देणा-याने देत जावे

मार्चच्या सुरुवातीला आरोग्य मंत्रालयाकडून एक चांगली बातमी मिळाली. मूळ जळगावची व सध्या मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणारी जुही पवार अवयवदानासाठी ब्रँड अँबेसेडर झाली आहे. तिची अशी निवड होण्याचं कारण, तिने वडिलांसाठी यकृतदान केलेलं आहे. जुहीच्या नियुक्तीमुळे अवयवदान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्यासमोर खरं तर महर्षि दधीचि यांनी अवयवदानाचा मोठा आदर्श ठेवला आहे, दानाचं महत्त्व सर्व धर्मांमध्ये सांगितलेलं आहेच. तरीही, रक्तापासून डोळे, हृदय, यकृत व मूत्रपिंडासारख्या अवयवांची प्रचंड कमतरता भारतभरात वर्षानुवर्षं जाणवते आहे. दर तीन महिन्यांनी एकदा कोणतीही निरोगी व्यक्ती, पुरुष वा स्त्री, रक्तदान करू शकते. मृत्यूनंतर अनेक अवयव दान करता येऊ शकतात, हे आपल्याला माहीत असतं; पण ते प्रत्यक्षात उतरवणारे फारच कमी.

मृत्यूनंतर काही तासांच्या आत डोळे व इतर अवयवांचे प्रत्यारोपण गरजू व्यक्तींमध्ये होऊ शकते, परंतु मृत्यूनंतर दु:खात बुडालेले कुटुंबीय या बाबीचा विचार करण्याच्या मन:स्थितीतच जणू नसतात. किंवा, कोणी तशी सूचना केली तरी ती भावनांचे भांडवल करून धुडकावून लावली जाते. रक्ताची टंचाई हादेखील अनेक वर्षं बातमीचा विषय होतो. नेत्रदानात श्रीलंकेने जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्या देशात दरवर्षी सरासरी तीन हजार बुब्बुळे दान केली जातात, त्यातली दोनेक हजार इतर देशांमध्ये रोपणासाठी पाठवली जातात. एवढ्याशा छोट्याशा या देशातून जवळपास नऊ लाख नागरिकांनी नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतलेली आहे, तिथे प्रत्यक्ष दानाचाही आकडा मोठाच आहे, कागदावरच राहात नाहीत प्रतिज्ञा, हे महत्त्वाचे. जिवंत असताना अवयवदान दात्यासाठी काहीसे जोखमीचे असले तरी मेल्यानंतर तर ते तसे नाही ना! एका देहातील इतक्या अवयवांमुळे काही जणांना नवीन जीवन प्राप्त होणार असेल, तर तसे करण्यात कशाचाही अडसर का यावा? जूहीने प्रत्यक्ष कृतीतून हे दाखवून दिलं आहे, त्यामुळे तिच्या प्रयत्नांना यश येईल, याची खात्री वाटते. मधुरिमातर्फे जुही व अवयवदानाच्या चळवळीला शुभेच्छा.

Comments