भिंत

टीव्हीवर सिमेंटची एक जाहिरात लागते त्यात तो धिटुकला शिक्षिकेला सांगत असतो, भिंतींबद्दल. चांगली आणि वाईट भिंत. तो आणि त्याच्या मित्रामध्ये असलेली भिंत वाईट. ही तर न दिसणारी भिंत; पण दिसणा-याही काही भिंती आपल्या अवतीभोवती असतात. अशीच एक भिंत होती बर्लिनची. जर्मनीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करणारी. पश्चिम भाग प्रगत, आधुनिक, श्रीमंत. पूर्व भाग मागासलेला, दारिद्र्याने पिचलेला. आज चाळिशीत असलेल्या वाचकांना एफआरजी (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी) आणि जीडीआर (जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक) असे दोन देश स्पष्ट आठवत असतील. याच नावांनी ते ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत. भिंत बांधल्यापासून अनेक जणांनी ती पाडण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यात जीवही गमावला. अखेर अनेक राजकीय घडामोडींनंतर १९८९मध्ये ही भिंत पाडण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला परवा नऊ नोव्हेंबर रोजी २५ वर्षं होताहेत. म्हणजे जर्मनीच्या एकत्रीकरणाचा रौप्यमहोत्सव म्हणा ना. आज एकत्रित जर्मनी युरोपातील अत्यंत भक्कम राष्ट्र म्हणून आपल्याला ठाऊक आहे.

नुकत्याच फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी हे आपण पाहिलंच. जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मर्कल अत्यंत शक्तिशाली नेत्या समजल्या जातात. जर्मन मोटारी तर जगभरात लोकप्रिय. एकत्रीकरणानंतर, मागासलेला पूर्वेकडचा भाग पश्चिमेशी जुळल्यानंतर वर उठला, प्रगत झाला. सध्याच्या जर्मनीत त्या मागासलेपणाचा मागमूसही नाही.

अशा प्रत्यक्ष भिंतीइतकीच वाईट त्या जाहिरातीतल्यासारखी मानसिक भिंत. दोन धर्मांमधली असो, भाषांमधली, प्रांतांमधली, जातींमधली, वर्गांमधली की स्त्री व पुरुषांमधली, भिंत वाईटच. आज एकविसाव्या शतकातही आपण सगळेच अशा जुन्या भिंती तोडायचं/पाडायचं सोडून वेगवेगळ्या नवीन मानसिक भिंती आपल्याभोवती उभारतोय. नवीन विचार, संस्कृती, खाद्यपदार्थ, भाषा, पेहराव, संगीत हे सगळं या भिंतींमुळे दूर ठेवतोय आपल्यापासून. या भिंती तोडायला कसलाच मुहूर्त नकोय, त्या तातडीने तोडायला हव्यात, नाहीशा करायला हव्यात. नाही तर आपल्या पुढच्या पिढीला या भिंतींच्या आत, अत्यंत संकुचित आयुष्य जगावं लागेल. आज याची नोंद नाही घेतली तर कदाचित फार उशीर झालेला असेल.

Comments