करून दाखवूया

गेल्या काही दिवसांत अनेक लेख असे वाचले ज्यांत वेगवेगळ्या वयाच्या महिलांनी गाजवलेल्या कर्तबगारीची वर्णनं होती. अगदी सातआठ वर्षांची इंग्लंडमधली एक चिमुरडी, कावळ्यांना नेमाने दाणापाणी घालते नि कावळे तिला दररोज काही ना काही आणून देतात, एखादं बटण, काटकी, काचेचा तुकडा, काहीही, पण ते तिच्यासाठी भेटवस्तू आणतात. एक होती ऑस्ट्रेलियन महिला, जिने सहारा वाळवंट पार केलंय. आणि एक होती विख्यात गायिका मॅडोना, जी मागच्या आठवड्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एका पारितोषिक वितरण समारंभादरम्यान गाणं सादर करताना तीन पायर्‍या दाणकन खाली आदळली.

वयाच्या ५६व्या वर्षीदेखील मॅडोना कशी दिसते, यापेक्षा ती काय करू शकते, याकडे लक्ष वेधणं महत्त्वाचं वाटतं. कार्यक्रमात पडल्यानंतर क्षणभरात उठून तिने तिचं गाणं, परफाॅर्मन्स म्हणू हवं तर, पूर्ण केलं. आई गं नाही की उई गं नाही. (या वयात तिने तिचा तेरावा गाण्यांचा अल्बम प्रकाशित केला आहे.) हे जे ‘करून दाखवीन’ तत्त्व आहे ना ते घेण्यासारखं आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे परवा आठ मार्च रोजी साजर्‍या होणार्‍या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची यंदाची संकल्पना आहे Make it happen म्हणजे ‘करून दाखवूया.’ बायका फार जिद्दी असतात, वाट्टेल ते झालं तरी मनात घेतलंय ते करून दाखवीनच या चिकाटीच्या वृत्तीची घेतलेली ही दखल आहे. या लढाऊ बाण्याला दिलेली दाद आहे.
दहा बायकांमधल्या नऊ तरी अशा असतात की त्यांना कशानाकशाविरुद्ध लहानपणापासून बंड पुकारावं लागलेलं असतं. घरच्यांचा, समाजाचा विरोध पत्करून त्यांनी काही तरी केलेलं असतं. प्रतिकूल परिस्थितीच्या नाकावर टिच्चून त्या वर आलेल्या असतात. आणि या त्यांच्या संघर्षात त्यांचं एक अस्त्र असतं विनोद. प्रसंगी स्वत:वर विनोद करत, त्या हसत हसत पुढे जात राहतात. अशा या हसर्‍या जिद्दी मैत्रिणींसाठी हा महिला दिनानिमित्त विनोदी विशेषांक. आवडला तर कळवाल ना?

Comments