जादुई जॅनफेस्ट

मला गाण्यातलं तांत्रिक काहीही कळत नाही. त्यामुळे या लिखाणात गाण्याचं विश्लेषण नाही. हा केवळ माहोल शब्दांत उतरवायचा प्रयत्न आहे, याची जाणीव आहे. (१९७३पासून झेवियर्सच्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या जॅनफेस्ट या उपक्रमाला दिलेली ही दाद आहे.)


जयपूर लिटफेस्ट करून रविवारी सकाळी घरी पोचले होते, झोप झालेली नव्हती आणि बऱ्यापैकी दमलेली होते. पण संध्याकाळी झेवियर्समध्ये इंडियन म्युझिक ग्रूपच्या जॅनफेस्टला जायचं होतं, त्यामुळे दुपारीही आराम नाही करता आला फारसा. सहाला झेवियर्सला पोचलो तो तिथल्या वातावरणाने खूपसा थकवा दूर झाला. शंभरहून अधिक वर्षांपूर्वीच्या गाॅथिक शैलीतील या वास्तूतल्या मधल्या प्रशस्त चौकात खुर्च्या मांडलेल्या होत्या. साडी नेसलेल्या मुली व कुडते घातलेले मुलगे अशी कार्यकर्त्यांची फळी रसिकांच्या मदतीसाठी तत्पर उभी होती. हलक्या निळ्या, खरं तर चिंतामणी, व किरमिजी रंगाचे झोत खालून वर सोडले होते. पांढरंशुभ्र स्टेज, मोजक्या फुलांनी सजवलेलं. स्टेजच्या मागच्या भिंतीवर ग्लास पेंटिग्ज आहेत, त्यांना आतून लावलेल्या दिव्यांमुळे सुंदर उठाव आला होता. हवेत छान गारवा होता. एका बाजूला चौथ्या मजल्यावर दोन पोपट ओरडत होते, बराच वेळ. थोड्या वेळाने समोर, पूर्वेच्या राखाडी आकाशात पाचसात घारींचा थवा घिरट्या घालू लागला.
ठीक सहा वाजता निवेदनाला सुरुवात झाली व सूचना मिळाल्या, कोणत्याही प्रकारचं रेकाॅर्डिंग करू नये व फोटो काढू नयेत. फोटो काढताना सापडल्यास ते डििलट करण्यात येतील. फोटो काढायचा मोह व्हावा, असंच ते वातावरण होतं परंतु इंडियन म्युझिक ग्रूप आपल्या कार्यक्रमांचं वेगळेपण जपत असतो, त्यामुळे फोटो वा रेकाॅर्डिंगवर त्यांचा पूर्ण हक्क असतो. त्याच्या सीडी उपलब्ध असतात. व झेवियर्सच्या लायब्ररीतही ते उपलब्ध असते.
सव्वासहा वाजता कौशिकी चक्रवर्ती मंचावर आली. काळी, गडद जांभळ्या काठांची रेशमी साडी, कानात हिऱ्यांचे डूल आणि मोकळे सोडलेले कुरळे केस. "अगं, हिने केस कापलेत वाटतं, मागच्या वेळी पाहिलं तेव्हा केवढा मोठा शेपटा होता.' नमस्कार करून ती म्हणाली, झेवियर्समध्ये गाणं खूप स्पेशल असतं. आणि मला नेहमी वाटतं, की आमच्या काॅलेजात असं काही का नव्हतं.
मधुवंतीमधील शाम भई घनश्याम नहीं अाये द्वारे या चीजेने तिने सुरुवात केली. शाम हो रही थी हलके हलके और कौशिकी का गाना भी उसी तरह हलकेसे आगे जा रहा था. जवळजवळ पाऊण तास ती गात होती आणि रसिक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जागेवरचं हलायचीही इच्छा नव्हती होत. सर्व सप्तकांमधनं अल्लाद फिरणारा तिचा सूर ऐकून माझा थकवा तर कुठेच पळून गेला होता. पेटीवर साथीला असलेले पं. अजय जोगळेकर आणि तबल्यावर साथ करणारे सत्यजित तळवलकर यांनी तिला उत्तम साथ दिली. अजयजींची पेटी तर अतिशय गोड वाजत होती. द्रुतमध्ये कौशिकीने काहे मान करो, सखी री अब ही चीज घेतली.
नंतर ख्याल की ठुमरी असा सवाल तिने प्रेक्षकांना केल्यावर अर्थातच ठुमरीची मेजाॅरिटी होती. मग तिने मोरे सैंया बेदर्दी बन गये ही ठुमरी गायली. कौशिकीची ही ठुमरी सीडी वा यूट्यूबवर उपलब्ध आहेच, पण प्रत्यक्ष ऐकायला बहार आली.
संपवून ती उठली, परंतु प्रेक्षकांमधनं वन्स मोअर आल्यानं ती पुन्हा बसली आणि अजयजींनी फर्माईश केल्यानुसार, तिची लाडकी रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया ये ही ठुमरी गायली. त्यातला लटका राग, लाडिक तक्रार अगदी सहजी आपल्यापर्यंत पोचते. दिल गुलाबी होऊन जातं.
यानंतर होतं राहुल शर्माचा संतूरवादन. संतूरचे पहिले सूरच आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. आपण मुंबईत तर नक्कीच राहात नाही. सोबतीला पखावजवर पं. भवानी शंकर यांना पाहून चक्रावलो परंतु या दोन विजोड वाटणाऱ्या वाद्यांनी अशी काही जादू केली, की साडेनऊ कधी व कसे वाजले ते कळलेच नाही. पखावज संतूरला भारी होत नव्हता, तर साथच करत होता, हे पंडितजींचं केवढंं मोठं श्रेय.
