आप के साथ

मागचा आठवडा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने गाजवला. कोणत्याही मतदानपूर्व वा मतदानोत्तर सर्वेक्षणात या निकालाचा अंदाज आला नव्हता. ‘आप’च्या मागे इतके लाेक उभे राहतील, अशी पुसटशी शंकाही इतर कोणत्याच पक्षाला, कोणत्याच तथाकथित ग्रासरूट पातळीवरच्या नेत्याला आली नव्हती, याचे आश्चर्य अजून काही दिवस वाटतच राहील.
मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर मानसी पीए या मुंबईतल्या एका तरुणीने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमधून आपच्या समर्थकांच्या मानसिकतेचा, आशा-आकांक्षांचा काहीसा अंदाज येतो. ती लिहिते, ‘निकालाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत झालेल्या आप समर्थकांच्या मेळाव्यात मी हजर होते. त्यात बहुतांश तरुण होते, आयआयटीत शिकणारे होते. त्यांना पाहून मला वाटलं की, तरुणांना राजकारणात रस नसतो, असा समज का पसरला असावा? त्यांचा ज्यावर विश्वास असतो, त्यासाठी ते काम करायला तयार असतात. इकडली अनेक मुलं दिल्लीत आपच्या प्रचारासाठी गेली होती. एकाने त्याच्या बाॅसला सांगितलं होतं की, पगारवाढ नाही झाली तरी चालेल; पण तो आपच्या प्रचारासाठी रजा घेणारच. एक म्हणाला की, दिल्लीत रिक्षावाल्यांनी आपच्या समर्थकांकडून पैसे घेतले नाहीत. सामान्य माणसांनीही कार्यकर्त्यांना जमेल तशी मदत केली. या कार्यकर्त्यांनी लोकांना एकच प्रश्न केला, ‘हो, आम्हाला माहीत आहे की, आम्ही चुका केल्या. पण केजरीवालांची नियत खराब होती का?’ ४९ दिवसांच्या सरकारने गरीब लोकांना आशा दाखवली होती, त्यांना विश्वास वाटू लागला होता की, परिस्थिती सुधारेल. त्यामुळेच आपचा एवढा मोठा विजय झाला.’
जर दिल्लीतल्या निवडणुकीसाठी बाहेरून इतक्या मोठ्या संख्येने तरुणवर्ग गेला असेल, तर ती भारतीय राजकारणासाठी चांगली गोष्ट आहे. लोकशाही सशक्त करण्यात तरुण वर्गाचा हातभार लागणं आवश्यक असतं. आपण अनेक वर्षं तरुणांना काय कळतंय राजकारणातलं, असं तरी म्हणत आलोत किंवा त्यांना काही राजकारण वगैरे आवडत नाही, खूप स्वार्थी आहे तरुणाई. मागच्या लोकसभा निवडणुकीतही तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे या वर्गाशी संवाद साधणं राजकीय नेत्यांना काहीसं सोपंही झालं आहे. आता हा सहभाग सकारात्मक, रचनात्मक कसा होईल, बोलाचीच कढी व बोलाचाच भात होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. आपण म्हणजे आई-वडील आणि शिक्षकांनी. बरोबर ना?

Comments