असेही एक फिक्सिंग!


अंतर्नादच्या फेब्रुवारी २०१५च्या अंकातील हा माझा लेख. तो लिहून घेतल्याबद्दल संपादक भानु काळे यांचे आभार.


मी २००६मध्ये पूर्णवेळ पत्रकारिता मुख्यत्वे तब्येतीच्या कारणाने सोडली होती. दर आठवड्याला बदलणाऱ्या ड्यूटीच्या वेळांमुळे माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्यामुळे तडकाफडकी नोकरी सोडून दिली होती आणि घरूनच अनुवादाची कामं करत होते. त्या सुमारास बीबीसीच्या मुंबई ब्यूरोमध्ये काम करणाऱ्या मोनिका चढ्ढा या मैत्रिणीचा एका संध्याकाळी फोन आला. एक ब्रिटिश पत्रकार आणि छायाचित्रकार मुंबईत येत असून त्यांना मी थोडी मदत करू शकेन का, असं तिनं विचारलं. मदत म्हणजे काय, तर त्यांच्यासोबत कामाच्या ठिकाणी जायचं आणि इंग्रजीत त्यांना समजावून सांगायचं. थोडक्यात दुभाष्याचं काम होतं. करून तर पाहू काय आहे, या विचारानं मी ते काम स्वीकारलं.

ब्रिटनमधल्या Loaded या पुरुषांच्या मासिकासाठी (अंहं, तसला काही नव्हता विषय! मुंबईतले उंदीर मारणारे कर्मचारी कसं काम करतात, यावर त्यांना लिहायचं होतं!) लेख लिहायला म्हणून एक वार्ताहर जेमी फुलरटन आणि छायाचित्रकार एड्रियन फिस्क मुंबईत यायचे होते. त्यांना रात्री प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्यांसोबत फिरून काम पाहायचं आणि छायाचित्रं घ्यायची होती. मग मी मुंबई महानगरपालिकेत जाऊन त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या काढल्या. पत्रकार म्हणून पालिका मी काही वर्षं कव्हर केली होती. त्यामुळे ते काम फार कठीण नव्हतं. परंतु, पालिकेत कीटकनाशक अधिकारी आहे हे मला याच निमित्ताने कळलं.

हे उंदीर मारण्याचं काम मुंबईत प्रामुख्यानं (ए, बी, सी, डी विभागांध्ये) नाना चौक, महालक्ष्मी आदी भागात होतं. तेही मध्यरात्रीनंतर. (त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नाइट रॅट किलर म्हटलं जातं.) अशा आडनिडय़ा वेळी एकटं कसं जायचं, असं वाटलं. म्हणून माझ्या त्या परिसरात राहणाऱ्या एका चुलतबहिणीला सोबत घेतलं आणि आम्ही चौघं तिथल्या पालिकेच्या चौकीत गेलो. मध्यरात्रीनंतर हळूहळू उंदीर मारणारे कर्मचारी जमा होऊ लागले. हातात काठय़ा, मोठाले टॉर्च आणि सायकलीला लटकावलेली पिशवी, हे साहित्य सगळ्यांकडे होतं. ते घेऊन आमची वरात निघाली तिकडच्या जुन्या इमारतींच्या परिसरात. इमारतींच्या मागच्या बोळात शिरून हे कर्मचारी उंदरांची बिळं शोधतात. त्यांवर टॉर्चचा झोत मारला की उंदीर त्यातून बाहेर येतात. तसा तो आला, की त्यावर दाणकन हातातल्या काठीचा फटका द्यायचा. तो मेला, की शेपटाला उचलून पिशवीत टाकायचा आणि पुढे चालू पडायचं, अशी एकंदरीत त्यांच्या कामाची पद्धत होती. साधारण पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत फिरलो.

जेमीला ते काम करून पाहायचं होतं (तो त्याच्या कामाचा भाग असणार होता) त्यामुळे त्याने रस्त्यावर दिसलेल्या एका उंदरावर काठी हाणली आणि आनंदाने तो उंदीर हातात घेतला. पण हा चांगला उंदीर आहे, त्याला नव्हता मारायचा, असं म्हणत त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या आनंदावर विरजण घातलं (हे नाइट रॅट किलर्स संसर्गजन्य जीववाहक उंदरांना मारण्याचं काम करतात. उंदरांच्या इतरही एकदोन जाती आपल्याकडे आढळतात.)

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये गेलो. तिथं या उंदरांचं विच्छेदन करण्यात आलं. कोणकोणते संसर्गजन्य विषाणू त्यांच्यावर सापडले त्याची नोंद घेण्यात आली. नंतर सगळे मृत उंदीर डम्पिंग ग्राउंडकडे पाठवण्यात आले. त्या दिवशी आम्ही हाफकिनच्या प्रमुखांचीही मुलाखत घेतली. पालिकेतल्या मुख्य कीटकनाशक अधिकार्याशी बोललो. या सगळ्या वेळी अर्थातच एड्रियन सतत छायाचित्रं काढत होता. जेमीला आकडेवारीत नव्हे तर उंदीर मारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत अधिक रस होता. परंतु तरीही उंदीर मारल्यानंतर त्याचा शेवट कुठे होतो, ते चक्र पूर्ण पाहण्याचा त्याचा हट्ट नक्कीच होता.

मी नक्की काय काय केलं होतं? मी हे दोघे मुंबईत येण्यापूर्वीच मध्यरात्री फिरण्याची व छायाचित्रं काढण्याची परवानगी घेतली होती. तेवढा वेळ मला मिळाला होता. त्या त्या वेळेनुसार, जेमी आणि एड्रियन दोघे कुलाब्यात ज्या हॉटेलमध्ये राहत होते, तिथून किती वाजता बाहेर पडा, टॅक्सीवाल्याला काय सांगा, कुठे पोचा, हे त्या दोघांना समजावलं. (बऱ्याचदा या लोकांचं बोलणं आपल्याला कळणं कठीण जातं. त्यामुळे अनेकदा टॅक्सीवाल्याशी बोलून ते योग्य ठिकाणी योग्य वेळी पोचतील, याची काळजी घ्यावी लागे. घ्यावी लागे. त्यातल्या त्यात ब्रिटिशांचे उच्चार थोडे तरी कळतात. अमेरिकनांचे कळायला फारच कष्ट होतात.) मग प्रत्यक्ष उंदीर मारणाऱ्या लोकांना त्यांना जे प्रश्न विचारायचे होते ते मराठीतून अनुवादित करून विचारले. आलेल्या मराठी उत्तरांचा इंग्रजी अनुवाद करून सांगितले. एड्रियन तेव्हा भारतात राहत होता. नंतरही तीनचार वर्षं तो दिल्लीत होता. बराच भारत त्याने पाहिलेला होता. परंतु जेमी पहिल्यांदाच भारतात व मुंबईत आला होता. त्याच्यासाठी आम्ही पाहिलेली ही रात्रीची मुंबई हा मोठाच सांस्कृतिक धक्का होता. एड्रियनसोबत मी नंतरही काम केलं. दिल्लीला गेले होते तेव्हा भेटलेही. हा लेख लिहिताना वाटलं, जेमी सध्या काय करतोय ते पाहावं. त्याला गुगललं, तर कळलं तो फारच मोठा पत्रकार झालाय. चीनमध्ये राहून फ्रीलान्सिंग करतोय. अनेक नियतकालिकं व वृत्तपत्रांसाठी. एड्रियन दोन वर्षांपूर्वी पुन्हा ब्रिटनमध्ये गेलाय.

