बचत आणि मौज

देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सादर होतो, त्यामुळे त्याच्या आठवडाभर आधीपासून टीव्ही आणि वृत्तपत्रांमधनं या विषयावर चर्चा सुरू होते. अर्थसंकल्पात काय असेल, काय असलं पाहिजे, राजकारण, अर्थकारण हे विषय प्रामुख्याने असतात. आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची असते प्राप्तिकराची मर्यादा. त्यानुसार आपलं इतर नियोजन ठरणार असतं. बचत किती, खर्च किती आणि गुंतवणूक किती याचं. सर्वसाधारण भारतीयांचा कल बचतीकडे सर्वात जास्त, गुंतवणूक आणि खर्चाकडे कमी असतो.
आपल्यासमोर सगळ्यात मोठा बागुलबुवा असतो, म्हातारपणी काय करायचं याचा. आजारी पडल्यावर उपचारांसाठी पैसे लागतात, मुलाबाळांनी नाही काळजी घेतली तर आपल्या गाठीला चार पैसे असावेत निवृत्तीनंतर, हा बहुतेकांचा दृष्टिकोन. तो योग्यच आहे, व्यावहारिकही आहे. परंतु १५-२० वर्षांनंतर अडचण येईल तिचा सामना करायची तयारी असावी, यासाठी आजच्या लहानमोठ्या आनंदांना पारखं होणं चुकीचं वाटतं. बचत करा, गुंतवणूकही करा. पण आज एखादी गोष्ट करावीशी वाटतेय, एखादं पुस्तक आवडलंय, चित्रपट पाहायचाय, बाहेर भटकंतीला जावंसं वाटतंय, छान साडी घ्यायचीय, कुणा गरजू व्यक्तीला/संस्थेला द्यावंसं वाटतंय काही तर तेही करायला हवं ना. घरच्यांसोबत एखादा दिवस बाहेर जेवायला जाणं, नाटक/चित्रपट/संगीताच्या मैफिलीला जाणं किंवा सहलीला जाण्यातला आनंद पैशांत मोजूच शकत नाही आपण. एकत्र तीनचार दिवस फिरायला गेल्यानंतर जो सहवास मिळतो, कुटुंबाचा असो वा मित्रमंडळींचा, तो आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. त्या आठवणी कायम पुरणाऱ्या असतात.
परदेशांमध्ये, विशेषकरून अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या भागांत, वर्षभर नोकरी करायची, साठवलेले पैसे कुठेतरी प्रवासावर खर्च करायचे, पैसे संपले की परत यायचं नि नवी नोकरी करायची हा कल तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. कायमची नोकरी, कायमचं घर, इतकंच काय कायमचा साथीदार या संकल्पना तिथे आपल्याएवढ्या दृढ नाहीत. यात चांगलंवाईट वा योग्यअयोग्य असा मुद्दाच नाही. ती त्यांची जीवनशैली आहे, आणि बचत व गुंतवणुकीची आपली. मग आपण यातला सुवर्णमध्य काढला तर? थोडी रक्कम म्हातारपण, आजारपण वगैरेसाठी ठेवली आणि थोडी आज, आत्ता या क्षणावर खर्च केली तर? कदाचित आजच्या आनंदांच्या क्षणांमुळे भविष्यात आजारपणही कमीच येईल वाट्याला. काय वाटतं? तुम्ही काय करता? बचत की मौज?

Comments