मिश्र संस्कृती

लहानपणापासून आपल्याला आपली भाषा, आपलं जेवण, आपलं गाव, आपल्याकडे असं असतं असं सतत सांगितलं जात असतं. बऱ्याचदा शाळेतून बाहेर पडेपर्यंत आपल्या अवतीभोवतीची बहुतांश माणसं अशी आपल्यासारखीच असतात. महाविद्यालयात गेल्यावर वा नोकरीला लागल्यावर आपल्यापेक्षा वेगळी माणसं भेटतात. ती थोडीशी वेगळी असली तरी बरीचशी आपल्यासारखीच आहेत की, हे भान लवकरच येतं नशिबाने. अशा माणसांपैकीच काही जणांशी आपलं मैत्र जडतं, काहींच्या तर आपण प्रेमातच पडतो. प्रेमाची परिणती विवाहात होते आणि या दोन वेगळ्या माणसांची आपली भाषा/जेवण/पद्धती तयार होत जातात. आपली आणि त्यांची माणसं असा भेद बराचसा विरून जातो. भारतासारख्या शेकडो भाषा बोलल्या जाणाऱ्या आणि
स्वयंपाकाच्याही तितक्याच पद्धती असलेल्या देशात तर अशी वेगळी पण आपल्यासारखीच माणसं पदोपदी भेटतात. अशा माणसांच्या एकत्र येण्याने जे काही सामोपचाराचं वातावरण निर्माण होतं, त्यालाच आपण राष्ट्रीय एकात्मता असं काहीसं पुस्तकी नाव दिलंय. प्रत्यक्षात आपण ती अनेकदा अनुभवलेलीच असते. अशा दोन वेगळ्या माणसांचा एकमेकांशी विवाह झाला, की एक नवीन संस्कृती निर्माण होते. ती फार गमतीशीर असते. त्या घरातली मुलं एकापेक्षा अधिक भाषा ऐकत मोठी होतात, बोलायला लागल्यावर शिकतातही. त्यांना खूप वेगवेगळ्या चवी माहीत असतात. थोडी नशीबवान असतील ती मुलं तर त्यांना वेगवेगळं गाव/आजोळ असतं सुटीत जायला. तिथे जाउन त्यांना एक वेगळ्या जगाची ओळख होत असते. खेरीज अशा कुटुंबामधल्या बाकीच्या व्यक्तींनाही वेगळं काही झेलायची, तडजोड करण्याची सवय असते. आज आमटी तर उद्या डाळढोकळी, आज पुरी तर उद्या पराठे, आज पालक पनीर, तर उद्या सांबारभात समोर आलं तरी त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. एकंदरीत ती अधिक समृद्ध जीवन जगतात.  १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो आपल्या देशात. आपल्यासारख्या भल्यामोठ्या, वैविध्यपूर्ण भूगोल, इतिहास, भाषा व खाद्यसंस्कृती असलेल्या देशात वेगळेपणा जपण्याचा अट्टहास जितका जास्त तितकाच सर्वांना एकाच तराजूत तोलण्याचा अनैसर्गिक प्रयत्नही. या निमित्ताने अशा काही जोडप्यांची ओळख आजच्या मधुरिमामध्ये करून देतोय,
ज्यांनी काही वेगळी वाट निवडलीय. प्रसंगी कुटुंबाच्या विरोधाला झुगारूनही. त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्यातच, पण कोणत्याही लग्नानंतर त्या लागतातच की. अनेक सेलिब्रिटींचेही असे विवाह आपल्याला माहीत असतात. पण त्यातली मजा, घरात होणाऱ्या गमतीजमती आपल्यापर्यंत पोहोचत नसतात. म्हणूनच आपल्यासारख्याच या जोडप्यांच्या या गोष्टी तुम्हाला आवडतील ही खात्री आहे. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय, तसंच तुमच्या यासारख्या अनुभवांचीही. निवडक अनुभवांना नक्की प्रसिद्धी देऊ.

Comments