हे असं फिक्सरचं काम मी सुमारे पाच वर्षं केलं. (फिक्सर हा शब्द आपल्याकडे अत्यंत नकारात्मक अर्थाने वापरला जातो. उदा. क्रिकेटमधले फिक्सर. परंतु युरोप वा अमेरिकेत हाच शब्द असे मदतीचे काम करणाऱ्यांसाठी वापरला जातो.) तीसहून अधिक परदेशी पत्रकारांना अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या/लेख लिहिण्यासाठी किंवा रेडिओ वा टीव्ही कार्यक्रमांसाठी मी या काळात मदत केली. त्यात काही पुस्तकांचाही समावेश आहे.

या पत्रकार/लेखकांसोबत काम करताना अनेक अनुभव आले जे अजूनही ठसठशीतपणे आठवतात. डेली ग्लोब अँड मेल या कॅनेडियन वृत्तपत्रासाठी लंडनमध्ये राहून काम करणाऱ्या डग्लस ऊर्फ डग साँडर्स या वार्ताहरासोबत मी कोकण आणि यवतमाळ येथे चारपाच दिवस फिरले होते. तो स्थलांतर या विषयावर पुस्तक लिहीत होता (Arrival city हे ते पुस्तक) आणि विदर्भातील आत्महत्या या विषयावर त्याच्या वृत्तपत्रासाठी लिहिणार होता. जुलै महिना होता. पाऊस कोसळत होता. कोकणात आम्ही लांज्याला गेलो, जिथली अनेक मुलं मुंबईत छोट्याछोट्या कामांसाठी येत असतात. या मुलांचं मूळ गाव, जिथून ती स्थलांतर करतात, ते त्याला पाहायचं होतं. तिथली गरिबी एवढी होती की, आम्ही ज्याच्या घरात गेलो, तिथे एक खोली, पडवी, छोटंसं अंगण होतं. त्या खोलीतच एका बाजूला चूल होती म्हणून त्याला स्वयंपाकघर म्हणावं तर जेमतेम दोनतीन भांडी, डबे होते तिथे. घरच्या बाईने आम्हांला दोघांना रात्रीची भाकरी आणि दही दिलं. त्यापेक्षा जास्त द्यायला तिच्याकडे काही नव्हतंच. कोंबडं कापायला मात्र ती तयार होती. परंतु आम्ही अर्थात त्याला नकार दिला. अशी परिस्थिती असूनही घरातल्या दोन्ही मुली शाळेत जात होत्या. आईबापांच्या चेहऱ्यावर हसू होतं, मुंबईत चहाच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाच्या जोरावर. आम्ही थोडा वेळ गावात फिरलो. खळाळणाऱ्या नदीत मासे पकडायचा आनंद घेतला आणि संध्याकाळच्या ट्रेनने मुंबईत परतलो. गरिबी पाहिली पण तिथे आशा होती, जगण्याचा उत्साह होता, परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द होती. भोवतालच्या हिरवाईने डोळे सुखावले होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वर्धा आणि यवतमाळला. जवळजवळ दहा कुटुंबांना आम्ही भेटलो, ज्यांच्या घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली होती. दोनतीन खोल्यांची घरं, काही सिमेंटची, बरीचशी कुडाची वा मातीच्या भिंतींची. आजूबाजूला रखरखाट. प्रचंड ऊन, पावसाचा मागमूस नाही. शेतांमध्ये काळी कोरडी माती, त्यात वाळलेल्या काटक्या निवडून उचलून टाकणाऱ्या मजूर स्त्रिया. घरच्या माणसांशी बोलल्यावर जे लक्षात आलं ते इतकं कळायला सोपं पण वळायला कठीण होतं, की आम्ही नैराश्याच्या गर्तेत पार बुडून गेलो दोघे. दारू, कर्ज, मुलीचं लग्न, वारशानुसार मिळणारा प्रत्येक पिढीनुसार कमी होणारा शेताचा आकार, आधुनिकतेचा पूर्ण अभाव, कीटकनाशकांचा अतिवापर, उदरनिर्वाहासाठी शेती वगळता कोणतीच संधी नाही आणि स्थलांतराचे कमी प्रमाण, अशी साधारण कारणं आमच्या लक्षात आली. म्हटली तर ही सर्व कारणं दूर करण्याजोगी पण तरीही टिकून असलेली. त्यामुळे ही निराशा आलेली होती.

तिसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला सुभाष शर्मा या प्रगतिशील शेतकऱ्याच्या शेतावर गेलो आणि वेगळ्याच जगात पाऊल ठेवल्यासारखं वाटलं. चाळीस एकर हिरवंगार शेत. अनेक मजूर काम करत होते. सगळीकडे आनंदीआनंद होता. काल पाहिलेले शेतकरी आणि हे शेतकरी यांच्यात फरक होता आधुनिकतेची कास धरण्याचा. तरीही आम्ही खूप निराश होतो. एका क्षणी मला आत्यंतिक असहाय वाटून चक्क रडू फुटलं. डग्लसही त्याच मनःस्थितीत होता. त्यामुळे एक दिवस आधीच आम्ही आमचा दौरा आटपून मुंबईला आलो. याही दौऱ्याच्या आधी मी तिकिटं काढणं, हॉटेल बुकिंग, प्रगतिशील शेतकऱ्यांशी संपर्क, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी बोलून विषय समजून घेणं, आदी तयारी केली होती. या लेखकाचे प्रश्न ठरावीक होते. पुस्तकासाठी ‘घरात माणसं किती, एकूण उत्पन्न किती, घर कसं चालवता, पुढे काय करायचंय, राजकीय पक्षांची मदत आहे का, स्थलांतर किती काळापासून सुरू आहे,’ असे. परंतु तो शेतकऱ्यांबद्दल खूप वाचून आला होता. त्यामुळे विदर्भात तो पैशाचं गणित मांडे. कशावर किती खर्च होतोय, सरकारने दिलेली मदत किती पुरणार, ती कशी खर्च होणार, बँकेला किती जाणार, असे प्रश्न तो विचारे. एक फरक मला वाटला तो म्हणजे आपल्याकडचे पत्रकार एखाद्या संघटनेसोबत असे दौरे करतात बऱ्याचदा, किंवा स्वतंत्रपणे गेले तरी दोन वा तीन लोकांशी बोलून बातमी लिहितात. हा मात्र त्या प्रश्नांशी संबंधित सर्व घटकांशी बोलला आणि नंतरच त्याने लेख लिहिला. खेरीज आम्ही जवळजवळ दहा कुटुंबांशी बोललो होतो. डग्लसने आवर्जून मला पुस्तकाची प्रत पाठवली, तेव्हा अर्थातच माझं नाव त्यात पाहून बरं वाटलं होतं.

खूप लक्षात राहाण्याजोगं काम होतं 26/11च्या हल्ल्यानंतर, गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राच्या रणदीप रमेश या भारतातील वार्ताहरासोबत केलेलं. (रणदीप भारतीय वंशाचा ब्रिटिश होता.) 26/27च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास दिल्लीतली माझी फिक्सर मैत्रीण काकोली हिने मला फोन केला आणि विचारलं, ‘उद्या काम करशील का?’ नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी, तेव्हा चौथीत असलेल्या मुलीला समजावून शाळेत पाठवलं, दिवसभराची तिची सोय लावली आणि नऊच्या सुमाराला मी रणदीपला विमानतळावर पिकअप केलं. एकही टॅक्सीवाला कुलाब्याकडे यायला तयार नव्हता. अखेर एकाने सीएसटीजवळ सोडलं आणि आम्ही दोघे चालत ताजपर्यंत पोचलो. तिथून कधी ओबेरॉय, कधी छबड हाऊस असं दिवसभर फिरलो, लोकांशी बोलत राहिलो. ताजच्या बाहेर उभे होतो, सर्व वार्ताहरांसोबत दुपारी. तर मुलीचा फोन आला घाबरलेल्या आवाजात. ‘आई, तू कुठे आहेस?’ म्हटलं, ‘काय ग?’ तर विचारते, ‘ताजच्या बाहेर ते टेररिस्ट हॉटेलच्या आतून बाँब फेकतायत. टीव्हीवर दाखवतायत. तू तिकडे नाहीयेस ना?’ यावर खरं बोलणं शक्यच नव्हतं.

दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो जेजे रुग्णालयात. एका डॉक्टर चुलतभावाची ओळख काढून आत प्रवेश मिळवला. जखमींशी बातचीत केली. डॉक्टरांशी बोललो. जेजेतला एक अनुभव अगदी हृदय पिळवटून टाकणारा होता. आम्ही दोघे जेजेच्या पहिल्या मजल्यावर होतो. जिन्याजवळ उभं राहून आता काय करावं, याविषयी बोलत होतो. त्याच वेळी खाली काहीतरी गडबड ऐकू आली म्हणून डोकावून पाहिलं तर दोन मृतदेह आणले जात होते. मृतदेह अगदी शाळकरी वयातल्या मुलींचे. चौकडीच्या शाळेच्या गणवेशातले वाटत होते. ते पाहून आमचा दोघांचा इतका वेळ सगळं मृत्यूचं तांडव पाहूनही तग धरलेला धीर खचला आणि आम्ही त्या पायऱ्यांवर बसकण मारली. खूप वेळ तसेच बसून होतो. माझी मुलगी तेव्हा सातआठ वर्षांची होती आणि रणदीपची बायको गर्भार होती. तो क्षण फार खचून टाकणारा होता. (नंतर कळलं, की त्या दोघी ट्रायडंट हॉटेलमध्ये हाउसकीपिंग विभागात काम करत होत्या. म्हणून तो गणवेष.)
या कामाच्या आधी तयारीला वेळच नव्हता. सगळंच अचानक घडलेलं होतं. फक्त मला मुंबईची बर्यापैकी माहिती असल्याने कुठून कुठे कसं जायचं हे मला पक्कं ठाऊक होतं. मग कुलाब्यात राहणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलून कोणी साक्षीदार भेटतात का हे विचारलं. अनेक फोटोग्राफर आतापर्यंत ओळखीचे झाल्याने त्यांच्याकडूनही खूप माहिती मिळवता आली. तसंच जेव्हा जी माहिती ज्याला मिळत होती, ती सर्वांना देण्याकडेच बहुतेक पत्रकारांचा कल होता. एवढ्या माणसांच्या बाबतीत एवढं काही घडत होतं, की कोणती ना कोणती एक्स्क्लुजिव्ह बातमी प्रत्येकाला मिळणारच होती. रणदीपनेही पोलिसांशी वा अधिकाऱ्यांशी बोलण्याची वाट पाहण्याऐवजी, समोर घडतंय ते पाहण्याची, आवाज रेकॉर्ड करण्याची, फोटो काढण्याची पद्धत अवलंबिली होती. पोलिसांकडचे आकडे वृत्तसंस्थांकडून येतातच. तो गार्डियन वृत्तपत्रासोबत त्यांच्या वेबसाइटसाठीही ध्वनी व फोटो पाठवत होता. त्याचा सर्व भर आत्ता काय होतंय त्याच्यावर होता. लेखक चेतन भगतशी त्याची ओळख होती. त्याला लिहायला थोडा निवांतपणा हवा होता, म्हणून रणदीपने चेतनला फोन लावला. मग पुढचे दोन तास आम्ही चेतनच्या चर्चगेटच्या घरी होतो. रणदीपने त्याची स्टोरी फाइल केली आणि आम्ही पुढच्या कामाला लागलो.

यानंतर तीन दिवसांनी बीबीसीकडून फोन आला. निक गोइंग हा अत्यंत वरिष्ठ न्यूज प्रेझेंटर (रोज रात्री भारतीय वेळेनुसार नऊ वाजता वर्षानुवर्षं निक बातम्या देताना आपण सर्वांनीच पाहिला आहे.) येणार होता आणि त्याला ताजमधल्या एका कर्मचाऱ्याची मुलाखत हवी होती. माझ्या हातात तयारीसाठी एकच दिवस होता. ताजच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या प्रमुखांशी बोलले. त्या म्हणाल्या, की जमणं कठीण आहे, पण प्रयत्न करते लोकांशी बोलून, कोणी मुलाखत द्यायला तयार आहे का ते. तो दिवस गेला त्यांच्या फोनची वाट पाहण्यात. दुसरीकडे बीबीसीच्या प्रोड्यूसरचे फोन येतच होते, काय झालं विचारायला. अखेर दुसऱ्या दिवशी ताजमधील एक कर्मचारी बोलायला तयार होईल असं कळलं.
संध्याकाळी साडेचारपासूनच गेटवे ऑफ इंडियासमोर आम्ही कॅमेरा लावून तयार बसलो. पाच वाजले तरी या इसमाचा पत्ता नव्हता. शेवटी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या प्रमुखांचा फोन आला. त्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी टीव्हीला मुलाखत देऊ नको, असं सांगितलं होतं. या हल्ल्याची दहशतच एवढी होती, की सगळे जण घाबरलेले होते. त्यांना वाटत होतं, की दहशतवादी त्याला टीव्हीवर पाहतील आणि त्रास होईल. आम्ही कोणावरही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे वाट पाहणं, एवढंच हातात होतं. येथे माझ्या ओळखी, पत्रकारितेतील कौशल्य कशाचाच संबंध नव्हता. आता फक्त नशिबावर हवाला होता. निक आणि त्याची प्रोड्यूसर यांना परिस्थिती कळत होती पण त्यांनाही कार्यक्रम करायचा होता. ही मुलाखत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रेकॉर्ड करायची होती. परंतु वेळ पुढे सरकत गेली तशी ती लाइव्ह करण्याचा निर्णय झाला. माझ्या सुदैवाने ताजमधला आणखी एक कर्मचारी अमित पेशवे तयार झाला आणि साडेसातच्या सुमारास आला. निक अमितशी बोलत होता. जगभरातले प्रेक्षक ती मुलाखत लाइव्ह बघत होते आणि मी बाजूला मरीन ड्राइव्हच्या कट्ट्यावर बसून त्या रात्री आकाशात असलेला स्मायली पाहत होते.

निक अतिशय खूश झाला. कारण अमितने त्या रात्री काय घडलं, कसा पाहुण्यांचा जीव वाचवला, आता कसं वाटतंय याची दिलखुलास उत्तरं दिली. निकला त्याच्याकडून संपूर्णपणे ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी हवी होती, जगभरातले अनेक प्रेक्षक जिच्याशी रीलेट करू शकतील अशी. आणि ती त्याला मिळाली. (निक भारतात किती लोकप्रिय आहे, हे त्यावेळी कळलं. मरीन ड्राइव्हवर वा गेटवेवर आम्ही कॅमेरा लावून बसलेलो असताना अनेकांनी येऊन त्याची स्वाक्षरी घेतली होती.)

