शास्त्रज्ञ, संशोधक व लेखक दत्तप्रसाद दाभोळकर यांची भानु काळे यांनी मॅजेस्टिक गप्पांमध्ये ५ जानेवारी २०१४ रोजी घेतलेली मुलाखत एेकण्याचा योग आला. भारतीय वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ/संशोधक यांचं काम, मंगळयान मोहीम, मुंबईत सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये काही संशोधकांनी केलेले प्राचीन भारतातील 'वैज्ञानिक' प्रगतीचे दावे, या सगळ्यावर परखड मते मांडली. आठनऊ भावंडांचं त्यांचं कुटुंब, धार्मिक वडील व नास्तिक आई यांबाबत ते थोडंच बोलले, परंतु ते हृद्य होतं. िवद्यापीठात सुरू असलेल्या सायन्स काँग्रेसमधल्या दाव्यांबाबत बोलताना त्यांनी दोन म्हणींचा उच्चार केला. अति तिथे माती आणि सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. ज्यांनी कोणी पुराणकाळातील प्रगतीचे दावे केले, त्यांनी त्यांचे हे संशोधन निबंध भारताबाहेर कोणत्याही सायन्स काँग्रेसमध्ये वा जर्नलमध्ये प्रसिद्ध करावेत, योग्य ती वैज्ञानिक भाषा वापरून ते समजवावे. पुराणकथांमध्ये असलेल्या माहितीचे योग्य डाॅक्युमेंटेशन करावे, असेही ते म्हणाले.
नर्मदा आंदोलनाबाबत ते जे सांगत होते, ते अचंबित करणारे होते. १९६१मध्ये या प्रकल्पाची कोनशिला बसवण्यात आली, ६२मध्ये युद्धामुळे काम सुरू झाले नाही व ६४मध्ये नेहरूंचे निधन झाल्याने ते मागेच पडले. नंतर १९७९मध्ये यावर एक आयोग नेमण्यात आला, तो आठ वर्षं काम करत होता. ८८मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले, तेव्हा अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. यानंतर दाभोळकरांनी या भागात सहा महिने घालवले, अनेकांशी बोलून माते नर्मदे हे पुस्तक लिहिले, ज्यात धरणाची व प्रकल्पाची आवश्यकता अधोरेखित केली आहे. दत्तप्रसाद यांचे धाकटे भाऊ नरेंद्र व मेधा पाटकर यांची मैत्री होती. "एकदा नरेंद त्यांना म्हणाला, तू बंड्याशी बोलत का नाहीस? तर त्या म्हणाल्या, माझ्या चळवळीला त्यांच्याएवढं नुकसान कोणीही पोचवलेलं नाही.' मी नुकसान पोचवलं असेलही, पण त्याचा मला अभिमान आहे.
स्वामी विवेकांनंदांवर त्यांचे एक पुस्तक आहे. ते खूप मोठे दार्शनिक होते, असे दाभोळकर म्हणाले. "वेद, कुराण, बायबल नसतील अशा ठिकाणी माणसांना न्यायचंय, परंतु ते वेद, कुराण, बायबलच्या मदतीनेच, असं विवेकानंद म्हणायचे. पण ते हेही म्हणाले होते, की धर्माचा सांगाडा माणूस धरून बसेलच. धर्म आर्थिक मांडणीमुळे टिकतो.'
त्यांचे वडील अत्यंत धार्मिक होते, दत्ताचे उपासक. ते साताऱ्यात फौजदारी वकील होते. आई त्या काळात चौथीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात पहिली आली होती. ती नास्तिक होती. ती कुंकू लावत नसे, मंगळसूत्र घालत नसे, सोन्याचा दागिना तिच्याजवळ एकही नव्हता. "अशी दोन विरोधाभासी व्यक्तिमत्त्वे असूनही ते दोघे अत्यंत मजेत राहात होते. धर्म व विज्ञान ज्याला समजले आहे तो माणूस समोरच्या व्यक्तीला समजतो, तिच्याशी संवाद साधू शकतो, हे त्यांच्याकडे पाहून कळते.'
दत्तप्रसाद ८०च्या घरात आहेत. "ज्याला २४ तास कमी पडतात, तो तरुण आणि २४ तास खायला येतात, तो म्हातारा. मला २४ तास कमी पडतात, परंतु आता अखेर जवळ येतेय, हे कळतंय. पण ते छान आहे.' त्यांनी त्यांच्या तीन कविताही सादर केल्या.
तीनशे ते साडेतीनशे रसिक या वेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment