रवीशच्या लप्रेक

दोन वर्षांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये रवीशकुमारला ऐकलं होतं. इंग्रजी व भारतीय भाषांच्या संदर्भातली चर्चा होती. त्याआधी एनडीटीव्ही इंडियावर त्याची काही बातमीपत्रं पाहिली होती. नंतर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना उत्तर प्रदेशात सुमारे महिनाभर राहून त्याने केलेली बातमीपत्रं अगदी नियमाने पाहिली. तेव्हा उत्तर प्रदेश थोडा कळू लागलाय असं वाटलं. मग त्याचा ब्लाॅग फेसबुकवर फाॅलो करायला लागले. तसं पाहिलं तर तो हिंदी पत्रकारितेतला मोठा सेलिब्रिटी, स्टार. परंतु आवाज चढवून बोलणं नाही, उगीच हिणवणं नाही, समोरच्याला तुच्छ लेखणं नाही. अशा या रवीशसाठी सामान्य माणूस अत्यंत महत्त्वाचा. रस्त्यावरून जाता जाता सोबत चालणाऱ्याच्या गळ्यात हात घालून तो त्याच्याशी बोलतो, एखाद्या दुकानात घुसून दुकानदाराला काही विचारतो, चहाच्या वा पानाच्या टपरीवर उभा राहून तिथल्या घोळक्याशी बोलतो. त्यामुळे तो मनात घुसलाच. मागच्या महिन्यात जयपूरला गेले तर त्याच्या 'इश्क में शहर होना' या पुस्तकाची जाहिरात पाहिली. लप्रेक फेसबुक फिक्शन शृंखला असं मुखपृ़ष्ठावर वाचलं, तेव्हा लप्रेकचा अर्थ कळला नव्हता. पुस्तक व्हॅलेंटाइन डेला हातात येईल, अशा पद्धतीने त्याचं आॅनलाइन बुकिंग सुरू होतं. प्रतीक सिंग या तरुण मित्राने ते तेरा तारखेला माझ्याकडे पाठवलंन. पुस्तकाचा आकार एकदम फ्रेंडली, पाॅकेट बुक स्टाइल. रवीशचं मनोगत वाचताना कळलं, की लप्रेक म्हणजे लघु प्रेमकथा. फेसबुकचं स्टेटस म्हणून टाकलेल्या. त्याचं हे संकलन.
पुस्तकाला पानं आहेत केवळ ८८. प्रत्येक लप्रेक एका पानावर संपणारी. काही पाचसहा ओळींत संपणाऱ्या तर काही वीस. पण पानाच्या वर एकही नाही. प्रत्येक कथेसोबत विक्रम नायक या दिल्लीस्थित चित्रकाराने रेखाटलेली चित्रं.
वाचायला सुरुवात केली, तेव्हा पहिला विचार मनात आला, की आपल्याला हिंदी येतंय, कळतंय हे मोठ्ठं नशीबच म्हणायचं. शाळेत सहासात वर्षं शिकले ते वेगळंच, नंतर सासरची मंडळी मध्य प्रदेशातली असल्याने हिंदीशी अाणखी संबंध आला. एकूणच भाषांबद्दल प्रचंड कुतूहल वाटत असल्याने या भाषेशीही जुळलं. अर्थात अजून प्रेमचंद वगैरे मंडळी नाही वाचलेली मूळ हिंदीत, पण आता वाचू शकेन, असं वाटतंय.
दुसरी नशिबाची गाेष्ट म्हणजे दिल्ली दोनदा, तीनचार दिवसच का होईना, पण पाहिलीये. नाहीतर या पुस्तकातली गंमत इतकी आली असती का, सांगता येत नाही. या पुस्तकातून दिल्ली बाहेर काढताच येत नाही, म्हणजे या लप्रेक दिल्लीला उद्देशून लिहिलेल्याच आहेत की काय, असा संशय यावा इतकी दिल्ली भिनलीय या शब्दांमध्ये. या लप्रेक फक्त दिल्लीत घडतायत, ती पार्श्वभूमीवर अाहे, भाैगोलिक संदर्भ आहेत असं नाही. दिल्लीतला माहोल, तिथले रिक्षावाले, मेट्रो, बस, काॅलेजं, रस्ते, आदि यात अल्लाद गुंफलेलं आहे. तेव्हा वाटलं, दिल्लीवर अशी किती पुस्तकं आहेत जी दिल्लीच्या प्रेमात पडून लिहिलेली. मग मुंबईवर का नाहीत, मुंबईच्या प्रेमात नाही का पडत कोणी, की मुंबई फक्त पैसा कमावून देणारी? विक्रम नायकची रेखाटनंही तशीच, दिल्लीकरानेच काढावी अशी. दिल्लीला आपलं म्हणणाऱ्याने, किंबहुना दिल्लीने ज्याला आपलं केलंय अशाने काढावी अशी.
शेवटशेवटच्या कथा थोड्या राजकीय रंगात रंगतात, राजकीय म्हणू, की सामाजिक? या कथा अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या रामलीला मैदानावरच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरच्या आहेत. तरीही त्या आहेत लप्रेकच!
तर, व्हॅलेंटाइन डे असा मस्त साजरा झाला या पुस्तकाने. पुस्तक वाचून पूर्ण झालं आॅफिसच्या प्रवासात. आल्यावर फेसबुकवर बालाजी सुतार या तरुण मित्राचा ब्लाॅग वाचला. आणि व्हॅलेंटाइन डेची कहाणी सुफळ संपूर्ण की काय ती झाली बघा.

Comments