मुबारक हो

पहिलं मूल जन्माला येण्याची उत्सुकता, आनंद आईइतकाच बाबांनाही असतोच. अगदी प्रेम बोलण्यातनं व्यक्त न करू शकणारा पुरुष असला तरी कृतीतून हा आनंद, गर्भार बायकोविषयीची काळजी तो दाखवतच असतो. माणसं गावातली असोत वा शहरातली, जन्माचा हा क्षण अविस्मरणीयच. सिनेमांमधनं सतत पाहायला मिळणारी दृश्यं पडद्याइतकीच प्रत्यक्षातही घडत असतातच - लेबर रूम वा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येरझाऱ्या घालणारे पुरुष, आत कळा देणारी बाई, एकमेकांकडे पाहणारे डॉक्टर व नर्स आणि एकदम ट्यँहा असं रडणं. ‘मुबारक हो, लडकी हुई है,’ किंवा ‘मुबारक हो, आप पापा बन गये हैं,’ असे संवाद.

मग अशा या ऐतिहासिक म्हणू शकतो अशा क्षणाचा साक्षीदार होणं किती रोमांचक आणि आनंदाचं आणि समाधान देणारं असेल ना? ज्या नवरा व बायकोमधल्या नात्यात अजून नवखेपणा आहे, खूप ऊब निर्माण नाही झालीये; पण मुळात एकमेकांबद्दल आदर आणि जिव्हाळा आहे, तिथे जन्म देण्याच्या वेदनादायक प्रक्रियेच्या वेळी बायकोला धीर द्यायची संधी या नात्याला अधिक फुलवेल यात शंका वाटत नाही. प्रत्यक्ष कळांचा अनुभव पुरुष घेऊ शकत नसला तरी बायकोला काय सहन करावं लागतंय, याची खणखणीत जाणीव लेबर रूमच्या आत गेल्यावर त्याला होणारच. आणि त्यातूनच तिच्याबद्दल प्रेम, आदर वाटणं, साहजिकच म्हणावं लागेल.
आपल्यापैकी बहुतेकांच्या आजीने किमान सातआठ मुलांना जन्म दिला आहे, तोही घरातल्या एका अंधाऱ्या खोलीत, डॉक्टर/नर्सशिवायच. त्या आजीने इतक्या वेळा हे कसं काय सहन केलं असेल, याचीही जाणीव पाहणाऱ्याला होतेच.

“त्यात काय पाहायचंय, तुला काय करायचंय पाहून,’ असं अनेकांना वाटतं. कारण ते पाहू शकतो हेच आपल्या ध्यानीमनी नसतं. परंतु आता गेल्या १५-२० वर्षांत आपल्याकडच्या पुरुषांना हे माहीत होऊ लागलंय, डाॅक्टरांना नवराबायकोच्या संबंधांवर, तसेच गर्भनिरोधकांच्या वापरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत. मग हा सोहळा पाहायचं का टाळावं बरं कोणी? हं, तेवढं रक्त वगैरे पाहून चक्कर येणार नाही याची खात्री करून घ्या आत जायच्या आधी!

Comments