पावसाची वाट पाहण्याची आठवण

आपण सगळे पावसाची इतकी का वाट पाहत होतो? आपल्यातले प्रत्यक्ष शेती करणारे व थेट पावसावर अवलंबून असणारे लोक वगळले तर इतरांसाठी नळाला पाणी येण्याइतकाच पावसाचा संबंध. गावाला वा शहराला पाणीपुरवठा जिथून होतो,  त्या तलावात पाऊस पडला की खरं तर आपलं समाधान व्हायला हवं. फार तर फार, पावसाळी सहलीला जाऊन धबधब्याखाली भिजायचा आनंद त्यांना घ्यायचा असतो. पण, बाकी पाहिलं तर, अनेकदा  पावसामुळे सर्वांना त्रासच किती  होतो. घरं गळतात, भिजल्याने आणि गढूळ पाण्याने आजार वाढतात, ओले कपडे सुकवायला जागा नसते आणि ऊनही  नसतं, गाड्या अडकतात, रस्ते खराब होतात, दरडी कोसळतात, पूर येतात, शाळेला/कामाला दांडी मारावी लागते, एक का  त्रास आहे. आणि तरीही आपण सगळेच वेड्यासारखी पावसाची वाट पाहत असतो. सात जून ही पाऊस मुंबईत येण्याची  अधिकृत तारीख. त्याच्या पंधरा दिवस आधीपासूनच आपल्याला वेध लागलेले असतात. क्वचित वळवाचा पाऊस पडलाच  तर किती बरं वाटतं. मग, बातम्यांकडे लक्ष ठेवायचं, हवामान खातं काय सांगतंय, पावसाचं आगमन केरळात कधी येणार त्याच्याबद्दल. तिकडे वेळेवर आला तरी इथे इतक्या वर येईपर्यंत त्याच्या आड कसली निना नि निनो वगैरे वादळी विघ्नं तर येणार नाहीत, याची चिंता करायची. सात तारीख जवळ आली की अरेच्चा, अजून एकही ढग दिसत नाहीये आकाशात, यंदा लांबणीवर पडतोय वाटतं. कावळे, सुगरणी घरटी बांधताना दिसली की त्यावरून आडाखे बांधायचे, लवकर येईल की उशिरा, कमी पडेल की जास्त, वगैरे. सात तारीख उलटली की कवितांचा पाऊस पडतो, वृत्तपत्रं, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर. त्या वाचून तरी तो येईल, अशी आशा असते.
यंदा मात्र, पावसाने सर्वच आडाखे चुकवले. जुलैची सात तारीख आली तेव्हा कुठे तो थोडाथोडा आला, तेही काही भागांत.  (आणि तिकडे ईशान्येत पूर आलाय, तो पंधरवडा उलटून गेला तरी ओसरत नाहीये.) मुंबईत आणि कोकणात पाऊस  आता स्थिरावलाय असं वाटतंय. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागांत हा अंक हातात येईस्तो पोचला असेल,  अशी आशा आहे. आता, आठवडाभर पाऊस दणकून पडल्यावर जिवाला कसं शांत वाटतंय. का बरं? खरं तर, पहिल्याच  पावसात शेकडो मुंबईकर लोकलमध्ये दोन-दोन तास अडकले होते, गुडघाभर पाण्यातनं वाट काढत चालावं लागलं होतं,  रस्त्यांची चाळणी झालीये, तरीही हा शांतपणा का वाटावा?
असं तर नसेल, की आपल्या पूर्वजांनी केलेली पावसाची प्रतीक्षा आणि पाऊस आल्यावर त्यांना वाटलेला दिलासा  आपल्यापर्यंत अजून टिकून आहे? काही गोष्टी माणसांना शिकवाव्या लागत नाहीत, असं म्हणतात. पावसाची वाट पाहणं  आणि तो आल्यावर निवांत वाटणं, हेही अशापैकीच आहे का? शेतीसाठी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या  त्या पूर्वजाचा अंश आपल्यात अजून आहे, याची ही खूण तर नव्हे? काय वाटतं तुम्हाला?

Comments