फुटबॉल, ब्राझील आणि आपण

तुमच्या समोर हे सदर येईस्तो ब्राझीलमधल्या फुटबॉल विश्वचषकाचा विजेता ठरलेला असेल. चषक दक्षिण अमेरिकेत येणार की युरोपात जाणार, हे कळालं असेल. पण ज्यांनी ज्यांनी हा फुटबॉलचा उत्सव/कार्निव्हल, एक महिना अनुभवला, त्याचा आनंद लुटला ते अजूनही त्याच आनंदात डुंबत असतील. खरे तर, या वेळी खेळल्या गेलेल्या बहुतांश सामन्यांच्या वेळा आशिया खंडातल्या प्रेक्षकांसाठी फारशा योग्य नव्हत्या. सुरुवातीचे काही सामने रात्री साडेनऊला सुरू झाले खरे, पण नंतरचे बरेचसे मध्यरात्रीनंतर दीड वाजता खेळले गेले. ते तर संपायचेच सव्वातीनच्या सुमारास. किंवा क्वचित चार वाजताही. (आणि या पहाटे चारला संपलेल्या सामन्याचे वृत्तही ‘दैनिक दिव्य मराठी’ने केवळ तीनचार तासांच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवले होते.) तुमच्यापैकीही ब-याच जणांचा ११ वाजता दीड वाजताचा गजर लावून झोपायचं, उठून सामना पाहायचा, परत झोपायचं आणि सकाळी तांबारलेल्या डोळ्यांनी शाळा/कॉलेज/ऑफिस गाठायचं असा दिनक्रम असेल मागच्या महिन्यातला. दिवसातला मोकळा वेळ,  कामातून वेळ काढून रात्रीच्या सामन्यावर तावातावाने चर्चा करायची. जमल्यास क्षणचित्रं पाहायची पुन्हा एकदा टीव्हीवर. पुनर्प्रत्ययाचा आनंद लुटायचा एक मोठा मार्ग म्हणजे वृत्तपत्रांमधले सामन्यांचे वृत्तांत. बहुतेक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांचे प्रतिनिधी ब्राझीलला पाठवले होते. त्यांनी लिहिलेले वृत्तांत रात्रीच्या सामन्यातील चित्तथरारक आणि रोमांचक वगैरे क्षणांचा जशाच्या तसा अनुभव देणारे होते. खेरीज, सर्व वर्तमानपत्रांमधून फुटबॉल आणि ब्राझील यांच्याबद्दलच्या अनेक रोचक बातम्या, लेख, टिपणं प्रसिद्ध होतच होती. ते सर्व वाचताना, आपल्याला वाचता येतं हे आपलं मोठंच नशीब असं वाटून जाई.
भारतात केरळ, गोवा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडची राज्यं वगळता फुटबॉलचं फारसं प्रेम नाही. आपला देश प्रामुख्याने क्रिकेटवेडा. मुंबई-पुण्यात कॉलेजमधली मुलं पावसाळ्यात ब-याचदा फुटबॉल खेळतात, पण ती अगदीच हौशी पातळीवर. फुटबॉल जागतिक स्तरावर खेळला जातो तो प्रामुख्याने क्लबच्या माध्यमातून. देशांच्या पातळीवर तो फक्त ऑलिम्पिक, विश्वचषक आदी मर्यादित स्पर्धांमधूनच खेळला जातो. एरवी हे सगळे फुटबॉलपटू विविध क्लबसाठी खेळतात व त्यांच्या आपसातल्या स्पर्धा अतिशय व्यावसायिक पातळीवर, उच्चतम कौशल्यासह खेळल्या जातात. या सामन्यांच्या प्रक्षेपणाला जगभरात प्रचंड प्रेक्षक मिळतो. त्यांचं खेळाडूंशी भावनिक नातंही क्लबच्या माध्यमातून जोडलं गेलेलं असतं. याचा काहीसा अनुभव भारतीयांना आयपीएलमुळे काही वर्षांपासून मिळायला लागला आहे, परंतु अजूनही क्रिकेट आणि राष्‍ट्रीय अस्मिता असं गणित आहेच.
तसा अस्मितेचा प्रश्न ब्राझीलमध्ये आत्ता उभा ठाकला आहे, कारण तो देश सध्या फार कठीण राजकीय व आर्थिक परिस्थितीतून जातोय. २०१४चा फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये घेण्याचा निर्णय सात वर्षांपूर्वी झाला, तेव्हापासून ही परिस्थिती अधिक हलाखीची झालीय. ब्राझीलच्या अध्यक्ष डिल्मा रुसेफ यांच्याविरुद्धची निदर्शने अधिक जोरात होऊ लागलीत. गरिबी वाढतेय, त्यामुळे गुन्हेगारी, असुरक्षितता, सामाजिक अस्थैर्य वाढतंय. या पार्श्वभूमीवर विश्वचषक स्पर्धा पार पडल्यात. त्यामुळे, उपांत्य फेरीतच ब्राझील जेव्हा जर्मनीकडून हरला, तेव्हा दु:खाची मोठी लाटच जणू देशावर पसरली. या एका विजयाकडे तमाम ब्राझिलियन्स डोळे लावून बसले होते, जणू आपण जिंकलो की आपल्या या बाकीच्या समस्या दूर होतील, असा विश्वास त्यांना वाटत होता. आणि त्या काही प्रमाणात झाल्याही असत्या. (भारतात झालेल्या राष्‍ट्रकुल स्पर्धांना अगदी अशी पार्श्वभूमी नव्हती तरी कशाला उधळायचे खेळांवर कोट्यवधी रुपये, असा सवाल आपल्या सर्वांच्याच मनात आला होता.) या पराभवामुळे निराशा तर आलीच आहे त्यांच्या पदरी, पण आहे त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं, त्याचा मार्गही दिसेनासा झालाय कदाचित.
तरीही ते फुटबॉल मागे टाकणार नाहीत, त्याला दूर करणार   नाहीत, कारण तो त्यांच्या नसानसांतून वाहतोय, पिढ्यान्पिढ्या ते फुटबॉल जगत आलेत, तेच त्यांचं पे्रयस आहे, तो त्यांचा धर्म आहे.  आपलं, भारतीयांचं प्रेयस काय आहे, काय आहे जे आपल्या नसानसांतून वाहतंय?

Comments