मुलीची जात

मागच्या सोमवारी सकाळी ती अमरावती स्थानकात उतरली, सकाळचे बरोबर आठ वाजले होते. गाडी एकदम वेळेत पोचल्याच्या आनंदातच ती बाहेर पडू लागली. स्थानकातून बाहेर पडायला दोन चिंचोळे मार्ग आहेत, दोन्हीकडे गर्दी जमली होती कारण तिकीट तपासनीस उभे होते. त्यांच्यामुळे काहीसा खोळंबा होत होता, म्हणून प्रवासी वैतागले होते. तेवढ्यात एक तपासनीस पुढे आला आणि एका मुलीला म्हणाला, ‘तिकडे कशाला चाललीस?’ ती म्हणाली, ‘पप्पांना फोन करतेय, गर्दीत ऐकू येत नव्हतं म्हणून मागे गेले.’ तिच्याकडे तिकीट नव्हतं, हे कळत होतं. त्यावर तो तपासनीस म्हणाला, ‘मुलीची जात, प्रामाणिकपणे उभं राहायचं समोर.’ मुलीची जात तिला माहीत होती, अनेकदा ऐकलं होतं त्यावरून. पण मुलींनीच प्रामाणिक असायला हवं, हे पहिल्यांदाच कळत होतं तिला.

सरकारी कर्मचारी, पोलीस, वकील, सरकारी रुग्णालयांमधले डॉक्टर, तिकीट तपासनीस अशा व्यक्तींना इतकं असंवेदनशील बोलावंच लागतं का, लिंगभावाविषयी त्यांना अनेकदा प्रशिक्षणही दिलेलं असतं. तरीही असली मुक्ताफळं ऐकायला मिळाली, की राग येतोच ना. मुलींनी प्रामाणिक असायचं, मुलांनी नाही? काय म्हणायचं होतं त्या तपासनीसाला नक्की? या गोंधळात अनेक विनातिकीट मुलं गेली असतीलच ना निघून दंड न भरता.

असं बोलणं आपल्या मनात, मेंदूत जणू शेकडो वर्षांपासून भरलेलं आहे. अनेक मुली यापेक्षा काही वेगळं ऐकतच नाहीत लहानपणापासून. मुलीचा जात, अशी वाग, तशी बस, असं नको बोलू. बायकांना काय कळतंय, ते काय बायकांचं काम आहे, बांगड्या भरा, अशी अनेक वाक्यं दिवसभर मुलींना ऐकवली जातात. मुलं मात्र या सगळ्याच्या पलिकडे असतात, त्यांना मोकळीक असते कसंही वागायची, बोलायची.

आपण काय बोलतोय, समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतोय त्याचा, काय संदेश जातोय त्यातून, याचा विचार खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. आपण सर्वांनीच. जेंडर सेन्सिटिव्ह शब्दप्रयोग व्यवहारात आणले पाहिजेत, मुलगी म्हणजे अमुक आणि मुलगा म्हणजे तमुक, हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. बरोबर आहे ना?

Comments