कपड्यांचं महत्त्व किती ?

बायका आणि पुरुष यांच्यातील असमानता आपल्या मनात किती खोलवर रुजलीय याची आपल्याला कल्पनाही नसते, असं नुकतीच एक बातमी वाचल्यावर लक्षात आलं. ऑस्ट्रेलियातल्या एका वृत्तवाहिनीवर सकाळचा एक कार्यक्रम सादर करणारे दोन निवेदक - एक बाई आणि एक पुरुष. या बाईने सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या बायांवर किती अपेक्षांचं ओझं असतं या विषयावर वर्षभरापूर्वी एक व्याख्यान दिलं, ते या माणसानंही ऐकलं. तेव्हा त्याला वाटलं, हे कोणत्या पातळीपर्यंत खरं आहे, ते पाहूया तरी. बायांना मुख्यत्वे जोखलं जातं ते त्यांच्या कपड्यांमुळे. त्या कुठले, कसे, किती, कधी, काय कपडे घालतात, यावर जगभरातील नैतिक पोलिसांचं लक्ष असतं.
हे माहीत असल्याने या पठ्ठ्याने ठरवलं, की आपण सतत काही दिवस एकच सूट वापरायचा. झालं, तेव्हापासून सुमारे वर्षभर तो एकच निळा सूट रोज घालतोय आणि टीव्हीवर दिसतोय (धोब्याकडे धुवायला जाईल ते दिवस वगळून). पण, एकाही, अक्षरश: एकाही प्रेक्षकाने त्याला पत्र लिहून विचारलं नाही, की बाबा, तू एकच सूट का घालतोस रोज. हाच प्रयोग टीव्हीवर रोज नित्यनेमाने ठरावीक वेळी दिसणार्‍या बाईने केला तर काय होईल? त्याच्याच सहनिवेदिकेला असे अनुभव आलेले आहेत. अमुक रंग का घालता, गळा तमुक पद्धतीचा ठेवा, केस असे बांधा, लिपस्टिक किती लावता, वगैरे वगैरे.
या प्रतिक्रिया देणार्‍यांमध्ये बायाही होत्याच बर्‍यापैकी. म्हणजे फक्त पुरुष बायांकडे निरखून पाहतात व त्यांच्याकडून विशिष्ट अपेक्षा ठेवतात, असं नाही, तर खुद्द बायांनाही इतर बायांनी अमुक पद्धतीनं वावरावं, असं वाटत असतं. विशेषकरून टीव्हीवरील निवेदक व चित्रपट अभिनेत्री यांच्याकडून सर्वांच्याच प्रचंड अपेक्षा असतात. त्यांनी अमुक एका प्रकारेच लोकांसमोर यावं, अशी खूप ताठर भूमिका असते ती. असं सतत दुसर्‍यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जगणं किती कठीण असेल नाही?

Comments