शो मस्ट गो ऑन

'पंधरा-वीस दिवसांनी साखरपुडा आहे हं माझा,’ प्रियांकाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सांगितलं. खूप आनंदात होती, खुलली होती छान. तिला घट्ट मिठी मारली, म्हटलं, ‘आता तब्येत छान ठेव, नीट राहा.’ ती थोडीशी धडपडी होती, आजारी पडायची मध्येच. तसं म्हटलं तर राहायची स्वप्नांच्या राज्यातच. पण इथे असायची भूतलावर, तेव्हा अतिशय संवेदनशील. एक्स्प्रेस करायला काहीशी उतावळी. किती गोष्टींत तिला रस होता. नृत्याबाबत, विशेषत: सालसा, ती प्रचंड पॅशनेट होती.
नाशकातून पुण्यात शिकायला गेल्यानंतर तिच्यासाठी एक मोठं विश्व खुलं झालं होतं आणि गेल्या एप्रिलमध्ये मुंबईत आल्यावर त्या विश्वातील आणखी खिडक्या उघडल्या होत्या. लग्न ठरल्याने या खिडकीत एकीची भर पडली होती. ते दहाबारा दिवस ती इकडेच होती, आम्ही तिची कळी खुललेली पाहून खुश होतो. खरेदी, रात्री उशिरापर्यंत मारलेल्या गप्पा, समुद्रावर भटकंती, या सगळ्याबद्दल तिच्याकडून ऐकत आम्ही त्या आनंदात सहभागी होत होतो...
एके दिवशी म्हणाली, “माझा तो मधुरिमामधला लेख होता ना, ‘तो बघायला येतो तेव्हा’ (७ जून २०१३) तो सासूबाईंनी वाचला होता. त्या म्हणाल्या, “अगदी माझ्या मनातले विचार मांडले होतेस त्यात.’’
आणि त्यानंतर, साखरपुड्यासाठी घरी चाललेली ती घरी पोहोचलीच नाही. हौशीने शिवून घेतलेला मोतिया नि लाल रंगाचा लेहेंगा तिच्या बॅगेतच राहिला...
मानवी जीवनाच्या अशाश्वततेचा असा प्रत्यय आपल्यापैकी सगळ्यांनाच आलेला असतो. होत्याचं नव्हतं होणं, कळी उमलण्यापूर्वीच कोमेजणं, वगैरे वाक्प्रचारांचा अर्थ खणखणीतपणे कळालेला असताे. मधुरिमा तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवी, म्हणून काळजावर दगड ठेवून, डोळ्यांतल्या पाण्याला मागेे सारून आम्ही कामाला लागलो, ही निष्ठुरता म्हणायची की जगण्याची अपरिहार्यता?
द शो मस्ट गो आॅन, ही कितीही चांगली हेडलाइन असली तरी प्रत्यक्ष जगताना ती फार क्रूर असते, नाही? लव्ह यू प्रियांका, आहेस तिथे तुझं पेटंट हसू हसत राहा.

Comments