यानंतर महिन्याभराने बीबीसी रेडिओची टीम आली. त्यांनाही 26/11च्या हल्ल्यात मरण पावलेल्यांपैकी काही जणांच्या नातलगांशी बोलायचं होतं. तेव्हाही कुठून कुठून माणसं शोधली, त्यांना बोलतं केलं. तेव्हाही एक जण भेटायला गेल्यानंतर बोलणार नाही, असं म्हणाली. त्या निमित्ताने खूप मुंबई पालथी घातली गेली.

फिक्सिंगचं काम कधीही नशिबावर भरवसा ठेवून करता येत नाही. पण नशीब चांगलं असावंच लागतं. तरच चांगली भरभरून बोलणारी माणसं भेटतात, मोकळेपणाने कामाची वा वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती देतात, दिलेल्या वेळेवर हजर राहतात. खोटं बोलत नाहीत, गाडीचे चालक पचापचा थुंकत नाहीत आणि हॉर्नवर आवश्यक तेव्हाच हात ठेवतात, वाहतुकीचा खोळंबा वाट्याला येत नाही वगैरे. एखाद्या कामाच्या आधी पुरेसा वेळ असेल तर नक्कीच फायदा होतो. योग्य माणसं शोधता येतात. जमल्यास एकदा त्यांच्याशी बोलणं होतं आधीच, जास्त माणसं मिळू शकतात. जेणेकरून ऐन कामाच्या दिवशी त्यातली काही तरी उपलब्ध होतात.

कधीकधी असं होतं, की मला फक्त इमेलवरून सांगण्यात येतं की अमुक बातमी करायची आहे. त्याच्यासाठी अशीअशी माणसं हवी आहेत. उदाहरणार्थ, मला मिळालेलं दुसरंच काम होतं, मुंबईत 2006मध्ये लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीची आई शोधणं. ब्रिटनमधील चॅनल फोर या प्रसिद्ध कंपनीला जगभरातील दहशतवाद या विषयावर माहितीपट करायचा होता. त्यासाठी त्यांना शक्यतो इंग्रजी बोलणारी आई हवी होती. या स्फोटामध्ये एकूण 183 व्यक्ती मरण पावल्या होत्या. माझ्या नशिबाने मुंबईतील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सर्व 183 व्यक्तींसबंधीच्या स्वतंत्र बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मी मृत व्यक्तीच्या वयावरून, आडनावावरून त्याची आई काय वयाची असेल व तिला इंग्रजी येण्याची शक्यता किती असेल, याचा अंदाज लावत होते. माझ्या अंदाजानुसार किमान 25 ते 30 घरी फोन केले. (मृत व्यक्ती चाळिशीच्या आतली असेल तर आई सत्तरीच्या आतली, गुजराती कुटुंबातील असेल तर इंग्रजी येण्याची शक्यता कमी, असा माझा एक आडाखा होता.) वसईला राहणाऱ्या एका अशा बाईला इंग्रजी येतं, असं मला तिच्या मुलाविषयीची बातमी करणाऱ्या वार्ताहरानं सांगितलं होतं. खातरजमा करण्यासाठी मी वसईला जाऊन तिचं घर शोधलं. तिला भेटले. परंतु सत्तरी ओलांडलेल्या त्या बिचारीला येस-नो पुरतंच इंग्रजी येत होतं. दुसऱ्या दिवशी माहितीपटाचा दिग्दर्शक जेम्स केंट येणार होता. मला काही सुचेना.

अखेर संध्याकाळी बोरिवलीच्या एका पै आडनावाच्या मुलाची माहिती मिळाली. तो 25 वर्षांचा होता. माझ्या आडाख्यानुसार त्याच्या आईला इंग्रजी येण्याची शक्यता 90 टक्के होती. मी त्यांचा नंबर मिळवला. फोनवरून बोलताना हीच ती, असं वाटलं. ती उत्तम इंग्रजी बोलणारी होती. दुसर्या दिवशी रविवारी मी आणि जेम्स तिला भेटून आलो आणि दोनतीन दिवसांनी प्रत्यक्ष छायाचित्रण झालं. (नील हार्वे या सिनेटोग्राफरशी तेव्हा मैत्री झाली. त्याने नुकताच बीबीसीसाठी डेव्हिड बेकमवर एक माहितीपट केला आहे.) सगळं जुळून आलं, ती तिच्या मुलाविषयी भरभरून बोलली आणि माहितीपट अतिशय प्रभावशाली झाला.

बीबीसीने एक वर्ष भारतविशेष वर्ष जाहीर केलं होतं. त्यामुळे त्या वर्षात बीबीसीचे अनेक पत्रकार मुंबईत आले होते. (हा काळ आर्थिक मंदी येण्यापूर्वीचा होता. त्यामुळे वार्ताहराचा प्रवासखर्च, मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, फिरायचा, माझा, वाहनाचा खर्च असं मिळून गणित लाख दीड लाखाच्या वर जात असे आणि तो सहज मंजूर होत असे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी जानेवारी 2007मध्ये इंग्लंडमधल्या बिग बॉसची विजेती झाली. त्यावेळी काही वंशवादी प्रतिक्रिया उमटल्या आणि तिकडे खूप मोठा वाद झाला. त्याचे इकडे मुंबईत काही पडसाद उमटले आहेत का, हे पाहण्यासाठी बीबीसी रेडिओची वार्ताहर अॅना कनिंगहम चार दिवस इकडे आली होती. ती मॅरियटमध्ये राहिली होती. आम्ही जी गाडी भाड्याने घेतली होती, तिच्या ड्रायव्हरने मला विचारलं, की तिच्या हॉटेलमधल्या खोलीचं भाडं किती आहे. मी म्हटलं, 15/20 हजार आहे. तो म्हणाला, मग पाच दिवसात एक लाख रुपये देण्यापेक्षा त्या पैशांनी एक झोपडीच का विकत घेत नाहीत त्या? अॅना नंतर तिचा नवरा फिलसोबत तीन वर्षं मुंबईत होती. या तीन वर्षांत आम्ही खूप काम केलं एकत्र आणि मजाही केली. आजही आम्ही संपर्कात आहोत.

एकदा नॅटजिओच्या जर्मन आवृत्तीच्या कॉन्स्टन्झ किंडल या वार्ताहराबरोबर मुंबईतली घरगुती ब्युटी पार्लर्स या विषयावर काम केलं. एमी विटाली ही जगप्रसिद्ध पुरस्कारविजेती फोटोग्राफर यावेळी आमच्यासोबत होती. आम्ही तिघी धारावी आणि जुहू परिसरातील एका वस्तीतील अनेक घरगुती ब्युटी पार्लर्सध्ये फिरलो. दहा बाय दहाचं घर आणि त्यातच चालणारं ब्युटी पार्लर अशी कितीतरी घरं आम्ही पाहिली. ती चालवणाऱ्या बायांना सलाम केला आम्ही. एमीने तर एकीकडून भुवयापण कोरून घेतल्या. दोर्यानं भुवया कोरणं तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं. या जर्मन रिपोर्टर मुलीचे केस इतक्या मोहक मधाळ छटेचे होते, सगळ्या पार्लरवाल्या तिच्या केसांना हात लावत नि विचारत, ही कोणती शेड आहे? म्हणजे कोणता रंग लावलाय? ती म्हणाली, ‘हे माझे नैसर्गिक केस आहेत’ तेव्हा त्यांचा त्यावर विश्वास बसेना. ही रिपोर्टर पहिल्यांदाच मुंबईत/भारतात आलेली. ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये आली होती. पण त्यावर्षी नेमका इतका उकाडा होता त्या काळात. ती बिचारी काम सोडून कुठेही फिरू शकली नाही. एमी मात्र भारतात काही काळ राहिलेली होती आणि फोटोग्राफरना कुठल्याही हवामानात, कशाही परिस्थितीत राहण्याची सवय असते, राहावंच लागतं.

