दम लगा के

‘दम लगा के हैशा’ पाहिलात तुम्ही? नसलात तर लगेच जाऊन पाहा. झीरो फिगर नसलेल्या मुलीला कशाकशाला तोंड द्यावं लागतं, ते इतक्या थेट समाेर येतं की आपल्याला झटकाच बसतो. एका क्षणात आपण अशा कोणाला काय म्हणालोत ते झर्रकन नजरेसमोर येतं किंवा आपल्याला कोण कोण काय म्हणालंय ते आठवतं. विशेषत: लग्नाळू मुलींना तर इतकं सहन करावं लागतं, त्यांचं वजन थोडं जास्त असेल तर. पण ही शिडशिडीत, चवळीच्या शेंगेसारखं वगैरे असण्याची अट लग्नाळू मुलाला मात्र लागू नसते. तो कसाही असला तरी थोड्या स्थूल, सावळ्या, चष्मा असलेल्या मुलीला नावं ठेवायची त्याला मुभा असते.

‘दम लगा के’ची मजा हीच आहे की त्यातली ही अशक्त, कुपोषित न दिसणारी नायिका संध्या या सगळ्यांना कशी पुरून उरते. ‘ती जेवत नाही फार पण अंगाला लागतं तिच्या,’ असा टोमणा तिची आतेसासू मारते, तर ही उत्तर देते, ‘त्याला मेटाबाॅलिझम म्हणतात.’ नवरा त्याच्या मित्रांसमोर तिला ‘मोटी सांड’ म्हणतो, तर त्याच्या एक ठेवून देते. एरवी ती आहे एकदम चपळ, त्यामुळे वजन जास्त असलं तरी आळशी नाही, एका जागी बसून राहणारी नाही. ती तिच्या हक्कांबाबत जागृत आहे. ती एकटीने मेरठ या परक्या शहरात राहून नोकरी करायला तयार आहे. ती शिकलेली अाहे, आणि शिक्षणाचा अभिमान आहे तिला. तिला नायक प्रेम आवडला म्हणून ती त्याच्याशी लग्नाला तयार झाली आहे. ती त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, तो पाठ फिरवतो तर ‘मी काय करू बाई आता’ म्हणून शांत नाही बसत. तिच्यातलं हे जे चैतन्य आहे, ते इतकं लोभस आहे की आपल्याला तिच्याबद्दल वाईट नाही वाटत. सहानुभूती नाही व्यक्त करावीशी वाटत. तर ती हा जो संवादाचा पूल बांधतेय त्यात तिला यश मिळावंसं वाटतं आपल्याला. ही या चित्रपटाची ताकद आहे.

या निमित्ताने हा एक मोठा सामाजिक प्रश्न लोकांसमोर आणलाय दिग्दर्शकाने. त्यातून बोध घेऊन आपण असे टोमणे मारणं थांबवायला हवं ना?

Comments