करिअर करणार्‍या महिलांना सगळं मिळालंय किंवा मिळतंय असं वाटणं चुकीचं आहे. घराकडे, म्हणजेच मुलांकडे व नवर्‍याकडे, दुर्लक्ष करत असल्याची अपराधी भावना कोणीही, कितीही प्रयत्न केले तरी, टाळू शकत नाही. म्हणजेच तुम्ही यशस्वी तरी व्हाल किंवा घर नीट सांभाळाल.’ दोन्हीचा समतोल साधणं अशक्य आहे, असंच त्यांनी सूचित केलंय. (मधुरिमामध्ये नुकतीच प्रसिद्ध केलेली ‘विवाह की करिअर’ ही कव्हर स्टोरी याच विषयाला तोंड फोडणारी होती.)

किती ओळखीची आहे ना ही भावना आपल्या सर्व जणींच्या? ऑफिसात मन लावून काम करायचं, बाई आहोत म्हणून कोणतीही तडजोड तर नाहीच करायची, पण सूटही नाही मागायची आणि घरी आलं की तो ‘मुकुट’ उतरवून पदर खोचून कामाला लागायचं. घरी कितीही मदतीला कोणी असलं तरी काही तरी असतंच ज्याच्याबद्दल आपल्याला अपराधी वाटतं. ऑफिसात कितीही मस्त काम केलेलं असलं आणि त्याची पावतीही मिळालेली असली तरी ही अपराधी भावना त्या यशावर मात करतेच करते. त्यावर उपाय काय? तर घरच्या सर्वांना घरकामात सहभागी करून घ्यायचं आणि जबाबदार्‍या वाटून घ्यायच्या. अर्थात सर्व सदस्यांची वयं, तब्येत वगैरे लक्षात घेऊनच हे निर्णय घ्यायचे.

आणि इंद्राजींच्या अनुभवावरनं एवढंच शिकायचं, अपराधी वाटून घ्यायचं नाही, सगळा दोष स्वत:वर घ्यायचा नाही आणि आपल्याला आवडतंय ते काम उत्तम प्रकारे करत राहायचं. हो ना?

Comments