उद्या ऑगस्ट क्रांती दिन. उद्यापासून 15 ऑगस्टपर्यंत जणू काही देशभक्ती सप्ताहच भारतात. टीव्ही, रस्त्यांवरचे फलक आणि दुकानं तीन विशिष्ट रंगांमध्ये रंगून जातील आणि आपले कान ‘मेरे देश की धरती’ टाइप गाण्यांनी किटून जातील. महात्मा गांधींनी 1942 मध्ये नऊ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांना चले जाव असे सांगणारा नारा दिला आणि स्वातंत्र्यलढ्याला विशिष्ट दिशा व स्पष्ट उद्देश्य दिले. आज 72 वर्षांनंतर आपण फक्त हे देशप्रेमाचे इव्हेंट साजरे करतोय आणि तेवढं आपल्या देशाच्या सर्वंकष प्रगतीला पुरेसं आहे असं वाटून घेऊन एरवी मात्र अत्यंत देशासाठी अहितकर असंच वागतोय. पण मग आजच्या घडीला चले जाव म्हणण्यासारखं काहीच नाही उरलंय का आपल्यासमोर? काही मैत्रिणींशी या विषयावर गप्पा मारताना अनेक मुद्दे समोर आले, काही आपल्या सर्वांना नेहमी जाणवणारे तर काही लक्षात आणून दिल्यावर पटणारे.
बहुतेकींचं एकमत झालं ते या ठळक मुद्द्यांवर. बायांनी स्वत:ला कमी लेखण्याच्या वृत्तीला सगळ्यात आधी चले जाव म्हटलं पाहिजे. मला हे जमणार नाही, ते शक्य नाही या विचाराला दूर सारलं पाहिजे. सतत मान तुकवायची आपली तयारी असते, ती टाकून दिली पाहिजे. कधी तरी ही मान ताठ करून होऊन जाऊ दे, असा लढाऊ पवित्रा घ्यायला हवा. पुरुषी अहंकाराला दूर ढकलण्याची गरज आहे. परिस्थितीला शरण जायचं, असहाय वाटून घ्यायचं ही तर अनेक जणींची खासियत. त्यामुळेच त्या कितीही मोठी समस्या असू दे आयुष्यात, सहन करत राहतात. कोणाचीही मदत घेत नाहीत, कोणाशी त्याबद्दल बोलत नाहीत आणि वर्षानुवर्षं त्रास सहन करत राहतात. यात तब्येतीच्या तक्रारी आहेत, तशाच घरगुती समस्याही आहेत. यातल्या अनेक प्रश्नांवर सहज उत्तरं सापडू शकतात, पण त्यासाठी गप्प बसण्याच्या वृत्तीला चले जाव म्हटलं पाहिजे, हे मधुरिमाच्या वाचकांना ओळखीच्या असलेल्या प्राध्यापक अंबुजा यांचं मत सर्वांनाच पटण्याजोगं आहे.
मुंबईतील पत्रकार शुभा खांडेकर यांना आवाजाने, विशेषकरून ध्वनिवर्धकाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार्या आवाजाने, चले जाव करावं असं प्रकर्षाने वाटतंय. वरकरणी एवढं काय त्यात, असं वाटू शकतं. पण विचार करा, पहाटेपासून रात्रीपर्यंत आपल्या कानावर किती आवाज आदळत असतात. मोटारींचे भोंगे, घराघरातून किंचाळणारे टीव्ही वा रेडिओ, बारसं/लग्न/मुंज/साखरपुडा/वाढदिवस/सणांच्या निमित्ताने आजूबाजूला कर्कश आवाजात कोकलणारे ध्वनिवर्धक ऊर्फ डीजे, विविध प्रकारचे मोबाइलचे रिंगटोन, या आवाजांनी आपल्या कानांवर किती अन्याय करतोय, हे आपल्या लक्षातच येत नाही. यात भर पडली आहे इअरफोन लावून गाणी ऐकण्याची. या सगळ्यामुळे पक्ष्यांची किलबिल, पावसाची टिपटिप, असे नैसर्गिक आवाज ऐकण्याची क्षमताच आपण हरवून बसलोय की काय, असं वाटायला लागलंय.
भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तींवर माहितीपट बनवणार्या सविता प्रशांत यांनी या निमित्ताने एक गंभीर मुद्दा मांडलाय. त्या म्हणतात, जात पंचायतीची प्रथा स्त्रियांसाठी अत्यंत अन्याय्य व हानिकारक आहे आणि तिला एकजुटीने चले जाव म्हणायची अत्यंत आवश्यकता आहे. आदिवासी महिलांना डाकीण घोषित करणार्या, कंजारभाट महिलांना कौमार्याची परीक्षा द्यायला लावणार्या, मसणजोगी महिला व पुरुषांच्या चारित्र्याची परीक्षा घेताना पुरुषाला केवळ इशारा आणि महिलेच्या जिभेवर चटका देणार्या, आंतरजातीय विवाह करणार्या जोशी समाजातील महिलेला तडक मृत्यूची शिक्षा ठोठावणार्या जात पंचायतीला चले जाव म्हणायला हवंय. कायमचं. 1942मध्ये सुरू झालेल्या चले जाव आंदोलनात ज्या प्रकारे समाजाच्या सर्व वर्गांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले होते व त्यांच्या मेहनतीतूनच 15 ऑगस्ट 1947चा दिवस पाहायला मिळाला, त्याच प्रकारे सर्व समाजाने या जातपंचायतीच्या कुप्रथेविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच या समाजातील दलित, वंचित व शोषित महिलांना स्वातंत्र्य मिळेल, असं सविता आग्रहाने मांडतात.
आपण आपल्याला फार गृहीत धरतो आणि इतरांना तसं गृहीत धरायची परवानगी देतो. यातून किती प्रकारचे मानसिक, शारीरिक, सामाजिक ताण आपण ओढवून घेत असतो, ते आपल्यालाच कळत नसतं. म्हणून कशालाही हो, मी आहे ना, मी करीन ते, असं म्हणण्याच्या वृत्तीला आपण हाकलून दिलं पाहिजे. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ‘चूल आणि मूल’शी आजन्म बांधून घेण्याच्या अगतिकतेला चले जाव म्हटलं पाहिजे. ही अगतिकता स्त्री आणि पुरुष दोघांचीही आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. पुरुषांनी देखील चूल आणि मूल हे आपले क्षेत्र नाही, तिथे आपलं काय काम, ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.
आपले अनेक पूर्वग्रह असतात, आपल्यात काही उणीव आहे, असं आपल्याला वाटत असतं. कुणाविषयी राग असतो, तिरस्कार असतो, भीती असते त्या सगळ्याला चले जाव म्हणायला हवंय. तुम्हाला कशाला म्हणायचंय चले जाव, सांगणार ना आम्हाला?
Comments
Post a Comment