भारावलेल्या अवस्थेत बाहेर निघालो व सीएसटीच्या दिशेने चालू पडलो. थोडं चालल्यावर सीएसटीची भव्य वास्तू तिरंगी रोशणाईने सजलेली समोर आली. खूपच मस्त. आणि मग डोळ्यांना खुपेल अशी रोशणाई िदसली महापालिकेच्या इमारतीवरची. लग्नाच्या वेळी इमारतीवरून जशा पिवळ्या दिव्यांच्या माळा सोडतात, तशा या सुंदर इमारतीवरून सोडलेल्या होत्या. त्यातच घुमटाचं काम सुरू आहे, म्हणून पराती बांधलेल्या. एकूणच कठीण दृश्य होतं ते.
दुसऱ्या दिवशी एक घरचं लग्न आटोपून चार वाजता घरी आलो, आणि तासाभरात पुन्हा निघालो झेवियर्सच्या वाटेने.
रोणू मजुमदार यांची बासरी आणि बाॅम्बे जयश्री यांचं गायन अशी जुगलबंदी होती सुरुवातीलाच. पंडितजींनी झिंझोटी सुरू केला. जयश्रीबाईंनी सरस सामदान वेददंड चतुर ही संत त्यागराजांची रचना गायली. झिंझोटी मी फारसा पूर्वी ऐकलेला नाही, त्यामुळे मला त्याचे संदर्भ लागेनात. माझं गाणं ऐकणं म्हणजे हे सूर कसे आहेत, कोणती गाणी, ठुमऱ्या यात आहेत, याचा ठाव घेण्यात माझं लक्ष असतं खूप. आता झिंझोटी ऐकायला हवा अनेकदा.
आज आभाळ एकदम स्वच्छ होतं. त्यामुळे पूर्वेच्या आकाशात उगवलेलं मृगशीर्ष नक्षत्र अगदी स्पष्ट दिसत होतं. बरोबर डोक्यावर चंद्रही होता.
जयश्रीबाईंनी नंतर बागेश्री अंगाने जाणाऱ्या जयजयवंतीमधील मोरे मंदिर अजहुन नहीं आये ही चीज घेतली. बासरी, तबला, पेटी आणि मृदंगम हे काॅम्बिनेशन मस्त जुळून आलं होतं.
पावणेआठला जुगलबंदी संपली अाणि झेवियर्सचे प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारनेस मंचावर आले. ते तीनचार महिन्यात निवृत्त होत असल्याने, हा त्यांचा अखेरचा जॅनफेस्ट होता. बारा वर्षांपासून ते आयएमजीला सहकार्य देत आले आहेत. ते मोजकंच बोलले परंतु एकदम भिडेल असं. "आपण इथे संगीताचा आनंद घेताय, ताजेतवाने होताय, पण जर हा आनंद आपण इतरांशी शेअर करू शकलो, आपल्या वागण्याबोलण्यात तो आणू शकलो, तर त्याचा खरा उपयोग आहे.' यानंतर त्यांनी आयएमजीच्या बारा विद्यार्थ्यांच्या समितीची ओळख करून दिली. या विद्यार्थ्यांमध्ये पाचसहा नावं मराठी होती, हे पटकन लक्षात आलं. छान वाटलं. मग मंचावर आले हिमांशु राॅय, एक जबरदस्त प्रभावी व्यक्ती. "विविधतेत एकता असं आपण म्हणतो, वाचतो पण याचा खरा अर्थ इथे कळतो. एका ख्रिस्ती संस्थेने, गाॅथिक वास्तूत आयोजित केलेल्या हिंदुस्थानी/कर्नाटकी शास्त्रीय गायनाचा आपण आस्वाद घेतोय, हा आहे.' एक पोलीस अधिकारी या नात्याने त्यांना विविध भाषेचे व धर्माचे कलाकार व रसिक इथे एकत्र आलेत, हे म्हणता आले नसावे कदाचित, पण ते तीव्रपण जाणवलेच.
ही भाषणे सुरू असतानाच लालजर्द झब्बा घातलेले उस्ताद राशीद खान व त्यांचे साथीदार मंचावर येऊन वाद्ये लावून तयारीत बसलेले होते. उस्तादजींनी निव्वळ एक नमस्कार केला आणि सा लावला. बागेश्रीमधील बलमा मोरी तुमसे लागली प्रीत हा एकतालातला विलंबित बडा ख्याल ऐकताना इतर कसलाही विचार मनात येणं शक्य नव्हतं. ते तब्येतीत गात होते. तबल्यावर योगेश सम्सी, पेटीवर अजय जोगळेकर, सारंगीवर मुराद अली यांची संगत बहारदार होती. पण आब राखून. उस्तादजींच्या सुरांसमोर नतमस्तक झाल्यासारखी. द्रुतमध्ये तराना गाऊन त्यांनी बागेश्रीची अखेर केली. दुसऱ्याच मिनिटाला उन संग लागी प्रीत बलमा ही चीज त्यांनी सुरू केली. राग कोणता हे मला ओळखता आले नाही, शोध सुरू आहे.
शेवट भैरवी. आज राधा ब्रिज को चली. पंडितजी त्यांच्याच विश्वात रंगून गात होते. समोर कोणी आहेत, याची तमा नव्हती त्यांना. अनादर नव्हता प्रेक्षकांचा, पण ते समोर नसते तरी ते तसेच गायले असते, असंच वाटत राहिलं.
कार्यक्रम संपला तेव्हा समोर असलेलं मृगशीर्ष डोक्यावर येऊन पोचलं होतं. साडेतीनचार तास एका जागी बसून निघून गेलेत त्याचा तो दृश्य पुरावा होता. मनात साठवलेल्या सुरेल आठवणी अशा दाखवता येण्याजोग्या नव्हत्याच ना.

Comments