इतकं तरी करूच


आत्महत्या करणा-या व्यक्तीला नेमकं काय वाटत असतं, तिची/त्याची मन:स्थिती नक्की काय असते हे इतरांना कधीच कळू शकत नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या व्यक्तीची मन:स्थिती कळू शकते, परंतु ती प्रयत्न करणा-याचीच असते. ज्याचा जीव गेला, त्याला काय वाटत होतं, याचा आपण अंदाज करू शकतो केवळ.' अनेक वर्षांपूर्वी हे वाचलं होतं. आज आठवण्याचं कारण म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा मानण्यात येऊ नये, अशी विधी आयोगाने केलेली शिफारस केंद्राने मान्य केल्याची बातमी. आत्महत्या काही आनंदाने आपलं आयुष्य संपवत नसतो, त्याला काही कोणावर सूड उगवायचा नसतो. तर त्याचं हे कृत्य आत्यंतिक नैराश्य, खंत वा क्वचित चीड यांतून घडलेलं असतं. त्याला गरज असते ती समजून घेण्याची, त्याचा प्रश्न समजून घेण्याची, त्याच्याशी संवाद साधण्याची. त्याला जगायचं असतंच, पण जगण्याचा मार्ग सापडत नसतो, जगून अर्थ नाही असं वाटत असतं. हा मार्ग दाखवायला कोणी तरी लागतं, जगण्यातला अर्थ समजवायला कोणी तरी आपलं लागतं. आत्महत्या करणारी व्यक्ती बहुतांश वेळा आपल्याला आयुष्य संपवायचंय हे बोलून दाखवत असते, किंवा कृतीतून सांगायचा प्रयत्न करत असते.
ते समजून घेऊन, तो इशारा जाणून आजूबाजूच्या माणसांनी म्हणजे मुख्यत्वे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी काही केलं तर ती व्यक्ती आत्महत्येच्या विचारापासून दूर जाऊ शकते. त्यासाठी आवश्यकता आहे ती आपल्यातली संवेदना जागृत ठेवण्याची, आपल्या आसपासच्या माणसांमधले छोटेमोठे बदल टिपायची, काळजी घेण्याची.
व्हाॅट्सअ‍ॅपवर फोटो पाठवून नंतरही बीडमधल्या त्या युवकाला कोणीच काही म्हणालं नाही आणि अखेर त्याने जीव दिलाच. त्याच्या एकाही मित्राला हा फोटो पाहून काही तरी गडबड आहे, त्याला मदतीची गरज आहे, असं वाटलं नाही, हे आपल्या संवेदना क्षीण होत चालल्याचंच लक्षण आहे.
अनेकांना अनेक वेळा असं वाटलेलं असतं, संपवावं हे आयुष्य; पण त्यांना आयुष्यातल्या सुंदर गोष्टीही जाणवलेल्या असतात आणि ते जगणं सुरू ठेवतात. काही दुर्दैवी जीव असे असतात, ज्यांना या सुंदर गाेष्टी दाखवून द्याव्या लागतात. एवढं तर आपण करू शकतोच ना?

Comments