दोन कामं मी बराच काळ चालणारी केली. एक होतं प्रसिद्ध अमेरिकी पत्रकार लेखिका कॅथरिन बू हिच्यासोबत आणि दुसरं होतं आयरिना वोडार या रशियन अमेरिकन पत्रकारासोबत.

कॅथरीनला मी दीड वर्षं एका पुस्तकाच्या कामात मदत केली - आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत गाजलेलं बिहाइंड द ब्युटीफुल फॉरएवर्स. या काळात आठवड्यातले चारतरी दिवस आमचा दोघींचा मुक्काम मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या अण्णावाडी या लहानशा वस्तीत असे. यात मात्र माझी भूमिका केवळ दुभाष्याची होती. तिच्यासोबत काढलेला हा काळ मला आयुष्याबद्दल पुष्कळ काही शिकवून गेला. वयाच्या सोळाव्या वर्षापासून संधिवाताने ग्रासलेल्या कॅथरीनची स्वतःचीच कहाणी अतिशय स्फूर्तिदायक वाटते मला. तिचं लिहिणं अतिशय संवेदनशील, अत्यंत सोप्या भाषेत. थेट काळजाचा ठाव घेणारं. हे पुस्तक तर आवर्जून वाचावं असं.

दुसरी आयरिना. सहा फूट उंच. मूळची रशियन. सरोगेट मदरकडून मूल हवं म्हणून नवऱ्याबरोबर मुंबईत आलेली. न्यूयॉर्कमध्ये ती एका वृत्तवाहिनीसाठी काम करते. पहिल्यांदा उपचारासाठी इकडे आली तेव्हा तिच्या मनात आलं, या विषयावर माहितीपट केला पाहिजे. त्यामुळे दुसऱ्यांदा आली तेव्हा दुभाषी म्हणून मी जोडले गेले. त्या काळात सरोगेट मदर या विषयाचे अनेक पैलू मला जवळून पाहता आले. मूल हवं असलेल्या जोडप्याची आस आणि ते अयशस्वी झाल्यावर आलेली प्रचंड निराशा एकीकडे होती तर दुसरीकडे सरोगेट मदरची आशा आणि निराशा होती. या दोन्ही भावना म्हटलं तर एकच पण प्रत्यक्षात त्याची जाणीव, त्यांचं व्यक्त होणं खूप वेगळं. आयरिना आणि तिचा इटालियन अमेरिकन नवरा एडी (हा साडेसहा फूट उंच) यांच्या या अत्यंत कसोटीच्या काळात मी तिच्यासोबत असल्याने असेल कदाचित, आमचं वेगळंच नातं जुळलं. आजही आम्ही एकमेकींशी एसएमएसवर खूप बोलतो. तिचा माहितीपट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असं नुकतंच तिने कळवलंय.

तिच्या निमित्ताने आयव्हीएफ ट्रीटमेंट करणारी उच्चभ्रू क्लिनिक्स पाहायला मिळाली. क्लिनिक्समधला झगमगाट आणि तिथे येणाऱ्या निम्नस्तरातल्या सरोगेट मदर्स किंवा ओव्हम डोनर्स यांची संगत लावणं मला अशक्य होऊन बसलं होतं. ही ट्रीटमेंट नुसती खर्चिकच नव्हे तर प्रचंड शारीरिक त्रासाची आहे. आई होण्याची इच्छा असलेल्या बाईला इतके हाल सोसावे लागतात, की खरंच आई होणं इतकं महत्त्वाचं आहे का असा प्रश्न पडावा. तिची मासिक पाळी, रक्तस्राव, सरोगेटची पाळी, या सगळ्याचं गणित जुळावं लागतं आणि ते जुळवून आणण्यासाठी प्रचंड औषधांचा मारा सहन करावा लागतो. अर्थात, मला हे काहीच सोसावं न लागता आईपण लाभलं होतं म्हणूनही असं वाटत असेल. परंतु, हल्ली माझ्या ओळखीतल्या अनेक जणींनी ट्रीटमेंटला कंटाळून मूल दत्तक घेण्याचं ठरवलं आहे असं कानावर येतंय.

आयरिना किंवा कॅथरीन यांना कामासाठी इथे येण्यापूर्वी तयारी, वाचन, संशोधन करणं शक्य होतं. बऱ्याचदा इतरही लेखक अथवा पत्रकार इंटरनेटवरून पुरेशी माहिती घेऊन आलेले असतात. त्यांना नक्की काय हवंय हे त्यांना बरोबर ठाऊक असतं आणि ते मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. कोणताही प्रश्न विचारायला ते कचरत नाहीत. तेही समोरच्या व्यक्तीला उत्तर न देण्याचं स्वातंत्र्य देऊन. त्यांचे प्रश्न कधी अत्यंत खासगी प्रश्न असतात. पण ते आपल्या बातमी वा लेखाच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत, याची त्यांना खात्री असते. भारताबद्दल युरोप वा अमेरिकेतल्या सामान्य वाचकाला अजूनही फार वरवरची माहिती असते. त्यामुळे जितके तपशील त्यात देता येतील, ते देण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणार्थ, महिन्याचा पगार अमुक रुपये, तांदूळ अमुक रुपये किलो, फळं/ भाज्या/दूध/अंडी/ब्रेड अमुक भावाने हे त्यांच्या वाचकाला डॉलरमध्ये रुपांतरित करून सांगितलं की त्याला तुलना करून भारतीय माणसाचं जगणं कळणं सोपं जातं, हे त्यांचं लॉजिक.
आणखी एक खूप एंजॉय केलेलं काम होतं बेला बॅटहर्स्ट या लेखिकेसोबत केलेलं. (दि बायसिकल स्टोरी हे तिचं पुस्तक पुढच्या वर्षी प्रसिद्ध झालं.) वर उल्लेख केलेला छायाचित्रणकार नील हार्वे याच्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडची बेला ही बहीण. ती सायकलींवर पुस्तक लिहिण्यासाठी जग पालथं घालत होती. संशोधन करता करता तिला कळलं, की भारतातही सायकलची मोठी परंपरा आहे. इकडे यायचं ठरवलंन तेव्हा नीलने माझं नाव सुचवलं तिला. मग मीही या विषयावर खूप वाचलं. कुठेकुठे जाता येईल, याचा विचार केला. मुंबई-पुणे सायकल शर्यत, एखादा सायकल बनवणारा कारखाना, कोलकाता व दिल्लीतील सायकलरिक्षा असा मार्ग आखला. पुण्यात ही सायकल शर्यत जिंकणार्या एका वयोवृद्ध सायकलपटूला भेटलो. जाताना एक्सप्रेस वे टाळून मुद्दाम जुन्या शर्यतीच्या मार्गाने गेलो. अगदी टूर दि फ्रान्स नसली, तरी हीदेखील शर्यत त्या तोलामोलाची आहे, हे तिला कळावं एवढाच उद्देश होता. मग आम्ही दिल्लीत गेलो. चांदणी चौकात सायकल रिक्षा चालवणाऱ्यांशी खूप गप्पा मारल्या. बेलाने एक रिक्षा चालवूनही पाहिली.

