हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
कविवर्य बा.भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब यांच्या ‘स्वर्ग नको सुरलोक नको’ या कवितेतील या शेवटच्या ओळी. भरभरून जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणार्या. स्वर्ग नको, मला लोभस असा हा इहलोकच हवा, माझ्या वैश्वानराला नित्य नवा घास हवा, या पृथ्वीवर राहताना मिळणारं सुख सतत मिळत राहायला हवंय, चौर्यांशी लक्ष योनींचा प्रवास करून मनुष्यजन्म हवाय तो इथला आनंद लुटण्यासाठी. सर्व जग मोहमाया आहे, त्यातून मुक्ती हवी, कशाचा लोभ धरू नका, आसक्ती नको, असं विरक्तीपूर्ण संदेश एका बाजूला आणि बाकीबाबांचा हा आनंदवादी संदेश दुसर्या बाजूला. या आनंदात सगळं कसं छानछान, गुलाबी गुलाबी असावं असा हेतू नाहीये, तशी अपेक्षाही नाहीये. कारण जगात दुष्ट प्रवृत्ती, दु:ख, निराशा, अपेक्षाभंग, पराभव, अपयश असणारच हे गृहीत धरून त्यांनी हे लिहिलंय. हे सगळं माझ्या पदरात आलं तरी त्यावर मात करण्याची, ते पचवायची, सहन करायची शक्ती मला हवीय, असं त्यांचं आग्रही मागणं आहे. या सगळ्या तथाकथित ‘काळ्या’ अनुभवांशिवाय ‘पांढर्या’ अनुभवांची किंमत आपल्याला कळणार नाही, हे ते जाणून होते. म्हणूनच त्यांनी कदाचित ते सगळं न नाकारता, नवनवीन गोष्टी अनुभवाला येवोत, असं आर्जव केलंय. ‘या’ बाजूशिवाय ‘त्या’ बाजूला महत्त्व नाही, विज्ञानाची कास धरली तरी माणूसपण गमावून उपयोग नाही, अशी इच्छा यात आहे.
यात इच्छा आहे नव्याची. आपल्यालाही ती आहेच, म्हणूनच इंग्रजी वा भारतीय
दिनदर्शिकेनुसार येणार्या नव्या वर्षाची आपण उत्सुकतेने वाट पाहतो, शेवटचा
दिवस साजरा करतो, नवीन दिवसाचं उत्साहाने स्वागत करतो, नव्या वर्षासाठी
कायकाय करायचं, कुठे जायचं, कुणाला भेटायचं, वागण्यात काय बदल करायचे, असं
सगळं ठरवतो. नवीन संकल्प करतो, ते पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतोच करतो.
निदान जानेवारी संपेपर्यंत तरी संकल्पानुसार वागतोच आपण की नाही?
आम्हीही म्हणूनच या अंकापासून काही नवे स्तंभ घेऊन येतोय, काही जुने सुरूच
राहतील. नवं मिळालं तरी जुन्याचा दिलासाही हवाहवासाच असतो ना?
Comments
Post a Comment