दारूबंदीचं स्वागत

ऑफिसातून घरी जायच्या मार्गावर दारूचं एक दुकान आहे, वाइन शॉप नामक. रोज रात्री आठच्या सुमारास तिथून जाताना किमान पाचसहा जण तिथे उभे दिसतातच, एखादा तर तिथेच बाटली तोंडाला लावून पटकन एक शॉट मारत असतो. एकदा एक १७/१८ वर्षांची मुलगी वडिलांशी बोलत होती फोनवर, ‘पप्पा, अमुक एक ब्रँड नाहीये, तमुक ब्रँडची आणू का?’

हे मुंबईतलं दृश्य. महाराष्ट्रात (वर्धा वगळता) व देशाच्या बहुतांश भागांत (गुजरात वगळता) तेच पाहिलं असेल तुम्ही. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाल्याची बातमी आली आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. दारूबंदी हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, वगैरे. समस्त महिलावर्ग मात्र अत्यंत खुश आहे. दारूचे दुष्परिणाम सर्वात जास्त त्यांनाच भोगावे लागतात, ग्रामीण भाग असो की शहरी. दारू पिणार्‍या नवर्‍यामुळे/भावामुळे/मुलामुळे उद्ध्वस्त झालेले अनेक संसार आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात. खेरीज, या व्यसनामुळे ही मंडळी कामावर जात नाही, मनुष्यबळाचं नुकसान होतं, कामाचे तास वाया जातात, त्याचं गणित वेगळंच. असं दाहक वास्तव एकीकडे आणि व्यक्तिस्वातंत्र्य एकीकडे. दारूबंदी केली की दारू उघडपणे उपलब्ध होत नाही, तिच्यासाठी वाट वाकडी करावी लागते. त्यामुळे काही टक्के तरी लोक दारूपासून दूर होतील, असा विचार या बंदीमागे असतो.

दारूमुळे सरकारला मिळणारा महसूल वा हातभट्टी चालवणार्‍या व्यक्तीचा ती भट्टी उत्पन्नाचा स्रोत असतो; परंतु त्यासमोर दारूमुळे धुळीला मिळणारी आयुष्यं, घरगुती हिंसाचार, अर्धवट सोडलेलं शिक्षण, दारूच्या अमलाखाली होणारे अपघात, इतर गैरकृत्यं याचीही जाणीव या बंदीमागे आहे. दारू, विडी-सिगरेट, अमली पदार्थ कदाचित अगदी सुरुवातीपासून असतीलही, तसंच ते नष्ट करणं अशक्य आहे. परंतु, त्यांचं व्यसन कमी करण्यासाठी प्रयत्नच करू नयेत, ही भूमिका चुकीची आहे. दारूबंदी हे या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे, सर्व महिला संघटना यासाठी कळकळीने प्रयत्न करत असतात, हे त्यांच्या प्रयत्नांना आलेलं यश आहे.

Comments