आशय परिवार अंकाचे मुखपृष्ठ |
अंकातील एक रेखाटन, केवल तिवारी यांचे आहे |
अंकाचे मलपृष्ठ |
माझा सहकारी शेखर देशमुख खूप चोखंदळ वाचक. कथाकादंबऱ्याकविता नसेल वाचत फार, पण वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक विषयांवरचं खूप वाचत असतो. मलाही अावडेल असं वाटलं तर देतो लगेच वाचायला. काल सकाळी त्याने माझ्या हातात दिला एक अंक. आशय परिवार नावाचा. जागतिक ग्रंथ व लेखन हक्क दिनानिमित्त काढलेला विशेषांक. संपादक आहेत सोलापूरचे नीतीन वैद्य.
मुखपृष्ठावर तीन वाचकांचं चित्र. मलपृष्ठावर किताब की आखिरी पंक्ति तक ही ब्रजेश कानूनगो यांची कविता. ४४ पानांच्या या अंकात संपादकीय आणि एक प्रदीर्घ लेख आहे. लेख आहे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. आनंद जोशी. डाॅ. जोशी अत्यंत सुलभ आणि ओघवत्या मराठीत शास्त्रीय संज्ञांबाबत, संशोधनाबाबत लिहितात, त्यांची दिव्य मराठीच्या रसिक या रविवारच्या पुरवणीतील लेखमालिका याची साक्ष आहे. डाॅ. जोशी यांचा हा जवळजवळ ३७ पानांचा लेख आहे - वाचनाचेनी आधारे... वाचन व लेखन : एका नाण्याच्या दोन बाजू. त्यांचा महाराष्ट्र टाइम्समधला एक लेख वाचून वैद्य यांनी डाॅ. जोशी यांना प्रदीर्घ लेख लिहायची विनंती केली होती.
यातली उपशीर्षकं वाचलीत तरी अंदाज येईल की लेखाची व्याप्ती किती मोठी आहे. भाषेची उत्क्रांती, जैविक घटना, भाषेची गुंफण, शब्दांची निर्मती, वाचकमेव जयते, मजेदार टिपा, सुख पाहता वाचनी, कशाला वाचायचं, ग्रंथालय, वाचक व वाचनप्रक्रिया, ललित व वैचारिक वाचन, विज्ञानाचा प्रभाव, ललितकृतींचं महत्त्व, सिनिस्थीझिया - संवेदनासंकर, डिजिटल युग, पारंपरिक व डिजिटल, स्मृती व ज्ञान, मेंदूचा विकास, इ. शेवटी वीसेक संदर्भग्रंथांची सूचीदेखील आहे.
डाॅ. जोशी यात अनेक पाश्चिमात्त्य लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञ, वैज्ञानिकांचा उल्लेख करतात, अनेक मराठी संदर्भही यात अर्थात आहेत. लेखन व वाचनाची ऊर्मी काय असते, आपण वाचतो म्हणजे काय करतो, किंडलवर वाचणं आणि कागदावर छापलेलं वाचणं यात काय फरक आहे, काही फरक आहे का, भाषा कशी तयार होते, आपण शब्द कसे वापरतो, आजकालच्या मोबाइल संवादात अपरिहार्य समजल्या जाणाऱ्या स्मायली आणि जुनी चित्रभाषा, क्राॅस सेन्सरी मेटाफर्स असे अनेक विषय ते हाताळतात. मला सर्वसाधारणपणे तांत्रिक काही वाचायला आवडत नाही, परंतु हे सलग वाचलं गेलं आणि अतिशय आवडलं. म्हणून ही पोस्ट.
मला हे वाचताना आठवण आली ती सतीश तांबे, मुग्धा कर्णिक, सुनील तांबे, सुबोध जावडेकर, हेमंत राजोपाध्ये, राहुल बनसोडे, अविनाश वीर यांची. कारण या विषयावरच्या चर्चा यांच्या वाॅलवर होत असतात.
आता यात वेगळेपण काय आहे?
हा अंक नीतीन वैद्य गेली पाचसहा वर्षं जागतिक पुस्तक दिनाच्या नििमत्ताने काढत आहेत. फक्त खाजगी वितरणासाठी. चांगला कागद, स्वच्छ छपाई, रंगीत मुखपृष्ठ आहे, म्हणजेच यासाठी ते बऱ्यापैकी खर्च करत असावेत. तुमच्यापैकी किती जणांनी हा अंक, किंवा याआधीचे अंक पाहिले आहेत, ठाऊक नाही. मी नव्हताच पाहिला. तो व्हाया डाॅ. जोशी आमच्यापर्यंत पोचला.
(नीतीन वैद्य यांच्याकडून मी या लेखाची पीडीएफ मागवायचा विचार करतेय, कारण हा अंक तुमच्यापर्यंत पोचावा असं मला प्रकर्षाने वाटतंय. ३७ पानांची छायाप्रत काढणंही कठीण आहे.)
त्यांच्या या प्रयत्नाबद्दल लिहिणं महत्त्वाचं आणि आवश्यक वाटलं एवढं नक्की.
डॉ. आनंद जोशी ह्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे. हा अंक मला कसा मिळू शकेल....पैसे कसे पाठवायचे...
ReplyDeleteत्यावर पैशांचा उल्लेख नाही, खाजगी वितरणासाठी आहे. मी पीडीएफ मागवली आहे, मिळाली की शेअर करतेच. त्यांचा ईमेल आयडी आहे vaidyaneeteen@gmail.com.
ReplyDelete