(रसिक, दैनिक दिव्य मराठी, ७ जानेवारी २०१२)
भानुकुल. देवास या इंदूरजवळच्या छोट्याशा गावातलं घर. झाडीत लपलेलं. या घराकडे जाण्यासाठी आपण ज्या गल्लीत वळतो ती पुढे जात असते जबरेश्वर महादेवाच्या मंदिरात. त्यामुळेच गल्लीत शिरताशिरताच हार, फुलं, नारळ यांचे स्टॉल्स दिसू लागतात आणि विक्रेते गाडीच्या समोर येऊन त्यांच्याचकडून हार घेण्याची विनंतीवजा जबरदस्ती करू लागलेले असतात. मग जेव्हा आपण त्यांना सांगतो की ‘कुमार जी के घर जाना है’ तेव्हा ते रस्ता सोडतात आणि घराकडे बोट दाखवतात. मग आपण घरापाशी जातो, जरा जोर लावून फाटक उघडून जातो. प्रशस्त ओसरीवर उभे राहून मुख्य घराचे दार वाजवतो. दाराला जाळी लावलेली असते. ती का, ते थोड्याच वेळात होणा-या डासांच्या आगमनामुळे लक्षात येते. प्रसन्न हसत कलापिनी कोमकली दार उघडतात आणि ओसरीवर असलेल्या सोफ्यावर बसायला सांगतात. आपण दस्तुरखुद्द कुमार गंधर्वांच्या घरी बसलो आहोत, त्यांची कन्या आपल्यासमोर बसली आहे आणि आपल्याला बोलायला शब्दच सुचत नाहीत. मग त्याच म्हणतात, चहा घेणार की कॉफी? आपण भानावर येतो, चहा चालेल. तेवढ्यात वसुंधरा कोमकली हळूहळू पावले टाकत बाहेर येतात आणि झोपाळ्यावर बसतात. माझी नेहमीची जागा, त्या सांगतात. कलापिनी चहा करायला आत जातात, मध्येच कुणाला हाक मारून मागच्या अंगणातला पसारा आवरायला सांगतात. कारण रात्री घरी पाहुणेमंडळी येणार असतात जेवायला.
वसुंधरातार्इंचं आता वय झालेलं असलं तरी त्या अजूनही उत्तम गातात. दुस-याच दिवशी त्या दौ-यावर निघणार असतात. पण त्या गप्पांमध्ये सहभागी होत नाहीत. एखादा फोटो काढू का विचारल्यावर सावरून बसतात, एवढेच. चहा येतो, त्या दोघींसोबत चहा पिता पिता गप्पा होतात. कलापिनी म्हणतात, ‘आम्हाला इकडे हल्ली मराठी पेपरच वाचायला मिळत नाही. हिंदी ही माझीच भाषा असली तरी आम्हाला दोघींनाही मराठी वाचायला अतिशय आवडतं. पेपर एखादा दिवस उशिरा मिळाला तरी चालतो, बातम्या शिळ्या झालेल्या असतात, पण बाकीचं वाचायला किती असतं.’ यावर अर्थातच माझ्याकडे उत्तर नसतं. मग त्या मला म्हणतात, ‘या, मी तुम्हाला बाबांची खोली दाखवते.’ आत दिवाणखान्यात कुमारजींना मिळालेली अनेक प्रशस्तिपत्रकं लावलेली असतात. त्यात असतं ते नऊ वर्षांचे असताना त्यांना चिक्क गंधर्व म्हणजेच कुमार गंधर्व ही पदवी प्रदान करणारं कानडीत लिहिलेलं प्रशस्तिपत्रक. कुमारजींच्या बाल, कुमार आणि तरुण वयातली जुनी आणि इतरत्र कुठेही पाहायला न मिळणारी छायाचित्रंही तिथे असतात. पंडित नेहरूंच्या पहिल्या आणि शेवटच्या मध्यप्रांत भेटीच्या वेळचे एक छायाचित्र त्यात आहे. आणखी एक आहे कुमारजी त्यांच्या वडलांसोबत गातानाचे. एका भिंतीवर आहेत फक्त तीन प्रमाणपत्रे. दोन कुमारजींना पद्मभूषण आणि पद्मविभूषण मिळाल्याची तर तिसरे वसुंधरातार्इंना पद्मश्री मिळाल्याचे. एकाच घरातील दोन व्यक्तींना एका कलाप्रांतातील कामगिरीसाठी पद्म पुरस्कार मिळाल्याचे हे दुर्मीळ उदाहरण असल्याचे कलापिनी अभिमानाने सांगतात. मग त्या घेऊन जातात कुमारजींच्या खोलीत, जिथे बसून ते गायचे आणि शिकवायचे. अत्यंत स्वच्छ, साधी आणि प्रसन्न अशी ही खोली. त्यांच्या बैठकीसमोर ठेवलेली चाफ्याची ताजी फुलं, तानपुरा, त्यांची पुस्तकं आणि अनेक छायाचित्रं या खोलीत आजही कुमारजी राहत असल्याचाच भास निर्माण करतात. या दोन्ही खोल्यांमध्ये मात्र त्या फोटो काढू देत नाहीत. ‘हे आमचं राहतं घर आहे, त्याचं खासगीपण जपणं आम्हाला आवश्यक वाटतं,’ हे त्यांचं स्पष्टीकरण अर्थातच पटण्याजोगं असतं