तिथून राजधानी एक्सप्रेसने कोलकात्याला गेलो. तो अनुभव मजेशीर होता. बेला आणि तिची बहीण ल्यूसी या दोघा गौरवर्णीय ललनांना पाहून माझ्यावर सहप्रवाशांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यातल्या गुप्ता आडनावाच्या वयस्क जोडप्याने मला दत्तकच घेऊन टाकलं. कोलकात्यात दीड दिवस बेला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत होती. त्यामुळे मला एकटीने शहर फिरायला मिळालं. एकदा गुप्ता आंटीकडे जेवायला गेले. कोलकाता पायी खूप फिरले. स्वस्तातल्या हॉटेलात राहिले, मेट्रोने फिरले. एस्प्लनेडजवळच्या मद्रास टिफिनमध्ये स्वस्तात आणि चविष्ट जेवले. रस्त्यावर मिळणारी बंगाली भेळ ऊर्फ झालमुरी खाल्ली. दोन रुपयांत इवल्याशा ग्लासात मिळणारा चहा प्याले. सिंगारा/समोसा खाल्ला. पार्क स्ट्रीटवरच्या अत्यंत प्रसिद्ध अशा श्री लेदर्समधून उत्तम सँडल्स विकत घेतले. (या दुमजली दुकानासमोर दुर्गापूजेच्या वेळी म्हणे मैलभर रांग लावून लोक उभे असतात पादत्राणं खरेदी करायला. मुंबईतल्या बंगाली मित्रांकडून माहिती काढून गेले होते, म्हणून हे ठाऊक.) बाणी घोष नावाच्या जुन्या सायकलपटूला भेटले बेलासोबत. तिने खूप आठवणी सांगितल्या. कोलकात्यात तेव्हा ती सायकल शर्यती वगैरे आयोजनात सहभागी असायची. हे काम म्हणजे काम कमी आणि पर्यटन अधिक होतं, पण माझी तक्रार नव्हती. परंतु, अशी कामं अगदी तुरळक. बाकी सगळ्यांचं कामावर लक्ष असायचं. साहजिक होतं म्हणा. भारतात यायचा प्रवासखर्च, हॉटेल, जेवणखाण आणि इकडचा प्रवास यावर त्यांचे हजारो, कधीकधी लाखभराहून अधिक रुपये खर्च व्हायचे. (तरी तेव्हा डॉलर 45 रुपयांच्या आसपास होता. आता विश्वास बसणार नाही आपला.)

चारपाच वेळा तरी मी गेथिन चेंबरलेन या ब्रिटिश पत्रकारांसोबत काम केलं. गेथिन मूळचा वेल्श. समोरासमोरही त्याचे उच्चार कळायची मारामार, फोनवर तर अशक्य असे. गेथिन गार्डियन/ऑब्जर्वरचा प्रतिनिधी म्हणून सुरुवातीला दिल्लीत व नंतर काही वर्षं गोव्यात राहत होता. गेथिनच्या सगळ्या स्टोरीज कठीण विषयांवरच्या. खळबळजनक वाटाव्या अशा. माणसं सापडता सापडता पंचाईत. त्याचा फोन आला की मला धसका बसायचा - आता याला काय हवंय, असं वाटायचं. स्लमडॉग प्रसिद्ध झाल्यानंतर सगळ्यात आधी मला त्याचा फोन आला. मला अशा खऱ्याखुऱ्या स्लमडॉगची स्टोरी करायचीय. किती शोधाशोध केली तेव्हा. त्याच्यासोबत काम करताना माझं कसब, सहनशक्ती पणाला लागे, एवढं मात्र खरं.

एक काम होतं फक्त फोटोंचं. डेव्हिड रॉचकिंड हा अमेरिकन फोटोग्राफर जागतिक आरोग्य संघटनेसाठी क्षयरोग या विषयावर काम करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने महिनाभर आधीच दौरा आखला होता. त्यामुळे मला या विषयावरही वाचायला वेळ मिळाला. त्याच्यासाठी चेंबूरमध्ये एक महिन्यासाठी एक घर पीजी म्हणून पाहून ठेवलं. एक महिना हॉटेलात राहणं परवडण्यासारखं नव्हतं. आम्ही चेंबूरमधला वाशी नाका हा परिसर कामासाठी निवडला. डेव्हिडला फक्त फोटो काढायचे होते, त्यामुळे मुलाखती वगैरे भानगड नव्हती. परंतु फोटो काढण्यासाठी म्हणून डेव्हिड/मी आणि समोरची व्यक्ती यांमध्ये एक रॅपो तयार होण्याची आवश्यकता होतीच. चेंबूर आणि परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या अशा आरोग्य केंद्रांमध्ये आम्ही गेलो, जिथे क्षयाचे रोगी मोठय़ा संख्येने येत. त्यांना DOTS ही उपचार पद्धती दिली जाते. या आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या सेवकांचं खूप कौतुक वाटतं; कारण या आजारावरच्या औषधांचे साइड इफेक्ट्स प्रचंड असतात आणि त्यामुळे रुग्ण ती घेणं अर्धवट सोडतात. त्यामुळे रोग उलटतो. त्यात गरिबीमुळे योग्य आहार घेणंही अनेकांना जमत नाही व औषधांचा योग्य तो परिणाम जाणवत नाही. या रुग्णांना हे सेवक केंद्रातच गोळ्या घ्यायला लावतात. काही स्वयंसेवी संस्थांतर्फे या रुग्णांसाठी उकडलेली अंडी वा केळी असा पौष्टिक आहारही या केंद्रांवर दिला जातो. प्रत्येक रुग्णाची बारीकसारीक नोंद हे सेवक ठेवतात. काही दिवस ते केंद्रावर आले नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन चौकशी करतात. औषधं पुन्हा घ्यायला भाग पाडतात.

या महिन्याभरात आम्ही काही ठरावीक रुग्णांच्या घरी वेगवेगळ्या वेळी जात असू. डेव्हिडला त्यांची पूर्ण जीवनशैली पाहायची असे. त्या घरांध्ये गेल्यावर नैराश्याचा झटका येऊ न देता काम करत राहणं, त्यांच्याशी बोलत राहणं हे अत्यंत कठीण काम होतं. गरिबी हा त्यातला एकमेव मुद्दा नव्हता. रुग्ण मुलगी वा बाई असेल तर तिच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष अगदी स्पष्टपणे दिसायचं. शिवाय टीबी झालाय म्हणजे मरणारच आहे ती आज ना उद्या, किती काळजी घ्यायची तिची, असंही चित्र अगदी सर्रास दिसलं. औषध आणलं न आणलं, वेळेवर खायला दिलं ना दिलं. टीबीचा रुग्ण ज्या घरात आहे, त्या घरातल्या सर्व लोकांनीही प्रतिबंधक औषधं घ्यायची असतात. अगदी लहान मुलं वगळून. परंतु, प्रत्यक्षात फार कमी घरांध्ये ते दिसून आलं. एक आठवडा आम्ही शिवडीच्या टीबी हॉस्पिटलसाठी ठेवला होता. मुंबईत इतकी वर्षं राहूनही मी त्या भागात कधी गेले नव्हते. पालिका व इतर ठिकाणांहून या रुग्णालयात फोटो काढण्याची परवानगी मी घेऊन ठेवली होती. प्रत्यक्ष WHOचं काम असल्याने परवानग्या तुलनेने पटापट मिळाल्या. (आत पाऊल टाकल्या टाकल्या पहिली गोष्ट लक्षात आली, की तसं नसतं तर कुठलाच शहाणा माणूस अशी परवानगी देणार नाही.)

