तरुणाईचा मंत्र :योलो

गेल्या काही दिवसांत आइस बकेट, राइस बकेट, बुक बकेट, म्युझिक बकेट चॅलेंज हे शब्द सतत आपल्या कानांवरून जात होते. सुरुवात झाली आइस बकेटपासून. बर्फाचे तुकडे असलेलं पाणी अंगावर ओतून घ्यायचं, नसेल तर एका गंभीर रोगाशी संबंधित सामाजिक संस्थेला १०० डॉलर्स द्यायचे, असे ते आव्हान होते. जगभरातील शेकडो सेलिब्रिटीजनी अशी बर्फाळ अंघोळ तर केलीच,शिवाय पैसेही दान केले. मग भारतातल्या कोणी सुरू केले ते राइस बकेट चॅलेंज. एक बादली तांदूळ दान करायचे. मग फेसबुकवर आलं बुक बकेट, आपल्या आवडीची दहा पुस्तकं सांगायची. आणि आपल्या काही मित्रमैत्रिणींना त्यांच्या आवडत्या पुस्तकांची नावं सांगायला नॉमिनेट करायचं. तसंच गाण्यांबद्दल.
आइस बकेट चॅलेंजमुळे त्या विशिष्ट संस्थेला खूप मोठी मदत मिळाली, इतके पैसे जमा करायला त्यांना अनेक वर्षं लागली असती. मात्र त्यानंतर आलेल्या पुस्तकं आणि संगीताच्या चॅलेंजमधून काय साध्य झालं? एक तर ख-या किंवा चांगल्या वाचकाला फक्त दहा आवडीची पुस्तकं निवडायला सांगणं हा अन्याय. तसंच, पटकन आठवतील ती नावं घ्यायचं म्हटलं तर इतर पुस्तकांवर अन्याय. संगीताचंही तेच. आपल्याला दहा नाही, किमान शंभर पुस्तकं वा गाणी आवडीची म्हणून सांगता येतील प्रत्येकालाच. मग हा दहाचा अट्टहास का? पटापट नावं घ्या, असा आग्रह का?
हा आग्रह या तरुण पिढीचा खास गुण आहे, असं आपल्या लक्षात येईल. YOLO - You Only Live Once - योलो म्हणजेच आपण एकदाच जगतो, त्यामुळे जे काही करायचंय ते आज, आत्ता, ताबडतोब करायचं हा या पिढीचा मंत्र आहे. हा मंत्र जपायचा म्हटलं की मनात येईल ते लगेच बोलून दाखवायचं, सांगून टाकायचं, परिणामांची  फ‍िकीर करायची नाही हे ओघाने आलंच. परंतु त्यामुळे होतंय काय की कुठल्याच गोष्टीचा गंभीर विचार केला जात नाहीये. एखादं पुस्तक किंवा गाणं आपल्याला का आवडतं, त्यात काय अनोखं आहे, याचं थोडंही विश्लेषण न करता, त्या क्षणी आठवेल ते नाव सांगितलं जातं. थोडा जरी विचार केला तरी या यादीतली पुस्तकांची वा गाण्यांची नावं पूर्णपणे बदलू शकतात, हे या योलो लोकांना लक्षात येत नाही. विचार केल्यावर जे सुचतं, ते अधिक काळ टिकणारं आहे, ते बदलावं लागणार नाही, ते अभिजाततेच्या कसोटीवर अधिक चांगलं उतरणारं असेल, त्याचा दर्जा नि:संशय उत्तम असणार आहे, हे त्यांना कळत नाहीये. कोणतीच अशी यादी, आवडत्या जागेची, माणसांची, रंगांची, गंधांची, चित्रपटांची कायमस्वरूपी नसते, ब-याचदा ती वयानुसार वा अनुभवानुसार बदलतही जाते. योलो हा मंत्र  निराशावादी लोकांसाठी योग्य असला तरी त्याची मात्रा इतरांसाठी मोजकीच असली पाहिजे, असं प्रकर्षाने वाटलं हे बकेटचे चॅलेंजेस पाहून. काय वाटतं तुम्हाला?

Comments