आरोग्याची गुढी

गेल्या काही दिवसांत स्त्रिया आणि आरोग्य या विषयावरचे काही अहवाल वाचनात आले. स्त्रिया स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, हे ठाऊक होतेच परंतु या अहवालांतून जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक वाटली. धक्का बसण्याचं मुख्य कारण गेली कित्येक वर्षं या माहितीतले आकडे तेच आहेत, त्यात सुधारणा होतानाच दिसत नाहीये. भारतीय स्त्रिया अशक्त असतात, त्यांच्या रक्तात हिमोग्लोिबनचं प्रमाण अगदी कमी असतं, आणि ही आकडेवारी सर्व आर्थिक व सामाजिक स्तरांवर सारखीच आहे, हे किती वर्षं वाचत आलोय आपण. म्हणजे ज्या पिढीत ही समस्या लक्षात आली, त्या पिढीतल्य मुली आई झाल्या, त्यांच्य मुलींमध्येही हीच समस्या आहे. याचा अर्थ हाच, की अजूनही घरातल्या मुलींच्या जेवणखाण्याकडे, आरोग्याकडे आपण दुर्लक्षच करतोय.अजूनही त्यांना पुरेसं, वेळेवर नि पौष्टिक खाणं आपण देतच नाहीयोत. त्यांचं शारीरिक व मानसिक आरोग्य कसं आहे, याची आपण दखलच घेत नाही. मारे त्यांना भरपूर पाॅकेटमनी देत असू, किंवा महागातले कपडेही, परंतु त्या काय खातायत, त्यांचं वजन, उंची योग्य प्रमाणात आहे का, याकडे पूर्ण काणाडोळा आहे आपला.
खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडा, मुंबईसारख्या शहरातल्या निम्म्याहून अधिक स्त्रियांना तर रोजची सात ते आठ झोपही मिळत नाहीये. प्रवासात जाणारे किमान दोन ते कमाल चार तास मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेले. इतर शहरांमध्ये वा गावांमध्ये राहणा-यांचेही हेच हाल. मुंबईकर लोकलमध्ये लोंबकळतात, बाकीचे एसटीत, रिक्षात नाहीतर वडापमध्ये कोंबलेले. पहाटे उठून बाया कामाला लागतात, ते मध्यरात्रीपर्यंत कामातच असतात. जेमतेम चार ते पाच तास झोपायला मिळतं अनेकींना. अनेक पुरुषांनाही पुरेशी झोप मिळत नसते, परंतु त्यांच्यावर घरकामाचा अधिकचा बोजा तरी नसतो.पुरेशी झोप न मिळणं अमानुषच म्हणायला हवं ना. उद्या सुरू होणा-या मन्मथनाम संवत्सरात आरोग्याची गुढी उभारणं आपल्याच हातात आहे, हो ना?

Comments