कुमारजींच्या मृत्यूला वीस वर्षे लोटली तरी आजही अनेक गानप्रेमी या घराला आवर्जून भेट देतात, याचे कलापिनींना अतिशय कौतुक वाटते. ‘माझे बाबा होते म्हणून नव्हे, पण जिथे जिवंत व्यक्ती सहजी विस्मरणात जाते तिथे दोन दशके उलटून गेल्यानंतरही लोकांना बाबा काय होते, कसे होते, त्यांचं गाणं म्हणजे नेमकं काय होतं हे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अनेक जण आजही येथे येतात, हे अतिशय क्रेडिटेबल आहे,’ त्या सांगतात. देवासमध्ये कुमारजींचे अन्य कोणतेही स्मारक नाही. ‘कारण बाबांचा या सगळ्यावर विश्वास नव्हता, किंबहुना त्यांना त्याची चीड होती. पुतळा उभारला तर त्यावर शेवटी कावळाच शिटणार, असं ते नेहमी म्हणायचे. त्यांनी आम्हाला स्पष्ट काही सांगितलं नसलं तरी आम्हाला त्यांचे विचार माहीत होते,’ कलापिनी म्हणाल्या. देवासमध्ये दरवर्षी मोकळ्या मैदानावर दोन दिवस कुमार गंधर्व स्मृती महोत्सवात उत्तमोत्तम गाणं सादर होतं. कुमारजींच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने भानुकुलमध्येच, कुमारजींच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण व चलचित्रण याचा निवडक लोकांना आस्वाद घेता येतो. ‘घरातले आम्ही सगळेच या क्षेत्रात आहोत. त्यामुळेच आम्हाला त्यांचा वारसा जपून ठेवणं शक्य झालंय. नाही तर हे घर, त्यांची खोली तिच्या पावित्र्यासह जतन करणे कठीण होऊन बसले असते,’ असे कलापिनी मान्य करतात.
नंतर विषय निघतो तरुण पिढीतील कलाकारांचा आणि श्रोत्यांचा. मुंबई-पुण्यातल्या मोठमोठ्या महोत्सवांमधून तीच-तीच नावे असतात, मग आणखी काही वर्षांनी आम्ही गाणे ऐकायचे तरी कोणाचे, या माझ्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, गाणारे खूप आहेत, चांगलं गाणारेही खूप आहेत. ‘पण सर्वांचंच नेटवर्किंग तितकंसं चांगलं नसतं किंवा पीआर नसतो. आणि महोत्सवांमधून मोठी नावंच खपतात, असा आयोजकांचा दावा असतो. त्यामुळे तीच-तीच नावं येतात समोर.’ आणि ऐकणा-यांचं म्हणाल तर या संगीतात एवढी मेलडी आहे, सुरांची जादू एवढी आहे की एकदा ऐकणारा त्याच्या जाळ्यात ओढला जातोच. आज आम्ही तरुण मुलांसमोर, महाविद्यालयांमध्ये गातो तेव्हा मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला असतो, मला माझं गाणं ऐकायला फक्त पांढरे केसच येणार, असं बिलकुल वाटत नाही, कलापिनी म्हणाल्या. निघायची वेळ होते, संध्याकाळ होत आलेली असते आणि हवेत चांगलाच गारठा जाणवू लागतो. दीड तास कसा गेला ते समजलेलेच नसते. इतका वेळ दिल्याबद्दल कलापिनींचे आभार मानून आपण निरोप घेतो. त्या प्रसन्न आणि भारलेल्या वातावरणाच्या धुनकीत इंदूरचा तासाभराचा प्रवासही अल्लद काटला जातो.
Comments
Post a Comment