या रुग्णालयाचा परिसर खूप मोठा आहे. चारपाच मजली अनेक इमारती आहेत. रुग्णांची संख्या आणि खाटांची संख्या अर्थातच व्यस्त. अॅडमिट असणारे बहुतेक रुग्ण अत्यंत गरीब. आम्ही सकाळी आठला तिथे पोचायचो. आठच्या पाळीसाठी आलेल्या नर्सेस, डॉक्टर्स आणि आया वगैरे नाश्ता करत असायच्या. रुग्णांनाही त्याच वेळी चहा, ब्रेड वगैरे देण्यात येई. नर्स गेल्या गेल्या आम्हांला तोंडावर बांधायला मास्क देत आणि विचारत, नाश्ता केलाय ना? इतक्या संख्येने टीबीचे रुग्ण आसपास असताना संसर्गाची भीती खूप जास्त आणि उपाशीपोटी ती अधिक. म्हणून पोटभर नाश्ता आवश्यक.

या चारपाच दिवसांत जे पाहिलं ते कधीही न विसरण्याजोगं. सकाळचं कोवळं ऊन, आसपास झाडी असूनही प्रसन्न काही वाटायचं नाही. खाटेवर जेते दिसेल न दिसेल एवढा बारीक रुग्ण. त्याच्यासोबत क्वचित कोणी नातलग. शेजारी औषधांची चळत. उरलेलं अन्न. नुकताच वॉर्डबॉयने ठेवलेला ब्रेडचा स्लाइस उचलण्यासाठी टपलेले कावळे. एखादा अगदी शेवटच्या घटका मोजणारा. डॉक्टरांची राउंड. एखाद्या रुग्णाला गोळ्या आपल्या हाताने भरवणाऱ्या नर्स. एखाद्याला लटक्या रागाने समजावणारी आया. क्षकिरण विभागात रुग्णांची लागलेली रांग. जवळपास मोडकळीला आलेली व्यवस्था. त्यातही हसऱ्या चेहऱ्याने काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आया, वॉर्डबॉय वगैरे सगळेच.

या कामानंतर वर्षभर मला साधा खोकला आला तरी मनात धस्स व्हायचं.

पण, गंमत म्हणजे दिवसभर असं काम करून अनेकदा संध्याकाळी चारनंतर आम्ही भटकायचो. बऱ्याचदा ती जेवणाची वेळ असायची. मग चेंबूरमधल्या झामातली चाट, जिलब्या, गुलाबजाम किंवा आणखी कुठला वडापाव, किंवा सरोजमधला डोसा. तो डोशाच्या तर प्रेमात पडला होता. भूक लागली की त्याला पहिल्यांदा डोसाच समोर दिसे. मग इतर सगळं. आमच्या भटकंतीत त्याने खूप ठिकाणी बर्फाच्या गोळ्याची गाडी पाहिली. तो भान हरपून गोळा करताना पाहत राही. तो प्रकार त्याला एवढा आवडला, की आम्ही एका गोळेवाल्याला विचारलं, ‘हे यंत्र कुठे मिळतं?’ क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकमेव दुकान होतं. ‘अमर’ या ब्रँडनेमने ते यंत्र होतं. डेव्हिडने अखेर ते जाऊन आणलं. विमानातून न्यायचं कसं, याचा विचार करून जवळच्या एका सुताराकडून छोटी लाकडी पेटी तयार करून घेतली आणि ते धूड घेऊन तो घरी गेला. त्याची गर्लफ्रेंड आणि इतर मित्रमंडळाला त्याला इम्प्रेस करायचं होतं बर्फाचा गोळा खिलवून!

डेव्हिडला आपल्या देवनागरी लिपीने असाच मोह पाडला. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी इंग्रजीत एक वाक्य लिहिलं. ते मी मराठीत केलं. ते वाक्य घेऊन आम्ही अच्युत पालवच्या ऑफिसला गेलो. तिथे त्याने अनेक फाँटस् पाहिले. त्यातला एक निवडला. व्हीटीला स्टर्लिंगच्या परिसरात असलेल्या चिमणलाल्स या कागदाच्या दुकानातून त्याला हवा तसा कागद घेऊन त्यावर अच्युतने ते वाक्य देवनागरीत लिहून दिलं. त्याच्या बैठकीच्या खोलीत लावायचं होतं ते.
मिशा ग्लेनी हा बीबीसीचा बाल्कन राष्ट्रविषयक तज्ञ. तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी या विषयावर पुस्तक लिहीत होता. मी त्याला अरुण गवळी, राकेश मारिया आणि महेश मांजरेकर (वास्तव चित्रपटाच्या संदर्भात) यांना भेटवलं होतं. दगडी चाळ हादेखील एक वेगळाच अनुभव होता. प्रत्यक्ष गुन्हेगारांशी त्याची भेट हुसेन झैदी या गुन्हेगारीचे वृत्तांकन करणाऱ्या वार्ताहराने घडवून आणली. याच झैदीची डोंगरी ते दुबई आणि माफिया क्वीन्स ऑफ मुंबई ही पुस्तकं खूप गाजली. ती मराठीतही आलीत. मिशाचं हे पुस्तक आहे McMafia.

या बहुतेक लेखकांमध्ये वेगळेपणा होताच, पण साम्यही होतं. उदाहरणार्थ, या सर्वांतर्फे मी विचारलेला अगदी नेहमीचा प्रश्न म्हणजे, आता कसं वाटतंय, किंवा धारावीत राहाणं म्हणजे तुझ्या दृष्टीने काय आहे, त्याचं वर्णन कसं करशील? आत्ता या क्षणी मला नेमकं काय वाटतंय, हे आपल्यापैकी किती जणांना सांगता येईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण हा प्रश्न नेहमी विचारला जातो. किंवा एखाद्या आठ बाय आठच्या झोपडीत दहा माणसं राहतात हे कळल्यावर विचारलेला प्रश्न तुम्ही सगळे झोपता कसे? या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हो!
या मंडळींची तयारी इतर बाजूंनीही असते. सकाळी भरपूर नाश्ता करून निघायचं, की संध्याकाळी पाचपर्यंत चहासुद्धा नाही मिळाला तरी त्यांची तक्रार नसते. आपल्याकडच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत तर न बोलणंच बरं. अशा वेळी पुरुष पत्रकारांसोबत काम करताना माझी काहीशी पंचाईत होई. एक वेळ भूक सहन होई; पण पाचसहा तासांपेक्षा जास्त वेळ स्वच्छतागृहात गेल्याशिवाय काढणं अशक्य वाटे. (मी आणि कॅथरीनने त्यावर एक पंचतारांकित मार्ग शोधला होता. आम्ही अण्णावाडीत सातआठ तास तरी असायचो. तिथली घरं छोटी, घरात न्हाणी असे. स्वच्छतागृह सार्वजनिक. तिथे जाणं कठीण. नशिबाने हा परिसर पंचतारांकित हॉटेल्सनी वेढलेला. मग एक दिवस लीला, एक दिवस ग्रँड, एक दिवस हयात, एक दिवस मराठा अशी आमची सोय करून घ्यायचो. खूप लाज वाटायची, पण त्याला पर्याय नव्हता.)

