तुम्हाला पतंग उडवणारी मुलगी माहीत आहे का हो कोणी? नाही, संक्रांतीचे दिवस आहेत, त्यामुळे ज्या मुलांना अभ्यास/क्लास/ट्यूशन यांतनं वेळ आहे ती पतंग उडवतायत मनसोक्त. ज्यांना वेळ नाही, ती पतंग उडवायची स्वप्नं पाहत पुस्तकात डोकं घालून आहेत. पण या चित्रात एकही मुलगी औषधालादेखील दिसत नाहीये. म्हणून विचारतेय, अशी पतंगांच्या दुनियेत भान हरपणारी मुलगी माहीत आहे का तुम्हाला? की मुली फक्त गणपती उत्सवात किंवा शाळाकाॅलेजातल्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ या गाण्यावर नाच करतात? की ‘कटी पतंग’ नावाचा सिनेमा पाहताना अश्रू ढाळतात? की शाळेत चित्रकलेच्या तासाला पतंगाचं चित्र रंगवतात आणि हस्तकलेच्या तासाला पतंग तयार करतात? की फक्त घरी संक्रांतीचं हळदीकुंकू असेल तर छानछान कपडे घालून आईला मदत करतात? किती जणींना पतंग करता येतो, कणी, आस, फिरकी/चक्री/रिंगी, सूत्र, मांजा, काटाकाटी, पतंग कापणे, कायपो छे, गोता खाणे, भरदूर, धाप खाणे, ढील देणे, बदवणे, हे शब्द माहीत आहेत? त्याच्यामागचं विज्ञान ठाऊक आहे?
पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं, तो घरात बसून खेळता येत नाही, यामुळे तर मुली या खेळापासून दूर नाहीत? कारण पतंग उडवायला शक्ती लागत नाही, तो काही महागडा खेळ नाही, तो दिवसाउजेडीच खेळला जातो. त्याला लागतं एक कौशल्य. पतंग बांधण्याचं तर आहेच, त्याची कणी, तिचा कोन, आस सगळं एका विशिष्ट प्रकारेच बनवावं लागतं, सूत्र बांधतानाही समतोल साधणं अत्यावश्यक असतं. मांजा तयार करणं हे तर येरागबाळ्याचे काम नोहे. खळ,
काचेची पूड वगैरेत घोळवलेला तो दोरा तयार करणं जिकिरीचं तितकंच तो हाताळणंही धोकादायक. यष्टिरक्षक धोनीच्या बोटांना नसतील तितक्या पट्ट्या अट्टल पतंगबाजांच्या बोटांना गुंडाळलेल्या असतात, आणि या पट्ट्या ते मानाने मिरवतात. हे दोन्ही तयार झाले की वा-याची दिशा ओळखून पतंग वर वर बदवणं हे वेगळंच कौशल्य. कदाचित अनुभवाने येणारं. पण मुलग्यांनाच जमेल नि मुलींना नाही, असं तर यात काही वाटत नाही.
तरीही का बरं मुली या वेड लावणा-या खेळापासून दूर?
तरीही का बरं मुली या वेड लावणा-या खेळापासून दूर?
Comments
Post a Comment