पौर्णिमा

रात्री दीडदोनच्या सुमारास जाग आली तर डोळ्यांवर भसकन उजेड आला. अचानक असा प्रकाशाचा झोत दिसल्याने काही क्षण गोंधळले. मग लक्षात आलं, चंद्राचा उजेड होता तो. पौर्णिमेच्या चंद्राचा. घराच्या खिडकीची रचना अशी आहे, की पलंगावर झोपल्यावर पश्चिमेचं खूप मोठं आभाळ दिसतं. त्यामुळे झाडांची डोकी आणि अाभाळभर पसरलेला मोठ्ठा चंद्र रात्री सोबतीला असतात. मला चंद्राचं फार आकर्षण आहे. चंद्राची प्रतिपदेची वा द्वितियेची कोर आॅफिसातून घरी जाताना ट्रेनमधून पश्चिमेच्या आकाशात दर महिन्यात दिसते. अनेकदा मी व्हाॅट्सअॅपवर मित्रमैत्रिणींना लगेच सांगतेही, अगं/अरे, चंद्र पाहा आजचा. खगोल मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांसोबत वांगणीला आकाशदर्शन करून आल्यानंतर यात पडलेली भर म्हणजे - see the moon at 9 O'clock position in the western skies!
तर आज पौषातली, शाकंभरी पौर्णिमा हे कॅलेंडर पाहिल्यावर कळलं. हटकून वाईजवळच्या काळूमाईच्या जत्रेत काही वर्षांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण होतेच या दिवशी. आपले कितीतरी सण पौर्णिमेला आहेत, याचीही जाणीव होते. आणि अाजकाल आपण पौर्णिमा अमावास्या ही कालगणना जणू विसरूनच गेलोय, याचीही. खरं तर ते लक्षात ठेवायला, लक्षात यायला किती सोपं. आकाशात पूर्ण चंद्र दिसला की पौर्णिमा जवळ आलीये हे कळण्याइतके सजग असतोच ना आपण. चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमानजयंती (माझ्या मावशीच्या गावी पनवेलजवळ चिखल्याला हनुमानजयंतीचा मोठा उत्सव असतो, एका वर्षी गेलो होतो बरीच भावंडं तिथे, खूप आवडलं होतं ते वातावरण ), वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्धजयंती (वाईच्या चुलतबहिणीचा वाढदिवस), ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा (लग्नानंतर पहिल्याच वर्षी भीमाशंकरला होतो या दिवशी),  आषाढातली गुरुपौर्णिमा (रूपारेलमध्ये जाऊन नंदिनी दिवाण आणि नीता ताटके यांना भेटण्यासाठी राखून ठेवलेला दिवस, आणि २००७मध्ये मुंबईत लोकलमध्ये याच दिवशी झालेले भीषण बाॅम्बस्फोट), श्रावणातली राखी पौर्णिमा, भाद्रपदातली पौर्णिमा येते गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (पितृपक्षाची सुरुवात त्याच्या पुढच्या दिवसापासून), आश्विनातली कोजागिरी पौर्णिमा (अश्विनी नावाच्या बहुतांश मुलींचा वाढदिवस आणि बिल्डिंगच्या गच्चीत मैत्रिणींसोबत घेतलेलं मसाला दूध), कार्तिकात त्रिपुरी पौर्णिमा/गुरु नानक जयंती (बोरिवलीला मंडपेश्वर गुंफांमध्ये या दिवशी पणत्यांची वेधक रोशणाई असते), मार्गशीर्षात पौर्णिमेला येणारी दत्तजयंती (वाईचा आणि जबलपूरचा दत्तजयंतीचा उत्सव घरातल्या मोठ्यांसाठीचा श्रद्धेचा विषय). आणि सगळ्यात लोकप्रिय फाल्गुनातली होळी पौर्णिमा. एक माघी पौर्णिमेला काही विशेष नाहीये फक्त. प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र वेगवेगळा, आकार आणि रंग वेगळे.
हे सगळे सण आपण साजरे करत नसलो, त्यावर विश्वास नसला तरी अवतीभवती या दिवसांच्या खाणाखुणा दिसत असतातच की. मग कसं काय विसरून गेलो हे आपण?

Comments