आपल्याकडचा उन्हाळा, धूळ, अस्वच्छता, दिरंगाई या सर्वांची त्यांना माहिती असते पण ते त्याबद्दल तक्रार करत बसत नाहीत. त्यावर मात करून बातमी/लेख/पुस्तक कसं परिपूर्ण होईल, याची त्यांना काळजी जास्त असते. त्यांच्या देशात ते बऱ्यापैकी सहज, आरामदायी आयुष्य जगत असतात, पण इथे येऊन राहण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी, अनेक प्रकारचे नवीन तणाव झेलण्याची तयारी त्यांनी केलेली असते. उदाहरणार्थ, नेट बंद आहे, स्लो आहे, फोन लागत नाही, वाहतूक पूर्णपणे थांबली आहे या घटना त्यांच्या दृष्टीने पूर्णपणे नव्या असतात; पण त्यावर तक्रार करून चालणार नाही, हेही त्यांना चांगलंच ठाऊक असतं. एक नक्की, की त्यांना काही माहीत नसलं तर ते खोटा आव आणत नाहीत. अनेकदा लेख तयार झाल्यावर नावं योग्य आहेत ना ते तपासण्यासाठी माझ्याकडे पाठवतात. परंतु काही जण दुसर्यावर अवलंबून राहणारेही असतात. फार तयारी न करता आलेले. पण क्वचित. त्यांना हे ठाऊक असतं, की दुभाष्याशिवाय काम होणार नाही. त्यामुळे शब्दशः अनुवाद करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो.

पाच वर्षांच्या काळात टीव्ही, रेडिओ, वर्तामानपत्र आणि पुस्तक अशा चारही माध्यमांसाठी मी काम केलं. प्रत्येकाची गरज वेगळी. त्यामुळे तयारी वेगळी. एक वेगळीच पत्रकारिता बघायला मिळाली आणि वेगळीच माणसंही. त्यातल्या काही जणांशी माझी मैत्री म्हणता येईल, इतकी छान ओळख झाली. तीनचार जणांसोबत मी एकापेक्षा अधिक वेळा काम केलं. अनेकांनी माझं नाव आवर्जून त्यांच्या सहकाऱ्यांना सुचवलं होतं. या कामात, येणाऱ्या उत्पन्नात सातत्य नव्हतं. काम असलं की भरपूर पैसे मिळायचे; पण नसलं की काही नाही. पैशांपेक्षा मला ते अनुभव, त्यांच्यासोबत फिरायला मिळणं, वेगवेगळ्या माणसांना भेटणं अतिशय आवडायचं. धारावीमध्ये मी यांच्याच निमित्ताने गेले आणि प्रेमात पडले त्या वस्तीच्या.

तारापूरच्या अणुऊर्जा केंद्रात बीबीसीच्याच एका कार्यक्रमासाठी जाता आलं ते हम्फ्री हॉक्स्लीबरोबर. हम्फ्री हा एकदम प्रॉपर ब्रिटिश जंटलमन असावा तसा, बीबीसीतला खूप वरिष्ठ पत्रकार. त्याच्यासोबत दोनतीन वेळा काम केलं. तो भारतात अनेकदा येऊन गेलेला. इंडियन स्टँडर्ड टाइम हा त्याचा आवडीचा चेष्टेचा विषय. ‘मी इतका छान लेख लिहिला या विषयावर काही वर्षांपूर्वी, तरी तुम्ही लोक अजून तसेच आहात,’ असं त्यानं काहीसं गंभीरपणे, काहीसं हसत हसत म्हटलं होतं. तो स्कॉटलंडच्या यॉट क्लबचा मेंबर. त्या मेंबरशिपच्या जिवावर आम्ही कुलाब्याच्या यॉट क्लबमध्ये तासभर गप्पा मारत बसू शकलो होतो. अशा लोकांमुळे पंचतारांकित हॉटेल्समध्येही जाण्याची, वावरायची संधी मिळाली. वेळप्रसंग ओळखून, पाचपोच ठेवून कसं वागावं, याची अक्कलही आली.

या माझ्या परदेशी पत्रकार/लेखक मित्रमंडळींच्या निमित्ताने जे भारतीय लोक भेटले, ते तर अगदी लक्षात राहण्याजोगे. बऱ्याचदा झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांनाच भेटण्याची वेळ येई. त्या सगळ्यांशी बोलताना एक गोष्ट 100 टक्के लोकांकडून ऐकायला मिळाली की, ‘आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे, चांगल्या घरात राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही जिवाचं रान करायला तयार आहोत. किंबहुना करत आहोत.’

‘समजा एक लाख रुपये मिळाले तर काय कराल,’ याचं उत्तर सर्वांकडून ‘मुलांच्या शिक्षणासाठी ठेवणार,’ असं यायचं. या पत्रकारांना ते काहीसं आश्चर्यजनक वाटायचं. ‘मला जग पाहायचंय, चांगले कपडे घ्यायचेत, चांगलंचुंगलं खायचंय,’ असं उत्तर कोणीच कसं देत नाही, असं त्यांना वाटायचं. हेही माझ्यासाठी एक शिक्षणच होतं. अनेक वर्षं वर्तानपत्रांध्ये नोकरी करून जे शिकायला, पाहायला, ऐकायला मिळालं नव्हतं ते मी या पाच वर्षांतल्या फिक्सिंगमधून मिळवलं. मोनिका चढ्ढाचं माझ्यावर मोठं ऋण आहे ते म्हणूनच.

Comments

  1. मोनिका चढ्ढानं माझाही दिवस सार्थकी लावला. एका नव्या क्षेत्रात तिचं बोट धरून टाकलेलं पाऊल तुम्हाला किती अनुभवसमृद्ध प्रवासाच्या दिशेनं घेऊन गेलं, हे या लेखातून प्रकर्षानं जाणवलं. या लेखातला शब्द न् शब्द तुम्ही काय सुंदर अनुभवांचं लेणं घेऊन वावरता आहात, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. गुंगून गेलो, इतका या लेखानं माझ्यावर परिणाम केला. तुम्ही नमूद केलेली पत्रकार मंडळी किती सखोल अभ्यास आणि शोधक नजर घेऊन आपल्या पेशाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, याची झलक तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून येते. स्वतःचा सुखासीन कोश सोडून प्रश्नांची तड लावण्यासाठी ते जीवाच्या कराराने धडपडतात. त्यांची ही वृत्ती आत्मपरीक्षण करायला लावते. एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर स्वतःला डोळस नजरेचा मनुष्य म्हणवून घेण्यासाठी या पत्रकारांच्या गुणांचे अनुकरण करण्यास कुठली अडचण नसावी.

    ReplyDelete
  2. प्रिय मृण्मयी

    "comfort zone " च्या बाहेर जाऊन फार कमी लोकं काम करतात . तुझे अनुभव हे बरेचसे अश्या "comfort zone "च्या बाहेरचे आहेत. म्हणून ते दीर्घकाळ लक्षात राहिले आणि तुझ्या व्यक्तिमत्वाला घडवायलाही कुठेतरी कारणीभूत ठरले …नाही का?

    हे अनुभवाचे ठेव अतिशय अनमोल…

    ReplyDelete
  3. विदेशी पत्रकार अन् धडपड्या व्यक्तींसोबत मुंबईचं जग पालथं घालण्याचा अनुभव खरंच आपले विश्व व्यापक करणारा अन् भन्नाट आहे. ग्रेट.

    ReplyDelete
  4. दिवाकर, हो, मी खूपच घडले त्यातून. मंजिरी, धन्यवाद.

    ReplyDelete
  5. मृण्मयी
    तुझे अनुभव खूपच चित्तथरारक आहेत. ह्या पैकी काही वीडीयो किंवा लेख जालावर असल्यास त्यांच्या लिंका टाक. शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. मृण्मयी
    तुझे अनुभव खूपच चित्तथरारक आहेत. ह्या पैकी काही वीडीयो किंवा लेख जालावर असल्यास त्यांच्या लिंका टाक. शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गौरी. लिंका शोधते आणि टाकते.

      Delete

Post a Comment