सत्तातुराणाम्...

टीव्हीवर नवीन मंत्र्यांचा शपथविधी सुरू आहे आत्ता. शिवसेनेच्या या आमदारांना भगवे फेटे वगैरे बांधून तो-यात शपथ घेताना पाहून मनात भावनांचा कल्लोळ उडाला. अंहं. भरून बिरून नाही आलं काही. खरं तर नक्की काय वाटलं तेच समजलं नाही. थोडा राग, थोडी दया, थोडी निराशा आणि थोडं हसू. असं सगळं एकसमयावच्छेदेकरून वाटायला लागलं.

म्हणजे एखाद्या घरात जुळे भाऊ असतात; पण एकाचं लग्न आधी नि दुस-याचं नंतर होतं. त्यामुळे आधी लग्न झालेल्याच्या बायकोकडे मोठ्या जाऊबाई म्हणून पाहिलं जातं. यथावकाश दुसरी येते. दोघी एकत्र नांदू लागतात. तांत्रिकदृष्ट्या दोघींची पायरी एकच; पण पहिलीच्या हातात घरातली बरीच सूत्रं आधी आलेली असतात. दुसरीच्या हे लक्षात येतं काही महिन्यांनंतर. मग सासू, सासरे, नवरा, नणंद, दीर, शेजारी अशा सगळ्यांच्या कानावर पडेल अशा पद्धतीने "मलाही तिच्याइतकाच मान मिळाला पाहिजे,' हे वेगवेगळ्या प्रकारे बोललं जातं. कधी यानंतर फारकतही होते दोन कुटुंबांची. पण पुन्हा काही काळाने सगळे एकत्र होतात आणि धाकटीलाही हवा तो मान मिळतो. तसंच नाही का हे? शिवसेनेला हवी होती राज्यावरची सत्ता नि या सूनबाईंना हवी होती घरावरची सत्ता. नावाची का होईना, कशी का होईना सत्ता मिळाली, याचा आनंद खरंच वाटून घ्यायचा? की इतर कोणत्या मार्गाने जनतेवर (पक्षी : कुटुंबीयांवर) राज्य करता येण्याचा मार्ग शोधायला हवा होता?

बायका पक्क्या राजकारणी असतात, त्यांच्यासारखे डावपेच आपल्याला जमणं अशक्य, असं पुरुष मानतात. घराघरांत जितकं राजकारण खेळलं जातं तितकं भलेभले राजकारणीसुद्धा खेळत नाहीत, असं आपापल्या घरांमधल्या घडामोडींनंतर त्यांना वाटत असतं. पण महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत जे काही राजकारण सुरू आहे, ते तथाकथित मुत्सद्दी, कावेबाज, धूर्त, वगैरे बायांनाही पार मागे टाकणारं आहे, असंच म्हणावंसं वाटतंय. आता राज्याच्या भल्यासाठी या राजकारणाचा योग्य वापर होऊ द्या, म्हणजे झालं. नाही तर, एकाला झाकून दुस-याला काढलं असं वाटायचं रयतेला. काय?

Comments