घडवूया भूतकाळ

प्रत्येक भारतीयासाठी आजचा दिवस हा सामूहिक अभिमान वाटण्याचा आणि वाटून घेण्याचा. तो अभिमान मिरवण्याचाही - तिरंगी कपडे नि तिरंगीच दागिने घालून, फेसबुक/व्हॉट्सअ‍ॅपवर देशभक्ती स्पष्ट दिसेल असे स्टेटस आणि प्रोफाइल पिक ठेवून, शाळाकॉलेज वा वस्तीतल्या झेंडावंदनाला पांढरेशुभ्र कपडे घालून उपस्थित राहून. पण हा अभिमान नक्की कशाचा, कशाबद्दल वाटतो आपल्याला, याचा कधी विचार केलाय का आपण? आपला देश स्वतंत्र आहे, अनेक वर्षं पारतंत्र्यात काढून हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या अपार मेहनतीनंतर तो स्वतंत्र झालाय. मान्य. पण 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जन्माला आलेत, त्यांना या गोष्टीबाबत अभिमान वाटण्याचं काहीच कारण नाही ना? त्यांना अभिमान वाटलाच पाहिजे, पण कशाचा, तर आज आपण देश म्हणून जगाच्या नकाशावर कुठे आहोत, आपण व्यक्तिश: काय करतोय, याचा.

आपल्या आजी-आजोबांनी वा आईवडिलांनी कष्ट करून आपल्याला मोठं केलं, शिक्षण दिलं, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत, राहणारच आहोत. परंतु फक्त ऋणात राहून भागणार नाहीये आता. आपण काही तरी केलं पाहिजे. जे काम करतो, त्याच्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, ते मनापासून, सचोटीने केलं पाहिजे. कोणतंही काम छोटं नसतं, असं पुस्तकी वाक्य समोरच्याच्या तोंडावर न फेकता, ते अंगी बाणवायला पाहिजे. एसटीचे चालकवाहक असोत की ग्रामपंचायतीच्या शाळेतील शिक्षक, छोट्या दुकानात विक्रेता असो की गृहिणी, शेतकरी असो की लेखक/कवी, आपण जे करतोय त्यामुळेच भारत ही एक शक्ती बनलेला आहे, आपण तो घडवतोय, हे समजून घेतलं पाहिजे. पन्नासशंभर वर्षांपूर्वी काय झालं, त्याच्या आधी हजारो वर्षांपूर्वी आपली संस्कृती काय होती, वगैरे भूतकाळ झाला. वर्तमानकाळ आपण आहोत, आपण पुढच्या पिढीचा भूतकाळ घडवतोय आपल्या हातांनी, आपल्या कर्मांनी, वागणुकीने. आणि आपलं भविष्यही आपण घडवतोय, याची लख्ख जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि काम करत राहिलं पाहिजेच. तरच आणखी काही वर्षांनी भारतीयांना आनंदाने, अभिमानाने 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन साजरा करता येईल.

Comments