पुनर्विकासाचा विळखा

खालचं छायाचित्र गेल्या वर्षी नोव्हेंबरमधलं तर वरचं आज घेतलेलं. माणसं नका पाहू, मागच्या इमारती पाहा. पिवळी रंगवलेली इमारत महिन्याभरात रहिवाशांनी गजबजून जाईल असं दिसतंय तर तिच्या शेजारची गेली ३-४ वर्षं तशीच उद्ध्वस्त धर्मशाळा अवस्थेत आहे. ती पूर्ण होण्याची वाट पाहणारी माणसं किती दिवस आशेवर राहणार आहेत न कळे.

बरीच कामं होती म्हणून रजा घेऊन घरी होते. दुपारी जेवल्यानंतर वाचत होते तर बांधकामाचे गडगड ठकठक धाडधाड वगैरे आवाज आदळायला लागले कानावर. एकदम आठवलं मागेच हाउसिंग बोर्डाची इमारत पाडायला दिवाळीत सुरुवात झाली होती. इमारत रिकामी करून दोन वर्षं तरी झाली होती. म्हणजे तेव्हापासून ते सगळे लोक भाड्याच्या घरांमध्ये अनेक तडजोडी करत, नवीन घर कधी होतंय याची वाट पाहात राहातायत. आत्ता इमारत पाडतायत, बांधून झाल्यावर प्रत्यक्ष राहायला कधी येतील कोण जाणे.
ही काही या एका इमारतीची गोष्ट नाही, मुंबईत सगळीकडेच हे चित्र दिसतंय. मुलुंडमध्ये आम्ही दहा वर्षांपूर्वी राहायला आलो, त्यानंतर इतक्या इमारती पाडून रिडेव्हलप झाल्यात की नकाशाच बदललाय जणू इकडचा. पण जितक्या नवीन बांधल्या गेल्यात, तितक्याच अर्धवट अवस्थेत लटकलेल्याही आहेत. अनेक इमारतींचं काम सुरू होणार लगेच, असं ऐकायला येत होतं त्या अजून तशाच आहेत. बिल्डरशी डीलदेखील झालेलं नाही, पुढचं काम तर सोडाच. या त्रिशंकू अवस्थेत बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत, ही आणखीनच खंतावणारी बाब. बहुतेकांना या रिडेव्हलपमेंटमध्ये रस नाही, परंतु अनेकदा मुलांना असलेल्या पैशांच्या मोहामुळे किंवा इतर शेजाऱ्यांच्या दबावामुळे, ते याला तयार होताना दिसतात. सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींना असं सगळं विश्व नवीन उभारणं किती कठीण जात असेल, याची कल्पनाही करवत नाही.
दादरला हिंदु कॅलनीत राहणारी माझी मैत्रीण अनु. तिच्या आईवडिलांच्या इमारतीत ८० टक्के ज्येष्ठ नागरिक, वसाहतीतल्या बहुतेक इमारतींची हीच स्थिती. त्यांच्यापैकी अनेकींना हिने बोलून बिल्डरविरुद्ध उभं राहायचं बळ दिलं, प्रसंगी त्यांच्या मुलांशी बोलली. त्यांचं उरलेलं आयुष्य नीट जावं म्हणून तिने खूप धडपड केलीन.
तशीच बोरिवलीत वकिली करणारी नीता. घरांचे करार व त्यांचं ड्राफ्टिंग ही तिची खासियत. कामाच्या निमित्ताने तिचीही रोजचीच गाठ असे ज्येष्ठ नागरिक, बिल्डरांची माणसं आणि सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्याशी पडते. तिनेही अनेकांना योग्य सल्ला देउन फसवणुकीपासून वाचवलंय.
वरच्या छायाचित्रात जी पिवळी इमारत आहे ना ती आहे हाउसिंग बोर्डाच्या इमारतीतील रहिवाशांसाठी बांधलेली. ही इमारत होती इंग्रजी एल आकाराची. सात आठ वर्षांपूर्वी त्या एलच्या कण्यातच ती उभी फाकली. तातडीने इमारत रिकामी करण्यात आली. त्यात राहणाऱ्या माझ्या मित्राने किमान पाच घरं तरी बदललीत आतापर्यंत. म्हणजे एकाच घरात राहायला त्याची हरकत नव्हती, पण त्या घरमालकांनी इतकं सहकार्य नाही केलं त्याला. त्यातच त्याच्या मुलाची दहावी पार पडली. दिवाळी, पाडवा, गणपती, पुढची दिवाळी असं करता करता वाट पाहून तो थकून गेलाय अगदी.

कधीतरी ही वेळ आमच्यावर पण येणारच आहे. ती येऊ नये अशी तीव्र इच्छा मात्र आहे. एक घर सोडून दुसऱ्या घरात स्थानापन्न व्हायचा अनुभव लग्न झालेल्या सगळ्या मुलींना असतो. तो अर्थातच हवाहवासा, आपल्या हक्काचा, आपण निवडलेला. रिडेव्हलपमेंट मात्र नेहमीच तसा असेल असं नाही ना?

Comments