आॅबिट


रोजच्या पेपरांमध्ये छापून येणाऱ्या आॅबिच्युअरीज वाचायची आवड म्हणा किंवा सवय, कधी लागली आठवत नाही. परंतु ज्या दिवशी अगदी घाईत पेपर चाळायची वेळ येते, तेव्हाही या पानावर नजर काही क्षण रेंगाळतेच. पटापट त्यातली नावं, फोटो पाहून मी पुढच्या पानावर जाते. प्रामुख्याने सिंधी, पंजाबी, मारवाडी, ख्रिस्ती, आणि क्वचित काही दाक्षिणात्य व्यक्तींच्या मृत्यूची आठवण या सदरातून केलेली असते. मराठी नावं फार क्वचित. टाइम्समध्ये काम करत असताना या जाहिरातींचे दर विचारलेले आठवतात. आज थोडा वेळ होता म्हणून टाइम्समधलं हे पान जरा नीट वाचत होते. तर नलिनी अंबाडी यांच्या मृत्यूला एक वर्ष झाल्याची एक जाहिरात दिसली. नाव कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. जाहिरात पूर्ण वाचली तेव्हा त्यात नलिनीच्या कुटुंबीयांसोबतच जगभरातील तिचे चाहते असा उल्लेख आढळला. एकदम लक्षात आलं, कुठल्याशा गंभीर आजाराने त्रस्त नलिनीला अगदी दुर्मीळ प्रकारचा रक्तातला घटक किंवा तत्सम काहीतरी आवश्यक होता आणि त्यासाठी ती अमेिरकेतून भारतातही आली होती. मग तिला गूगललंच. (http://en.wikipedia.org/wiki/Nalini_Ambady) मूळची केरळमधली नलिनी, शिकायला अमेिरकेत गेली, मानसशास्त्रात तिने पीएचडी केली, आणि हार्वर्डमध्ये मानसशास्त्र शिकवणारी ती पहिली भारतीय अमेरिकन महिला ठरली. एखाद्या नवीन माणसाला पहिल्यांदाच भेटल्यावर आपल्या मनात/मेंदूत जे ठसतं तेच त्या व्यक्तीशी अनेकदा भेटल्यावर जे मत होतं त्याइतकंच घट्ट असतं, अशा आशयाचं तिचं संशोधन आहे. शिकवत असतानाच, २००४मध्ये, वयाच्या ४५व्या वर्षी तिला ल्यूकेमिया झाला. उपचारानंतर ती बरीही झाली. परंतु, पुन्हा या रोगाने तिला गाठले. मग तिच्या रक्तगटाला जुळेल असे बोनमॅरो शोधण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी/मित्रवर्गाने जग पालथं घातलं. ती भारतीय वंशाची असल्याने भारतीय व्यक्तीचे बोनमॅरो जुळण्याची शक्यता अधिक, त्यामुळे ती इथेही येऊन गेली. परंतु अखेर गेल्या वर्षी आजच्या दिवशी तिचा हा शोध कायमचा संपला.
तीनएक वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आईकडे बोरिवलीला गेले होते राहायला. माझ्या आईलाही आॅबिटचं पान पाहण्याची सवय आहे. दुपारी ती पेपर चाळताना अचानक एका नावाने तिचं लक्ष वेधलं. पी.के.दासगुप्ता एवढंच इंग्रजीत लिहिलेलं आणि बाकीचे शब्द बांगला लिपीत होते. बाबांचा खूप वर्षांपूर्वी साॅर्टिंग आॅफिसात किंवा पोस्टात काम करतानाचा दासगुप्ता नावाचा मित्र होता, त्याची मुलं मी आणि माझ्या भावाच्या वयाची होती. तो सांताक्रूझला कालिन्याला लिनेट नावाच्या इमारतीत राहात असे. दहाएक वर्षांपूर्वी या दोघा मित्रांची भेट झाली असावी. नंतर फोनवरून ते संपर्कात होते. नाव वाचून आईने बाबांची जुनी फोन नंबरची डायरी काढली. त्यात दासगुप्ता नावापुढे पीके असं होतं म्हटल्यावर आमची खात्री झाली, हे तेच. मग मी डायरीतल्या लँडलाइनवर फोन लावला. त्याच्या मुलाने फोन उचलला. मी नायगांवकरांची मुलगी अशी ओळख करून दिल्याबरोबर त्याने मला ओळखलं. मी सांगितलं, जाहिरात पाहिली म्हणून. आँटी होती घरी. मग आई तिच्याशी बोलली. तेव्हा माझे बाबा गेल्याला वर्षही नव्हतं झालं बहुतेक. दोघी आसवं गाळत आपापल्या मोडक्यातोडक्या हिंदीतून बराच वेळ बोलत होत्या. कुठेतरी एक चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं.

Comments