तिच्या घरी गणपती बसत नाही, म्हणजे गणेश चतुर्थीच्या आजच्या दिवशी मुद्दाम मूर्ती आणून बसत नाही. घरचा गणपती असतो लांब गावाला. तिथे जाणं काही शक्य नव्हतं यंदा. मग तिने घरातल्या सगळ्या गणेशजींनाच एकत्र केलं आणि सजवून ठेवलं दिवाणखान्याचा एका कोपऱ्यात. घरातल्या सगळ्या, म्हणजे नक्की किती मूर्ती आहेत, असं वाटेल तुम्हाला. पण जरा तुमच्याही घरात नजर फिरवा, छोट्यामोठ्या मूर्ती किती आहेत पाहा जरा. मातीच्या, काचेच्या, संगमरवरी मूर्ती तर असतातच; पण सुतळ, मणी, मोती, काचांचे तुकडे वा इतर वस्तूंनी बनवलेल्याही असतात. शिवाय भिंतीवर शोभणारे चौकटीतले बाप्पाही प्रत्येक घरात असतातच. आणि यातला निव्वळ एखादाच बाप्पा आपण विकत घेतलेला असतो, बहुतेक सगळे आपल्याला भेट मिळालेले असतात. गणपती ही एकदम सुरक्षित भेट समजली जाते, कोणी नाही म्हणायचा किंवा न आवडायचा प्रश्न नाही, असं गणित असतं. दरवेळी काय भेट द्यायची हा प्रश्न तर आपण सर्वांनाच पडलेला असतो कायमचा. अशा वेळी गणपतीची सुबकशी मूर्ती हा प्रश्न सहज सोडवते. जसे आपल्या आयुष्यातले इतर प्रश्नही त्याने सोडवावे, अशी आपली अपेक्षा असते.
गणपतीला मान हिंदूधर्मीयांमध्ये आहेच, परंतु अनेक पारसी घरांमध्येही बाप्पा प्रेमाने विराजमान झालेले दिसतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीच्या माजी संपादक दीना वकील यांच्या कार्यालयातच पन्नासएक मूर्ती होत्या, घरात त्याहूनही खूप जास्त. बेजान दारूवाला हे विख्यात ज्योतिषी, तेही मोठे गणेशभक्त. त्यांच्याकडेही गणपतींचं मोठं ‘कलेक्शन’ आहे म्हणे. गणपती का असा सर्वांना आपलासा वाटत असेल बरे? तो रागवत नाही, चिडत नाही, तो फूडी आहे (हा आपणच आपला करून घेतलेला समज की त्याच्या तुंदिलतनुवरून काढलेला निष्कर्ष?) म्हणून असावे कदाचित. खरं तर तो बुद्धिदाता आहे, आणि आपल्या सर्वांनाच चांगली बुद्धी मिळायला हवीये, डोकं ठिकाणावर यायला हवंय. तरच आपण कानठळ्या न बसवणारा, प्रदूषण न करणारा, गणेशोत्सव साजरा करणार आहोत. नाही तर, नुसते बोलाचे मोदक आणि बोलाचेच पेढे, प्रत्यक्षात नन्ना, नव्हे नव्हे, ठणाणा!
Comments
Post a Comment