हॅपी ई दिवाळी

शुभ दीपावली वाचक मित्रमैत्रिणींनो. दिवाळीचे दोन दिवस राहिलेत, छान सुटीचा आनंद घेताय ना सगळे जण. फराळ, कंदील, पणत्या, रांगोळ्या, भेटीगाठी, पाहुणे, सगळ्याची मजा एकत्रितपणे घेण्याचे हे दिवस. (यंदाही फटाके कमीच असतील, अशी आशा.) हे सगळं असलं तरी मराठीजनांसाठी दिवाळीची रंगत पूर्ण होते ती दिवाळी अंक वाचून. पूर्ण होते म्हणण्याऐवजी सुरू होते म्हणू शकतो आपण, दिवाळी अंकांची संख्याच इतकी असते की किमान दोनतीन महिने तरी ते पुरतात. खरं तर, पुरून उरतात! यंदा त्यांनाही महागाईची झळ लागलीच आहे. परंतु हे अंक वाचून मिळणारा आनंद अतुलनीय आणि टिकाऊ असतो, त्यामुळे थोडे जास्त पैसे मोजायला वाचकांना वावगं वाटत नाही. आणि वाचनालयं आहेतच की अंक फार पैसे खर्च न करता वाचायचे असतील तर.

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन दिवाळी अंकही निघू लागले आहेत. अनेक मराठी संकेतस्थळांवर एरवी प्रसंगानुसार लिखाण प्रसिद्ध होत असते, त्या संकेतस्थळांवर आता दिवाळी अंक वाचायला मिळतात. यासाठीही नामांकित लेखक/कवींना पाचारण केले जाते, फेसबुकसारख्या माध्यमाद्वारे ते हजारो वाचकांपर्यंत पोचत असतात. यंदा फेसबुकवर जोरदार चलती आहे ती ऐसीअक्षरे व डिजिटल या दिवाळी अंकांची. ऐसीअक्षरे या संकेतस्थळावर एरवीही उत्तमोत्तम लिखाण प्रसिद्ध होत असते, दिवाळी अंकातही वैचारिक, विनोदी, ललित या प्रकारच्या लेखांची रेलचेल आहे. www.aisiakshare.com हे ते संकेतस्थळ. खेरीज मायबोली, माझी मराठी, techमराठी, कलाविष्कार, कोकणनामा, मिसळपाव, ज्ञानामृत, असेही ऑनलाइन दिवाळी अंक यंदा आपल्यासाठी तयार आहेत. हे अंक आपण कधीही वाचू शकतो. अगदी स्मार्टफोनवरसुद्धा.

तर आजउद्या दिवाळी साजरी करा, सोमवारपासून ऑफ‍िसला जायचंय याची मानसिक तयारी करण्यात रविवार जाईलच. मग सुरू करा दिवाळी अंकांचा फडशा पाडायला. महिनाभर अंक वाचून त्यांच्यावर ५०० शब्दांपर्यंत लिहून २० नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे पाठवा, काय आवडलं काय नाही ते. पाठवणार ना?

मधुरिमाचा हा दिवाळी अंक आपल्याला आवडेल, याची खात्री आहे. पण तरीही तो कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा मधुरिमा टीमतर्फे शुभ दीपावली.

Comments