वेध दिवाळीचे


दिवाळी अगदी परवावर आली की. आत्ता कुठे गणपती यायचे होते आणि एवढ्यात दिवाळी आलीसुद्धा असं वाटतंय. म्हणता म्हणता वर्षदेखील संपेल. मेमधल्या लोकसभेच्या आणि आता, परवा निकाल लागतील त्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे हे वर्ष इतक्या भरभर गेलंय की काय? तसं म्हटलं तर दोन्ही निवडणुका अपेक्षेनुसारच वेळेतच झाल्यात. तरीही प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंतचा काळ फारच उत्कंठावर्धक आणि बातम्यांनी भरून गेलेला होता. रविवारी निकाल जाहीर होतील तेव्हा दिवाळीच्या आधीच फटाके फुटतील आणि मिठाईही खायला मिळेल. हा रविवार दिवाळीच्या आधीचा शेवटचा. त्यामुळे खरेदी आणि फराळ यासाठी हक्काचा दिवस. दिवसभर मस्त टीव्हीवर चालणारी निवडणुकांच्या निकालाची धमाल पाहत फराळ करायची संधी आहे यंदा. आणि संध्याकाळी उन्हं उतरली की, बाजार करायचा.
 
अनेकांची अशीच योजना असेल. अर्थात अनेक घरं अशीही असतील जिथे काही कारणाने दिवाळी साजरी नसेल होणार. कधी घरातल्या कोण्या व्यक्तीच्या मृत्यूचं दु:ख तर कुठे मुलंबाळं पार लांब, दिवाळीलाही घरी येऊ न शकणारी. एखाद्या घरी कुणी आजारी असेल तरी दिवाळीचा मूड नसतोच. तरीही दिवाळी हा सण आहे प्रकाशाचा. खमंग फराळाचा. आणि दुर्दैवाने आवाजाचा. त्यामुळे घरात बसून राहिलं तरी या सणाचे पडसाद आपल्यापर्यंत पोहोचत राहतातच. शेजारच्या घरून चकल्या तळण्याचा वास येत असतो, तर समोरच्या घरातले कंदील चमकत असतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत फटाकेही फुटतच असतात आजूबाजूला. त्यामुळेच दिवाळीपासून दूर राहणं जरा कठीणच असतं.

आणि तेच तर सार आहे आपल्या जीवनाचं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कितीही उलथापालथ झालेली असेल, आसपासचं जग एका विशिष्ट लयीत सुरूच असतं. घरातल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही आपण हळुहळू आपल्या रोजच्या कामाला लागतोच की. मुलांना शाळेत जावंच लागतं. पेपरवाला पेपर टाकायचं थांबत नाही की इस्त्रीवाला कपडे घेऊन जाण्याचं. ऑफ‍िस, व्यवसाय, कामधंदा, हे तर सुरूच असतं अर्थात. जगरहाटी सुरूच राहते, तुम्ही घरी दिवे लावा अथवा अंधारात बसा. फराळ नाही केलात तरी तुमची सख्खी शेजारीण तिने केलेला फराळ तुम्हाला आणून देणारच. ती हेच सुचवू पाहत असते, ‘वाईट झालंय ते मागे टाकून पुढे चालत राहिलंच पाहिजे. मी आहे ना तुझ्यासोबत?’ हो ना?

Comments