कल्पनेपलीकडचे दाहक वास्तव

इराकमधील मोसुल शहर व परिसरातील 40 लाख मुली व महिलांची सुंता (योनीचा दृश्य भाग कापून टाकण्याची शस्त्रक्रिया - फिमेल जेनिटल म्युटिलेशन) करण्यात यावी, असा फतवा आयएसआयएस या कडव्या मुस्लिम संघटनेने जारी केल्याचं वृत्त वाचलं आणि या विषयावर मागे काही साहित्य वाचलं होतं, ते आठवलं. बहुधा रीडर्स डायजेस्टमध्ये या विषयावरील एका पुस्तकातील काही भाग वाचला होता. वारिस दीरी या मूळच्या सोमालियन असलेल्या आंतरराष्ट्रीय मॉडेलने 1998मध्ये लिहिलेले ‘डेझर्ट फ्लॉवर - द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ अ डेझर्ट नोमॅड’ हे पुस्तकही गाजलेले आहे, त्या पुस्तकाबद्दल वाचलं तरी अंगावर काटा येतो. वारिसने तिची स्वत:चीच कहाणी या पुस्तकात सांगितली आहे. तिच्या या पुस्तकानंतर पाश्चिमात्य जगाला प्रथमच या प्रथेविषयी कळले. कारण, अमेरिका वा युरोपात अशी सुंता केलेल्या लाखो महिला असल्या तरी त्याची वाच्यता त्या कुठे करत नाहीत. अनेक आफ्रिकी देशांमध्ये मुस्लिम समाजात ही प्रथा अनेक वर्षांपासून आहे. अगदी लंडनसारख्या शहरात आपल्या देशातून हे काम करणार्‍या महिलेला बोलावले जाते, तिथे राहणार्‍या कुटुंबांमधल्या मुलींना एका घरी एकत्र आणले जाते व तिथे हा अघोरी कार्यक्रम उरकला जातो. बहुतेक मुलींचा यामुळे आईवरचा विश्वासच उडून जातो. कारण आईच्या पाठिंब्यानेच हे सगळे होताना त्या पाहत असतात.
हे का करायचे, तर महिलांच्या ‘अनैतिक’ वागण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांना शारीरिक सुखाचा उपभोग घेता येऊ नये आणि केवळ लैंगिक आकर्षणापायी त्या पतीखेरीज अन्य पुरुषाशी संबंध   ठेवू नयेत म्हणून. ही ‘शस्त्रक्रिया’ करताना भूल दिली जात नाही, ब्लेड वा कोणतेही पाते या कामासाठी वापरले जाते. अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने, लहान मुलींच्या शरीराचा हा अतिशय नाजूक भाग अंशत: वा पूर्णपणे कापून काढण्यात येतो. यामुळे त्यांना लघवी करतानाही प्रचंड त्रास होतो, आणि शारीरिक संबंध ठेवतानाही, ते ‘नैतिक’ असले तरीही.
त्यांना बसलेल्या मानसिक धक्क्यातून बहुतेक जणी वर्षानुवर्षे बाहेर येऊ शकत नाहीत. खेरीज त्यांना जंतूंची लागण, यूरीन इन्फेक्शन, पाठदुखी, पोटदुखी व अत्यंत वेदनादायी मासिक पाळी हे त्रास आयुष्यभर भोगावे लागतात. आतापर्यंत जगभरात 13 कोटी मुली व महिलांची अशी सुंता झालेली आहे. नुसतं वाचूनच अंगावर काटा येतो, चीड येते, डोळ्यांतून पाणी येते, हाताच्या मुठी वळतात आपल्या, तर त्या मुलींचं काय होत असेल?

Comments