का?

बलात्कार किंवा लैंगिक हिंसेला बळी पडणा-या/पडलेल्या महिलेबद्दल इतकी मतमतांतरं आपल्यासमोर येत असतात की, त्यावर अनेक शोधनिबंध सादर होऊ शकतील. आणि महिलाच या प्रकाराला जबाबदार असल्याबद्दल हे मत’वाले लोक इतके ठाम असतात की, हिंसा का होते, या प्रश्नाचं उत्तर त्यांना महिलांमध्येच सापडलेलं असतं. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची हिंसा का करावीशी वाटते, हिंसेचं इतकं निर्घृण, अमानवी प्रदर्शन का करावंसं वाटतं, त्या व्यक्तीची नेमकी मानसिकता काय असते, याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्नच करत नाही. पाश्चिमात्य कपडे, अंधार पडल्यावरही घराबाहेर असणे, चाउमिन खाणे,मोबाइल वापरणे आदी सुरस आणि चमत्कारिक कारणं इतक्या सातत्याने समोर येत राहतात, की बलात्कार करणा-या पुरुषाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नच करावासा वाटू नये. पोलिस यंत्रणा, राज्यकर्ते व कायदा या विविध अंगांमध्ये या विषयावर एकमत नसल्याने गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीपर्यंत पोचून त्याची मानसिकता जाणून घेणं भारतात आवश्यक वाटत नाही, वाटल्यास ते शक्य होत नाही.

१६ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीत झालेला अमानुष बलात्कार हा काही एकमेव नव्हे, किंवा असे प्रकार केवळ भारतातच होतात असं नव्हे. परंतु त्या घटनेचे तपशील जाहीर झाल्यानंतर भारतात ज्या प्रकारे भावनांचा उद्रेक झाला, निषेध झाला, जनता रस्त्यावर उतरली, त्यामुळे हा प्रकार अधिक सातत्याने चर्चेत राहिला, देशात व परदेशातही. त्या पार्श्वभूमीवर, बलात्कार व मारहाणीचा गुन्हा सिद्ध झालेला व तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला मुकेश सिंग याला भेटून त्याने नक्की असं का केलं, हे लेस्ली उद्विन या वार्ताहराला जाणून घ्यावंसं वाटलं. रीतसर परवानग्या काढून तिने ही मुलाखत ध्वनिमुद्रित केली. बलात्कारित मुलीच्या पालकांशी, पोलिसांशी, वकिलांशी व इतर सर्व संबंधित घटकांशीही ती बोलली. मुकेश सिंग आणि त्याच्या साथीदारांची बाजू लढवणा-या वकिलांची वक्तव्यं प्रसिद्ध झाल्यानंतर या माहितीपटावरच बंदी आणली गेली.

परंतु यातून मूळ मुद्दा मागेच पडला. मुकेशला असं का करावंसं वाटलं, त्याला नक्की काय दाखवून द्यायचं होतं, हा महत्त्वाचा प्रश्न आणि त्याने त्याच्या परीने दिलेलं उत्तर यावर कोणीच बोलत नाहीये.
(तो खरं बोलला, हे चांगलंच म्हणायला हवं, आपल्या समोर तरी आलं वास्तव. जर म्हणाला असता, ‘आता खूप वाईट वाटतंय, मी असं करायला नको होतं.’ मग काय केलं असतं आपण? जगभरात या माहितीपटाचं आवर्जून प्रक्षेपण केलं असतं, भारतीय संस्कृतीचं आदर्श उदाहरण म्हणून?) मुलगी संध्याकाळी घराबाहेर होती, एका पुरुषाबरोबर होती एवढं कारण तिच्यावर हल्ला करायला मुकेशला पुरेसं वाटलं, ते का? किती लहान असल्यापासून तो मुलींशी असं वागायला शिकला? किती लहान असल्यापासून आपल्याभोवतालच्या मुलांना हेच शिकायला मिळतंय? मुलींशी, महिलांशी असं वागायचं नसतं, त्या माणूस आहेत, त्यांना जीव आहे, भावना आहेत, त्या आपल्यापेक्षा दुर्बल, कमी दर्जाच्या वगैरे वगैरे नाहीत, हे आपण मुलग्यांना शिकवतच नाहीयोत का?

“माझ्या मुलीने असं केलं असतं तर मी तिला जिवंत जाळलं असतं,’ हे त्या वकिलाचं वाक्य ऐकल्यावर “अगदी खरं, असंच पाहिजे यांना,’ असं मनात न आल्याचं छातीठोकपणे किती पुरुष म्हणू शकतात? मग त्यांच्यात आणि वकिलात काय फरक? मुकेश अशिक्षित आणि वकील तर इतका शिकलेला; पण विचार दोघांचेही सारखेच. महाराष्ट्रातल्या नागरिकांना उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीत असंच चालतं, असं म्हणायला फार आवडतं. पण अशीच मतं आपल्याकडच्या किती घरांमधनं बोकाळलेली असतात, अमलात येत असतात, हे आपणच आपल्याला विचारायची वेळ आली आहे आता. आपल्या मुलग्यांना संवेदनशील बनवायला हवंय, मुलींना उपदेशाचे डोसच्या डोस पाजण्याऐवजी मुलग्यांनाही त्या कडवट डोसची चव द्यायला हवीय.

तेवढं त्या माहितीपटाचं शीर्षक इंडियाज डॉटरऐवजी इंडियाज वुमन असतं तर स्त्रीचं एक माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य केल्यासारखं वाटलं असतं. बस्स.

Comments